भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिचे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगल्यानंतर निराश झालेले देशवासीय झोपेत असतानाच विनेशने धक्कादायक निर्णय घेतला. विनेशने कुस्तीला अलविदा करण्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ गुरुवारी पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी जाहीर केली. पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फ्र ीस्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्यानंतर विनेशने हा मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर पोस्ट लिहित विनेशने हा भारतीय चाहत्यांच्या हृदयात कालवाकालव करणारा निर्णय जाहीर केला आहे. त्याचवेळी भारताची महिला कुस्तीगीर अंतिम पंघलने देशाचे नाक कापले आहे. कारण आता तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून हद्दपार करण्यात आले आहे. अंतिम पंघलचे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आणि त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
विनेशने ट्विटरवर पोस्ट लिहिली की, आई, कुस्तीने माझ्यावर विजय मिळवला, मी हरले, मला माफ करा… तुमची स्वप्ने आणि माझे धैर्य, सगळे काही भंग पावले आहे, माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद उरलेली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024 मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन, क्षमस्व, असे तिने म्हटले आहे. कुस्तीच्या नियमानुसार मल्लांना स्पर्धेच्या दोन्ही दिवशी वजन करावे लागते. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी एकदा वजन होते. मल्ल अंतिम फेरीत दाखल झाला, तर दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा वजन केले जाते. कुस्तीगीर ज्या वजनी गटात खेळत असेल, त्याच्या आतच वजन असायला हवे. स्पर्धेपूर्वी तिचे वजन 50 किलोहून अधिक होते. मात्र, तिने स्पर्धेला सुरुवात होण्याआधी ते कमी केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सकाळी विनेशचे वजन केले ते 49.9 किलोग्रॅम होते. बुधवारी सकाळी विनेशचे वजन 50 किलो 100 ग्रॅम भरले. वजन जास्त भरल्याने तिला अपात्र ठरविण्यात आले.
उपांत्य फेरीच्या लढतीनंतर विनेशचे वजन केले तेव्हा ते 52.7 किलोग्रॅम भरले. यानंतर सुरू झाले वजन कमी करण्याचे प्रयत्न. त्या वेळी प्रशिक्षकही सोबत होते. तिने स्वेट सूट परिधान करून दोरीच्या उड्या मारण्यास सुरुवात केली; तसेच वजन कमी करण्याचे व्यायामही केले. शरीरातील पाणी कमी करण्यासाठी सौना पद्धतही वापरली. तरीही वजन पूर्ण कमी झालेच नाही. केसही कमी केले. मात्र, सकाळच्या कसरतींनी कमी होईल, हा विश्वास होता.
विनेश रात्रभर व्यवस्थित झोपू शकली नाही. बुधवारी पहाटे सहापासूनच विनेशच्या वजन कमी करण्यासाठी कसरती सुरू झाल्या. वजन पुरेसे कमी होत नसल्याने स्विमसूट घालून तिने सायकलिंग केले; तसेच ट्रेडमिलवर सराव केला. सरावातील सहकी फारसा परिणाम झाला नाही. सकाळी आठ वाजता अंतिम लढतीच्या दिवसाचे वजन करण्यात आले. त्या वेळी पथकप्रमुख गगन नारंग तसेच भारतीय संघाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पार्डीवालाही उपस्थित होते. तेव्हा विनेशचे वजन 100 ग्रॅमने जास्त भरले. विनेशचे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगल्यानंतर ट्विटरवर पोस्ट लिहित हा निर्णय जाहीर केला.
दुसरीकडे, अंतिम पंघल ही भारताची युवा कुस्तीगीर आहे. तिच्या बहिणीमुळे भारताचे नाक कापले आहे. खेळाडूला पॅरिस ऑलिम्पिकच्या क्रीडा ग्राममध्ये जाण्याची परवानगी आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ओळखपत्राशिवाय कोणत्याही खेळाडूला क्रीडा ग्राममध्ये प्रवेश दिला जात नाही. पण अंतिमची बहीण तिचे ओळखपत्र घेऊन क्रीडा ग्राममध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होती. त्यावेळी तिला तेथील पोलिसांनी अडवले आणि तिची चौकशी केली. त्यानंतर ती खेळाडू नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जेव्हा सखोल चौकशी करण्यात आली तेव्हा ती भारताची खेळाडू अंतिम पंघलची बहीण असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी अंतिम पंघलच्या बहीणीला ताब्यात घेतले. पोलिसांनी ही कारवाई केल्यावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने अंतिम पंघलला पॅरिस ऑलिम्पिकमधून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अंतिमला भारताच्या खेळाडूंबरोबर राहता येणार नाही. पोलिसांची कारवाई झाल्यावर अंतिम पंघलवर काय कारवाई करायची, याचा निर्णय घेतला जाईल. या प्रकरणात जर ती दोषी असेल तर तिच्याकडून ऑलिम्पिकचे ओळखपत्र काढून घेतले जाईल आणि तिला हद्दपार केले जाईल. त्यानंतर अंतिम पंघलला भारतीय खेळाडूंबरोबर राहता येणार नाही.
Check Also
बच्चू कडू यांची ‘प्रहार’ इतिहासजमा
विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती …
पांचजन्य वृत्तपत्र