लेख-समिक्षण

अखेर पूजा खेडकर यांची आयएएस नियुक्ती रद्द

अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाने वादग्रस्त व नखरेल प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर या नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार दोषी ठरल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्याचबरोबर पूजा खेडकर यांना भविष्यात सर्व परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र कॅडरच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. चुकीची माहिती आणि प्रमाणपत्राच्या आधारावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक करून त्यांनी परीक्षा पास केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात आयोगाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला होता. आता आयोगाने थेट कारवाई देखील केली आहे.
पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे यूपीएससी विचार करणार आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या 2009 ते 2023 या काळातील सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर ही कारवाई केली आहे. खेडकर यांना नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार दोषी ठरवण्यात आले आहे. त्यानंतर लोकसेवा आयोग 2022 मधील त्यांची उमेदवारी रद्द करण्यासंदर्भात आणि भविष्यात त्यांना अशा परीक्षा देण्यापासून रोखण्याबद्दल कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली होती. पूजा खेडकरांविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाने एफआयआर नोंदवला आहे. पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आल्याचा निर्णय आधीच घेण्यात आला. त्यानंतर आता यूपीएससीनं त्यांच्याविरोधात थेट एफआयआर नोंदवला आहे.
तुमची उमेदवारी रद्द का केली जाऊ नये आणि यूपीएससीच्या भविष्यातील परिक्षांपासून तुम्हाला वंचित का ठेवलं जाऊ नये, असे सवाल यूपीएससीने नोटिशीतून खेडकरांना विचारले होते. ‘पूजा खेडकर यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे. त्यांनी लोकसेवा आयोगाच्या 2022 मधील परिक्षेत नियमांचे उल्लंघन केल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. परीक्षा देण्यासाठी असलेल्या प्रयत्नांची मर्यादा त्यांनी पूर्ण केली होती. पण त्यानंतरही त्यांनी बोगस पद्धतीने आपली ओळख बदलून यूपीएससीची परीक्षा दिली. त्यांनी स्वत:चे नाव, वडिलांचे नाव, आईचा फोटो, स्वाक्षरी बदलली. याशिवाय मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पत्ताही बदलला. चुकीच्या पद्धतीने ओळख बदलून त्यांनी मर्यादेपेक्षा अधिकवेळा परीक्षा दिल्या,’ असे यूपीएससीने म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या उपसचिव कविता चौहान यांनी या संदर्भात पूजा खेडकरला नुकतीच नोटीस पाठविली. ही नोटीस प्रशासनामार्फत तिच्या बाणेर येथील बंगल्याबाहेरही चिकटविण्यात आली. दरम्यान, पोलिसांकडून समन्स बजावूनही ती अद्याप पोलिसांसमोर हजर झालेली नाही. यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी विविध प्रवर्गांसाठी किती वेळा परीक्षा देता येऊ शकते याच्या अटी आहेत. खेडकर यांची 2022 मधील आयएएस म्हणून बहुविकलांग या प्रवर्गातील ‘पर्सन वुइथ बेंचमार्क डिसअबिलिटीज’ (पीडब्ल्यूबीडी) या विशेष उपवर्गातून निवड झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पूजाच्या नावातील बदल चक्रावणारे आहेत.
पूजा खेडकर 2012पासून परीक्षा देत होती. 2012 ते 2015पर्यंत तिने ‘पूजा दिलीपराव खेडकर’ या नावाने परीक्षा दिली. त्या वेळी वडिलांचे नाव ‘दिलीप कोंडिबा खेडकर’, तर आईचा उल्लेख ‘मनोरमा दिलीपराव खेडकर’ असा केला. सन 2016पासून वडिलांचे नाव कायम ठेवून 2018पर्यंत आईचे नाव ‘मनोरमा जगन्नाथ बुधवंत’ असे लिहिले. सन 2019मध्ये आईचे नाव ‘मनोरमा जे. बुधवंत’ असे, तर वडिलांचे नाव ‘खेडकर दिलीपराव के.’ असे लिहिले. सन 2023पर्यंत दिलेल्या विविध परीक्षांमध्ये आई-वडिलांच्या नावांमध्ये बदल केले. त्यानंतर सन 2021 ते 2023 या दरम्यान दिलेल्या परीक्षांमध्ये ‘पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर’ असे नाव वापरले.
पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांचा मोबाईल गेल्या 8 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याचे म्हटले होते. पुण्यात पूजा खेडकर यांनी केलेल्या प्रतापामुळे त्यांची वाशिमला बदली करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांच्याविरुद्ध पुणे पोलिसात तक्रार दाखल केली. या संदर्भात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करत पूजा खेडकर यांना 3 वेळा समान्स काढला होता. मात्र तरी त्या पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत.
खेडकर कुटुंबातील फक्त पूजा खेडकर नाही तर त्यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर हे देखील चर्चेत आले आहेत. आई मनोरमा यांनी पिस्तूल दाखवून शेतकर्‍यांना धमकावल्या प्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्या पोलिस कोठडीत आहेत. तर वडील दिलीप खेडकर यांनी बारामतीत नाव बदलून जमीन खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आता या प्रकरणी दिलीप खेडकर यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Check Also

बच्चू कडू यांची ‌‘प्रहार‌’ इतिहासजमा

विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती …