लेख-समिक्षण

मुलांचे पोषण जपताना…

मुलांना आहाराबाबत आरोग्यपूर्ण दृष्टिकोन द्यायचा असेल तर त्यांना गोष्टी आणि कवितांच्या माध्यमातून आरोग्यसंपन्न आहाराचे महत्त्व सांगावे. एकाच वेळी मुलांना काही खाऊ घालणे अवघड बनते. म्हणून काही ठरावीक अंतरानंतर त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला द्या. अर्थात त्यामध्ये एक क्रम जरूर असावा. म्हणजे, दिवसभरातून तीन वेळा जेवण आणि तीन वेळा स्नॅक्स अशी काही तरी वर्गवारी करावी. यामुळे एक शिस्त देखील राहिली आणि मुलांची पोषणासंबंधीची गरजही पूर्ण होईल.
•आई-वडील जेवायला बसतात तेव्हाच मुलांना सोबत घेऊन बसणे उत्तम ठरते. पोळीपेक्षाही त्यांच्या मनात भाज्यांची आवड निर्माण करावी. यासाठी पालक, कोबी, यांचे पराठे बनवावेत. मुलांना खाताना मधून मधून पाणी पिण्याची सवय अजीबात लावू नये.
• मुलांना नेहमी प्रेमानेच जेऊ घालावे. त्यांच्याशी प्रत्येक वेळी प्रेमाने बोलणे अवघड काम असते; पण मुले जेवत असतात तेव्हा आपल्या रागावर नियंत्रण राखणे आवश्यक असते. कारण तुमच्या रागाचा त्यांच्या खाण्यावर नकारात्मक परिणाम होतो.
• बरेचसे पालक आपल्या मनासारखे काम करवून घेण्यासाठी मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाण्याचे आमिष देतात. परंतु हे चुकीचे आहे. त्यामुळे मुलांच्या इतर आहारावर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच चुकीची मानसिकता मुलांमध्ये विकसित होत जाण्याची शक्यता असते.
• मुलांना ट्रिट द्यायचीच असेल तर आठवड्यातील एखादा दिवस निर्धारित करावा. त्यामुळे त्याचाही एक नियम मुलांमध्ये रुजेल आणि इतर वेळी मुले हट्ट करणार नाहीत.
• मुले बाहेर काय खातात, दिवसभर किती पाणी पितात, शीतपेय पितात का? किती पितात? यावर पालकांची नजर असणे आवश्यक आहे. मुलांचा आहार उत्तम पद्धतीने सांभाळण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
• सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुलांना चांगल्या सवयी लावायच्या असतील तर स्वतःही त्यांचे अनुकराण केले पाहिजे. यासाठी सकाळी न्याहारी जरूर करणे, दिवसांतून किमान एक फळ खाणे, दिवसातून थोडा सुका-मेवा खाणे यांसारख्या गोष्टी तुम्ही नियमित करू शकता. हे करताना मुलांनाही सोबत घ्यावे. त्यामुळे मुलांनाही चांगल्या आरोग्यदायी सवयी लागण्यास मदत होईल.
•मुलांना आपण का जेवतो, यामागची कारणे, त्याचे महत्त्व वेळोवेळी पटवून सांगावे. कुठल्या पदार्थांमध्ये कोणते घटक आहेत, ते शरीरासाठी का आवश्यक आहेत, या संबंधीची माहिती द्यावी. त्यामुळे त्यांच्यामध्ये आरोग्यपूर्ण आहारासंबंधी आवड निर्माण होईल. मुलांना खाण्याची योग्य पद्धत कशी आहे ते शिकवावे. घास चावून खावा. फार मोठा घास घेऊ नये, काट्याचा चमच्याचा वापर कसा करावा हे शिकवावे. तसेच टीव्ही बघत जेवू नये, डायनिंग टेबलवर जेवताना किंवा खाली बसून जेवताना कसे जेवावे या गोष्टीही शिकवाव्यात. कारण यामुळे आहारासंबंधीचा शास्रीय दृष्टिकोन तयार होतो आणि तो मुलांच्या आरोग्यासाठी अनुकूल ठरतो.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …