लेख-समिक्षण

मतदानापूर्वीच भाजपचे सहा उमेदवार अविरोध

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतमोजणी होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे खाते उघडले आहे. मनपा निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच कल्याण-डोंबिवली मनपात तीन उमेदवार व धुळेमध्ये दोन आणि पनवेल मनपात एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
29 महापालिकांच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जागा कमी आणि इच्छुक जास्त यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचा संताप बघायला मिळत आहेत. अशातच भाजपाला दिलासा देणाऱ्या घटना घडल्या आहेत. राज्यात सहा जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण-डोंबिवली महापालिका हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. कल्याण-डोंबिवली मनपाच्या प्रभाग क्रमांक 26(ब) मधून भाजपच्या उमेदवार रंजना मीतेश पेणकर या बिनविरोध निवडून आल्या आहे. त्यामुळे या मनपात भाजपाने विजयाची हॅट्रिक साधली आहे. रंजना पेणकर यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननीदरम्यान बाद झाला. या प्रभागात उद्धव ठाकरे गट आणि मनसे आघाडीनेही उमेदवार न दिल्याने पेणकर यांचा विजय निश्चित झाला आहे.
कल्याण-डोंबिवलीत बिनविरोध निवडून येणाऱ्या पेणकर या तिसऱ्या भाजप उमेदवार ठरल्या आहेत. याआधी आसावरी केदार नवरे आणि रेखा चौधरी यादेखील भाजपच्या उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. आसावरी नवरे यांनी प्रभाग क्र. 26 (क)मधून खुल्या प्रवगार्तून विजय मिळवला, तर रेखा चौधरी या प्रभाग क्र. 18 (अ) मधून निवडून आल्या आहेत. नवरे यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागा असून, यंदा सत्तारुढ भाजप-शिवसेना युती निवडणूक लढवत आहे. त्यामध्ये शिवसेना 66 तर भाजप 56 जागांवर निवडणुकीत उतरली आहे. आरएसएसची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या आसावरी नवरे कल्याण-डोंबिवलीत महानगरपालिकेच्या राजकारणात एक नवीन चेहरा आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला होता. विजय हा विजयच असतो. पण बिनविरोध विजय हा विश्वासाचा संदेश आहे. ही ऊर्जा आपल्या चांगल्या कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाला बळ देवो, असे फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलदरम्यान म्हटले.
कल्याण डोंबिवलीनंतर भाजपाला पनवेलमध्येही निकालाआधीच गुलाल उधळण्याची संधी मिळाली. भाजपाचे उमेदवार नितीन पाटील बिनविरोध विजयी झाले आहेत. अर्ज छाननीमध्ये त्यांच्या प्रभागातून दाखल करण्यात आलेला अर्ज बाद झाला. त्यामुळे येथील निकाल स्पष्ट झाला. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.पनवेल महापालिकेच्या 78 जागांसाठी निवडणूक लागली आहे. त्यापैकी एका जागेचा निकाल मतदानाआधीच स्पष्ट झाला आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहे. शेकाप-महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे नितीन पाटील विजयी झाले आहेत. नितीन पाटील हे पालिकेत भाजपाचे स्वीकृत नगरसेवक होते. पनवेलमध्ये भाजपाने महाविकास आघाडीवर कुरघोडी करीत महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक फोडले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. पनवेल शहर, नवीन पनवेलमध्ये महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजपाला शहरात निवडणूक सोपी जाणार आहे.
धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाच्या उज्ज्वला रणजीत भोसले या विजयी झाल्या आहेत. अर्ज छाननीत प्रभाग क्र. 1(अ)मधून उमेदवार उज्ज्वला भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अधिकृत घोषणा अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर होणार आहे. उज्ज्वला भोसले या मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या रणजीत राजे भोसले यांच्या पत्नी आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्र. 6 (ब)मधून ज्योत्सना पाटील याही विजयी झाल्या आहेत.

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …