लेख-समिक्षण

पाहुण्यांची खातीरदारी करताना…

घरी आलेल्या पाहुण्यांना भोजन वाढताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. ती घेतली तर घरी आलेला पाहुणा प्रसन्न चित्ताने आपल्या घरी जाईल.
आपल्या संस्कृतीत अतिथींना देवाप्रमाणे मानले आहे. घरी आलेला पाहुणा संतुष्ट होऊनच घरातून गेला पाहिजे असा एक नियम आपल्याकडे आहे. पाहुण्यांच्या संतुष्टी बरोबरच घरातील स्त्रीचाही नेटकेपणा, गृहीणीपणाचे कौशल्य दिसले पाहीजे. बरेचदा आपण पाहुण्यांना जेवणासाठी आमंत्रित करतो. त्यांना भोजन वाढताना थोडी काळजी आणि सतर्कता ठेवावी.
जेवणार्‍याला वाढण्याची आणि खाऊ घालण्याची पध्दत इतकी आवडली पाहिजे की तो खुश झाला पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
जेवणाचे पदार्थ तयार झाल्यानंतर ते अशा भांड्यामध्ये ठेवावे, जी भांडी डायनिंग टेबलाची शोभा वाढवतात. काळी खराब भांडी वाढताना वापरू नये. भात, पुलाव, दहीवडा इत्यादी पदार्थ प्लेटमध्ये तर भाज्या वाटीत ठेवाव्यात.
आधी सर्व पदार्थ टेबलवर मांडून ठेवावे, मगच पानात वाढावे. क्रॉकरीमध्ये फुल प्लेट, क्वार्टर प्लेट, खोल प्लेट, टेबलस्पून, टी स्पून, काटे-सुरी इत्यादी पाहुण्यांच्या संख्येनुसार टेबलवर रचून ठेवावेत. पदार्थानुसार लहान-मोठ्या चमच्यांचा वापर करावा.
सुरूवातीलाच पाणी भरलेला ग्लास प्रत्येकाच्या उजव्या हाताजवळ ठेवावा. नंतर एका बाजूला पाण्याने भरलेले जग ठेवावे. म्हणजे गरजेनुसार ते देता येईल. मुलांना वाढताना विशेष लक्ष द्यावे. मुले स्वतःच आपले जेवण वाढून घेत असतील तर ती खूप जास्त वाढून घेत नाहीत ना, याकडे लक्ष दयावे.
शक्यतो मुलांना आपणच जेवण वाढून दयावे. सर्व पदार्थ टेबलावर ठेवल्यानंतर तुम्हाला आवडेल तो पदार्थ अवश्य घ्या असा आग्रह पाहुण्यांना करावा. यामुळे अन्न वाया जात नाही. उगाच भरमसाठ अन्न वाढून घेऊ नये. जेवतांना वाद-विवादाचे प्रसंग पूर्णपणे टाळावे. पाहुण्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी.
जेवण संपल्यानंतर काही गोड पदार्थ टेबलावर अवश्य ठेवा. जेवणानंतर हात धुण्यासाठी, साबण, पाणी आणि टॉवेल तयार ठेवावा. गोडानंतर मुखशुध्दी म्हणून शेवटी बडीशेप, वेलची, लवंग, पान यापैकी काहीतरी ठेवावे. म्हणजे परिपूर्ण जेवणाचा आनंद मिळेल आणि पाहुणे समाधानाने घरी जातील.

Check Also

लहान मुलांना लिहिण्यास शिकवण्याची योग्य पध्दत

लहान मुलांना लिहिण्यास शिकवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असते. अनेकदा पालक थेट अक्षरे गिरवण्यापासून सुरुवात …