जगभरात अनेक अनोखी विमानतळं आहेत. सेंट मार्टिनच्या माहो बीचवर तर अक्षरशः लोकांच्या डोक्याजवळून उडत जाऊन विमाने विमानतळावर उतरतात. काही विमानतळांवर लँडिंग करणे, हे अतिशय जिकिरीचे काम असते. असाच एक विमानतळ हिमालयाच्या कुशीतील भूतान देशात आहे. या विमानतळावर विमान उतरवण्याचे धाडस केवळ निवडक 50 वैमानिकच करू शकतात!
चारही बाजूंनी हिमालयाच्या पर्वतशिखरांच्या कोंदणात असणारं हे विमानतळ जगातील सर्वाधिक आव्हानात्मक विमानतळ मानलं जातं. इथं वैमानिक भूपृष्ठापासून साधारण 18000 फूट इतक्या उंचच उंच पर्वतरांगांतून अंदाज घेत लँड करतात. इथं धावपट्टीवर विमान उतरवणं कोण्या नवख्या व्यक्तीचं कामच नाही. जगभरातून फक्त 50 वैमानिकांनाच हे आव्हानात्मक काम झेपत असून, या सर्व वैमानिकांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. लहानातली लहान धावपट्टी अर्थात रनवे आणि किमान रडार मार्गदर्शनाच्या बळावर विमान उतरवण्याचं विशेष प्रशिक्षण या मंडळींना दिलं जातं. सीएनएनशी संवाद साधताना द्रुक एअरचे वैमानिक कॅप्टन चिमी दोर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार पारोमधील विमानतळावर विमान उतरवण्यासाठी त्या व्यक्तीला स्थानिक ठिकाणांविषयीची पूर्वकल्पना असणं अपेक्षित असते. सोबतच त्यांना इथं विमान उतरवण्याचं रितसर प्रशिक्षण असणंही गरजेचे असते. भूतानमधील हे विमानतळ समुद्रसपाटीपासून 7382 फूट इतक्या उंचीवर असून, या भागात विरळ हवेमुळं विमानांचा वेग आपोआप वाढून त्यामुळं विमान धावपट्टीवर सुरक्षितरीत्या उतरवणं आव्हानात्मक ठरतं. त्यातच भर असते ती म्हणजे येथील बेभरवशाच्या हवामानाची. सहसा पारो विमानतळावर दुपारच्या वेळी विमानं उतरवली जात नाहीत; कारण ठरतं ते म्हणजे इथं वाढणारा वार्याचा वेग. पावसाळी दिवसांमध्ये इथं विमान उतरवणं मोठं आव्हान. इतकंच नव्हे तर रात्री किंबहुना सूर्यप्रकाश कमी झाल्यानंतरही पारो विमानतळावर विमानं उतरवली जात नाहीत. सभोवताली असणार्या उंचच उंच पर्वतरांगांमध्ये विमान कोसळण्याची भीती असल्यामुळं हे सर्व निर्णय घेण्यात आले आहेत.
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र