लेख-समिक्षण

यशोरहाणी संघर्षशील लेखकाची

ही 19 व्या शतकातील कथा आहे. रशियातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलाची करुण संघर्षकहाणी आहे. या मुलाला वाचन आणि लेखनाची खूप आवड होती. जर त्याला कळले की एखाद्याकडे चांगले पुस्तक आहे, तर तो कठोर परिश्रम करून ते मागवत असे. लोकांच्या तिरस्काराची आणि थट्टेची पर्वा न करता, तो रात्री वॉचमन म्हणून काम करायचा आणि जेव्हा – जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा तो काहीतरी वाचायचा आणि लिहायचा. त्याची छोटी खोली दुर्गंधी आणि ओलसरपणा, फाटलेले आणि जुने कपडे यांनी भरलेली होती. जणू काही त्याने गरिबी आणि असाहाय्यतेला आपला साथीदार बनवले होते. अनेक वेळा त्याला रिकाम्या पोटी झोपावे लागले. सर्व अडचणी असूनही, त्याने आपले ध्येय आणि कठोर परिश्रम सोडले नाहीत. साहित्याद्वारे माणसांना माणसांचे दुःख समजावून सांगणे हे त्याचे एकमेव ध्येय होते.
लोक त्याला वेडा म्हणू लागले, पण त्याने हार मानली नाही. दोन-चार वेळा त्याने आपले लेखन प्रकाशनासाठी पाठवले; पण ते प्रसिद्ध न करता परत पाठवण्यात आले. तरीही त्याने लिहिणे थांबवले नाही. एका सकाळी कामावरुन येत असताना, त्याला एका वर्तमानपत्र विक्रेत्याचा आवाज ऐकू आला. त्याने एक प्रत विकत घेतली. कॉकशस या युरोप आणि आशियाच्या सीमेवर वसलेल्या भौगोलिक प्रदेशावरचा तो विशेष अंक होता. पान उलटताच त्याने आनंदाने उडी मारली. कारण त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते – माकर चुद्रा. ही त्याची लघुकथा होती. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून जगातील सर्वोत्तम रशियन लेखक मॅक्सिम गोर्की होता.
त्याच्या कादंब-यांमध्ये, विशेषत: मदर (1906) आणि द लोअर डेप्थ्स (1902), त्याने श्रमिक आणि सामान्य माणसांचे संघर्ष दाखवले. त्याची लेखनप्रतिभा, लेखनशैली आणि समाजाच्या वरच्या वर्गांच्या वागणुकीवरील त्याचे तीव्र टीकासंवाद, या सर्व गोष्टींनी त्याला एक उच्च स्थान दिलं. तो सातत्याने समाजातल्या अन्याय आणि शोषणाच्या विरोधात आवाज उठवत होता. रशियन समाजातील अत्यंत गरीब लोकांच्या जीवनाचे आणि त्यांच्या मनोवृत्तीसंबंधीचे चित्रण त्याने अतिशय प्रभावीपणे आपल्या लेखनातून मांडले.
रिकाम्या पोटी झोपण्याची परिस्थिती असतानांही मॅक्सिम गोर्की यांनी आपले लेखनाचे ध्येय मात्र कधीच सोडले नाही, त्यामुळेच जगातील सर्वोत्तम लेखक म्हणून त्यांच्या साहित्याने रशियाला क्रांतीची दिशा दिली हे खरे नाही काय?

Check Also

जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …