राज्यात यापुढे मशिदींवरील भोंग्यांचा आवाज एका मर्यादेपालिकडे वाढल्यास त्यावर कारवाई होणार आहे. ही कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची असेल. तसेच कर्तव्यात कसुर करणार्या पोलिस निरीक्षकावर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पोलिसांना थेट कारवाई करण्याचे फारसे अधिकार नसल्याने संबंधित कायद्यात सुधारणा करण्याबाबत केंद्राशी संपर्क साधण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.
राज्यात अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंग्यामुळे सर्वसामान्यांना आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आमदार देवयानी फरांदे आणि अतुल भातखळकर एका लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रश्नांकडे लक्ष वेधले. लक्षवेधी सूचनेनुसार मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात प्रार्थना स्थळांवर भोंगे लावून ध्वनीप्रदूषण केले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 23 जानेवारी 2025 रोजी आदेश देऊन मशिदींसह प्रार्थना स्थळांकडून ध्वनीप्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट केले व काही उपाय करण्याचे आदेश दिले. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. भोंग्यांचा वापर रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत करण्यास बंदी असूनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे या भोंग्यांवर कारवाई करण्याची जाबाबदारी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर सोपवण्यात यावी, अशी मागणी फरांदे यांनी केली. त्याला भातखळकर यांनीही पाठिंबा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या 23 जानेवारीच्या निर्णयाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
या लक्षवेधीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणाले की, भोंग्यांचा आवाज नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर सोपवली आहे. ध्वनी प्रदूषण करणार्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असून या आदेशानुसार कारवाया करण्यात येत आहेत. ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा 55 डेसीबल व रात्री 45 डेसीबल आवाजाची मर्यादा आहे. तसेच रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनीक्षेपक/लाऊडस्पीकर वापर करण्यास बंदी असल्यामुळे विहित वेळेत भोंगा बंद न केल्यास व तक्रारी प्राप्त झाल्यास राज्यात ध्वनी प्रदूषणाबाबत एकसूत्रीपणा येण्यासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 व ध्वनी प्रदूषण (विनियम व नियंत्रण) अधिनियम 2000 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच, पोलीस विभागामार्फत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करणार्या आयोजकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. यापुढे ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास विनाविलंब तत्काळ कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून प्रार्थना स्थळांवरील भोंग्यावर कारवाई करण्याचे तक्रार अर्ज पाहणी अहवालासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पुढील कार्यवाही करण्याकरिता अग्रेशित करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आवाजाची मर्यादा तपासण्याचे मशीन सर्व पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत भोंगे वापर करण्यावर बंदी आहे. याबाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्यांचे भोंगे जप्त करण्यात येतील. प्राप्त अहवालाची पडताळणी करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमानुसार संबंधित न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठविला होता. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गायक सोनू निगम याने आपल्या प्रसिद्धीसाठी असाच कल्ला केला होता. मशिदीवरून अजानची बांग ऐकू आली की, आपली पहाटेची झोपमोड होत असल्याची हाळी दिली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी गायक सोनू निगम दुबईला राहण्यास गेला. दोन वर्षे दुबईमधील मशिदीवरील भोंग्याचे आवाज दररोज ऐकत होता, पण या गायकाची झोपमोड होत नव्हती. आता तो गेल्या वर्षी भारतात परत आला आहे.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र