लेख-समिक्षण

श्वेताची यशोपताका

क्रीडाक्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील तरुणींनी दैदीप्यमान भरारी घेतली आहे. महिला टीम इंडियाने विश्वचषक जिंकत भारतीय तरुणींमधील कर्तृत्वाचा डंका जगभरात वाजवला आहे. आता दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथील विद्यार्थिनी कुमारी श्वेता भास्कर कोवे हिने अतुलनीय कामगिरी करत या स्पर्धेतील वैयक्तिक स्पर्धेत गोल्ड मेडल तसेच सांघिक गटात ब्रॉन्झ मेडल पटकावून भारताचे नाव उज्ज्वल केलं आहे.
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील एका सामान्य आदिवासी कुटुंबातील श्वेताचे यश जितके मोठे आहे, तितकाच तिचा संघर्षही. लहान वयामध्येच तिच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. यामुळे कुटुंबावर आभाळ कोसळलं. घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर आर्थिक हालअपेष्टांसह सुरक्षिततेचे प्रश्न उभे राहतात. पण श्वेताच्या आईनं कुटुंबाला सावरण्याचं ठरवलं. दुसऱ्यांच्या घरी मोलमजुरी करून तिनं श्वेताला वाढवलं. कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. आईच्या या कष्टांची श्वेताला पुरपूर जाणीव होती. त्यामुळं तिनं अथक मेहनत आणि जिद्दीची जोड या जोरावर जगाच्या नकाशावर आपल्या कुटुंबाचं आणि गडचिरोलीचं नाव ‌’सुवर्ण‌’ अक्षरांनी कोरलंय. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‌‘एक्स‌’वर पोस्टद्वारे अभिनंदन केले.
अत्यंत मर्यादित सोयीसुविधा, आर्थिक टंचाई आणि शारीरिक मर्यादा अशा अनेक अडथळ्यांवर मात करत तिने तिरंदाजीमध्ये स्वतःला सिद्ध केले. दुर्गम भागातून आलेल्या एका मुलीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चमकदार कामगिरी करत पदके पटकावणे हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे श्वेताचे स्वप्न आहे.
पुढील जागतिक स्पर्धांसाठी श्वेताला आर्थिक आणि तांत्रिक मदतीची गरज आहे. यासाठी शासन तिला आवश्यक सहकार्य करणार की केवळ अभिनंदनच करणार? ही बाब भविष्यात स्पष्ट होईल!

Check Also

जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …