लेख-समिक्षण

सावळागोंधळ

महापालिका निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर करेपर्यंत जो ओंगाळवाणा प्रकार पाहायला मिळाला त्यातून राजकारण या प्रकाराविषयीच लोकांच्या मनात तिटकारा निर्माण होण्याचीच शक्यता अधिक आहे. कोणाचाही कोणाला पायपोस नाही अशीच स्थिती सर्वच राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळाली आहे. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर 15 तारखेला मतदानाला जाताना मतदारांचीच आता कसोटी लागणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी अगदी आयत्या वेळेला या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असली तरी त्याहीपेक्षा महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकमेकांशी बिनसत असल्याचे सर्वच ठिकाणचे चित्र आहे. इतकी कमालीची राजकीय गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली की या सगळ्या प्रकारापासून आपण दूर राहिलेलेच बरे, असा तिटकारा मतदारांच्या मनात निर्माण झाला असावा. आता आपण ज्याला मतदान करणार आहोत तो नेमका आपल्या विचारसरणीला अनुरूप आहे का, असा प्रश्न अनेक उमेदवारांच्या बाबतीत निर्माण झाला आहे. कालपर्यंत काँग्रेसमध्ये असणारे आज अचानक भाजपचे उमेदवार म्हणून आपल्यापुढे उभे ठाकणार आहेत, तर कालपर्यंत भाजपचे मित्र पक्ष असलेले आज आपल्यापुढे भाजपचे विरोधक म्हणून उभे ठाकणार आहेत अशा परिस्थितीत मतदार बुचकळ्यात न पडतील तरच नवल. महायुती म्हणून आजपर्यंत जे पक्ष एकत्रितपणे गेल्या विधानसभा निवडणुकीला आपण पाहिले ते तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळाले. सगळ्यात कहर तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला. आधी आम्ही महाविकास आघाडी बरोबर निवडणूक लढवणार आहोत असे छातीठोकपणे सांगणारे शरद पवार पक्षाचे नेते अचानक अजित पवारांच्या दारात गेलेले पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी तेथून माघार घेत आम्ही महाविकास आघाडी बरोबरच आहोत असे छाती ठोकपणे सांगितले. त्यानुसार त्यांच्या जागावाटपाचे सूत्रही जाहीर झाले पण त्यानंतर अचानक शरद पवार पक्षाचे नेते पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेले पाहायला मिळाले. या घडामोडी इतक्या विलक्षण चमकदारपणे घडल्या की मतदारच सैरभैर झाले. 24 तासांत अशी राजकीय भूमिकांची अदलाबदल राजकारणात यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती. पूर्वी एखाद्या पक्षात काम करणार्या निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट मिळाले नाही, तर तो फार तर बंडखोरी करून आपल्याच पक्षाच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरायचा, पण अचानक नेमक्या विरुद्ध विचारसरणीच्या राजकीय पक्षाकडे जाऊन उमेदवारी मागायला तो धजावायचा नाही. कारण, त्याच्या मनात विचारसरणीविषयी नीतिमत्ता असायची. आज मात्र ती पार लयाला गेलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेमके काय निकष लावून मतदान करायचे यावर विचार करायलाही मतदारांपुढे फार पर्याय उरलेला नाही. म्हणूनच महापालिकेची ही निवडणूक मतदारांचीच कसोटी पाहणारी निवडणूक ठरली आहे.– प्रसाद पाटील

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …