लेख-समिक्षण

भीतीदायक घर

महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा निवडणुकीच्या धामधुमीत अधूनमधून चर्चेला येत होता. अर्थात, चर्चेत तसे बरेच मुद्दे येतात आणि जातात. नंतर त्यांचं गांभीर्य किती उरतं, हे उघड गुपित आहे. पण महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रत्येक कुटुंबाशी निगडीत आहे आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये गंभीर बनलाय. घरातून बाहेर पडणारी स्त्री, मग ती कोणत्याही वयोगटातील असो, घरी येईपर्यंत सुरक्षित राहील की नाही याबाबत कुटुंबीय साशंक असतात. ती परत येईपर्यंत कुणाच्या जिवात जीव नसतो. ती घरी आली की सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. मुद्दा असा, की त्यानंतर काय? घरात तिचं स्थान काय? शिक्षणासाठी किंवा कामासाठी बाहेर पडणार्‍या महिलेला घरी परतल्यावर प्रतिष्ठा मिळते का? मानसिक शांतता, स्थैर्य मिळतं का? आणि सुरक्षितता? बहुतांश घरांमध्ये हे प्रश्नच ऑप्शनला टाकलेले असतात. हे केवळ आपलंच दुखणं आहे असं नाही तर जगभरात कमी-अधिक फरकाने अशीच परिस्थिती आहे. काही देशांमध्ये तर आपल्यापेक्षाही भयानक अवस्था आहे. ज्या घराला महिलांसाठी ‘सर्वांत सुरक्षित ठिकाण’ मानलं जातं, तिथेच ती सर्वाधिक असुरक्षित आहे, असं ताजा अभ्यास सांगतो. संयुक्त राष्ट्रांशी संबंधित दोन संस्थांनी दिलेली माहिती आणि आकडेवारी प्रत्येकाला चिंता आणि चिंतन करायला लावणारी आहे. घर हेच महिलांसाठी ‘सर्वाधिक असुरक्षित ठिकाण’ असल्याचा निष्कर्ष आकडेवारीतून निघालाय.
गेल्या वर्षभरात जगात दररोज सरासरी 140 महिला आणि मुलींची हत्या झाली, तीही स्वतःच्या घरात! यूएन वूमेन आणि यूएन ऑफिस ऑफ ड्रग्ज अँड क्राइम या दोन संस्थांनी आंतरराष्ट्रीय महिलाविरोधी जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 2023 मध्ये घरात हत्या झालेल्या महिलांची संख्या होती 31 हजार 100. हाच आकडा 2022 मध्ये होता 48 हजार 800. एकाच वर्षांत हत्यांची संख्या 2300 ने वाढली. अर्थात, ही संख्या केवळ मृत्यूंची आहे. गंभीर आणि किरकोळ मारहाणीच्या घटनांचा यात समावेश नाही. अशा अधिकांश घटना पोलीसदप्तरी नोंदवल्याही जात नाहीत. घरातल्या घरात त्या दाबून टाकल्या जातात. महिलांच्या सर्वाधिक हत्या पती, कुटुंबातील अन्य सदस्य किंवा इंटिमेट पार्टनरकडून होतात, असं समोर आलंय. विशेष म्हणजे, आपल्या देशापेक्षा आफ्रिकेत घडणार्‍या घटना कितीतरी अधिक आहेत. तिथे गेल्या वर्षी झालेल्या हत्यांची संख्या 21 हजार 700 इतकी अवाढव्य आहे. तिथे प्रति एक लाख महिलांमागे 2.9 एवढा हत्यांचा अवाढव्य दर आहे. आशियात तुलनेने बर्‍याच कमी म्हणजे लाखामागे 0.8 दराने हत्या झाल्या.
आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं. ते म्हणजे, प्रगतीच्या आणि इतर सर्वच बाबतीत ज्या देशाकडे आपण आदर्श म्हणून पाहतो, त्या अमेरिकेत महिलांच्या घरगुती हत्यांचा दर आपल्यापेक्षा अधिक म्हणजे प्रति लाख 1.6 इतका आहे. युरोपात हत्यांचा दर प्रति लाख 0.6 आहे. हत्या महिलांच्या होतात तशा पुरुषांच्याही होतात. परंतु पुरुषांच्या सर्वाधिक हत्या घराबाहेर तर महिलांच्या सर्वाधिक हत्या घरात होतात, असं ही आकडेवारी सांगते. घरातली स्त्री बाहेर गेल्यावर काळजी करणार्‍यांनी या आकडेवारीकडे अधिक डोळसपणे पाहायला हवं.

Check Also

दिलासादायक माघार

केंद्र सरकारने बहुचर्चित ‌‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026‌’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …