नागपूरने असे आंदोलन पहिल्यांदाच अनुभवले. शेतकर्यांच्या तीन दिवसांच्या शक्तिप्रदर्शनामुळे वर्धा रोडवर जाम लागला. त्यामुळे नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. अनेकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांमध्ये पोहोचणे कठीण झाले. प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले. त्यांनी आपली भूमिका मांडली. आम्हाला न्यायालयाचा अपमान करायचा नाही. आमची इथून हटायला तयारी आहे. पण आमची व्यवस्था जेलमध्ये करावी लागेल, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली. आपण स्वत:हून जागा खाली करणार नाहीत. पोलिसांना कारवाई करायची असेल तर त्यांनी आम्हाला अटक करावी, अशी भूमिका बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली. न्यायालयाचा आदेश पाळायचा आणि लढाई सुरु ठेवायची. एकही जेल रिकामं राहता कामा नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी यावेळी मांडली.
कर्जमाफी देण्याची मागणी करीत राज्यातील महायुती सरकारविरोधात मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकर्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे दोन दिवस नागपूर-हैदराबाद मार्गावर जाम लागला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सायंकाळी ६ वाजतापर्यंत रस्ते मोकळे करण्याचा आदेश दिला. परंतु, आंदोलक शेतकर्यांना उशिरा रात्रीपर्यंत रस्त्यावर ठाण मांडले. मोर्चा मागे हटायला तयार नव्हता. प्रहारचे नेते बच्चू कडू म्हणाले की, आंदोलन आता संपले नाही, असेच सुरू राहणार आहे. मैदान कुणीही सोडणार नाही. पाठ दाखवून कुणी जायचे नाही. कोर्टालाही निर्णय देताना जाण झाली पाहिजे. आजही आम्ही न्याय व्यवस्थेचा आदर करतो. पण न्याय व्यवस्था अशीच पुढे राहिली तर कोर्टासमोर आंदोलन उभे करावे लागेल. रोज शेतकरी मरत आहेत. त्यावर कुणी बोलत नाही. ज्या ताकदीने पोलिस येतील, त्या ताकदीने आम्ही शरण जाऊ. पोलिसांनी आम्हाला अटक करून दाखवावी, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले. पोलिसांनी आमची इथून जेलमध्ये व्यवस्था करावी. आम्ही हात उचलून पोलिसांकडे सरेंडर होऊ. तुम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करा, मी सुद्धा करतो. पण व्यवस्था जेलमध्ये करावी लागेल. आता आपण पोलिसांची वाट पाहू आणि जेल भरो आंदोलन करु. आम्ही न्यायालयाचा अपमान करु इच्छित नाहीत. पण आम्हाला इथून कुठे न्यायचे ही पोलिसांची जबाबदारी आहे. प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही म्हणाल तिथे बसायला तयार आहेत, असे ते म्हणाले.
या मोर्चात प्रमुख शेतकरी नेते सहभागी झाले होते. त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी आक्रमक भाषण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी जानकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार. जेलमध्येही जायला आम्ही तयार आहोत. पण मागे हटणार नाही. सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांना शांत बसू देणार नाही. महाराष्ट्रात आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरू. आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढतो, तो कुणाला दिसत नाही. जनता कोर्ट आहे. जोपर्यंत नेते सांगत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. महाराष्ट्रातील एकही जेल रिकामे ठेवणार नाही. आमच्या माणसांना घेऊन जावा, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. सरकार मागे हटते की आम्ही हटतोय, हे आम्हाला बघायचे आहे. देवेंद्र फडणवीस तुमचा बिस्तरा नागपूरला आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, पोलिसांनी कोर्टाचा आदेश आपल्याला आणून दिला आहे. सहा वाजायच्या आत रस्ता रिकामा करा, असा आदेश दिला आहे. आदेश देणार्यांना इंग्रजांनी काढले आहे का, हे आम्हाला माहिती नाही. आदेश देताना संदर्भ एका इंग्रजी पेपरचा घेतलेला आहे. एकाबाजूने सरकार चर्चेस तयार आहे, असे सांगते, दुसर्या बाजूला कोर्टाची ऑर्डर येते. शिखंडीचा डाव सरकारमधील कुणी खेळत असेल तर त्यांच्या कमरेला चड्डीही शिल्लक राहणार नाही, हे लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही संविधानाचा आदर करतो, पण न्यायव्यवस्थेनेही जबाबदारीने वागले पाहिजे, असे जबाबदार नागरिक म्हणून सांगतोय. न्यायव्यवस्था भरकट चाललीय का असा प्रश्न निर्माण होतो. भविष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतात. आम्ही दोन्ही हात वर करून सरेंडर व्हायला तयार आहोत. तुम्ही आम्हाला जेलमध्ये घेऊन जा, असे आव्हान शेतकरी नेते शेट्टी यांनी दिले.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र