लेख-समिक्षण

नवा रंग

‘अगर रंग ना हो, तो कैसी बेरंग लगेगी ये दुनिया..!’ या शब्दांकडे फक्त प्रसिद्ध संवाद म्हणून न पाहता त्यात सांगितलेल्या परिस्थिती ची कल्पना करून पाहा. आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतं, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक रंगछटा पाहण्याची क्षमता आपल्याला लाभली आहे. कितीतरी रंगछटांची नावंही आपल्याला माहीत नसतात; पण त्या आपल्याला दिसत असतात. अशा अंदाजे एक दशलक्ष रंगछटा आपण पाहू शकतो; परंतु त्या सर्व छटा केवळ तीन रंगांचं वेगवेगळ्या प्रमाणात झालेलं मिश्रण असतं. हे मूळ रंग म्हणजे लाल, हिरवा आणि निळा. काही प्राण्यांना आपल्यापेक्षा कमी मूळ रंग दिसतात, तर काही प्राणीप्रजातींना आपल्यापेक्षा अधिक रंग दिसतात. उदाहरणार्थ, पक्ष्यांना ‘अतिनील’ हा आपल्यापेक्षा अधिक रंग दिसतो. मांजरांना आपल्याइतकेच तीन रंग दिसतात; पण आपल्याइतके स्पष्ट स्वरूपात ते दिसत नाहीत. आपल्याला दिसणार्‍या रंगछटांपेक्षाही अधिक छटा निसर्गात असतील आणि आपल्याला त्या दिसल्या तर जग अधिक सुंदर दिसेल, या आकर्षणातून याविषयी संशोधनही सतत सुरू असतं. नुकतीच आणखी एक रंगछटा काही नशीबवान लोकांना दिसली. हे सगळे अर्थातच शास्त्रज्ञ आहेत. एका प्रयोगानंतर शास्त्रज्ञांनी असा दावा केला, की त्यांना एक अशी रंगछटा दिसली, जी मानवाला लाखो वर्षांत दिसलेली नाही. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस जर्नल’मध्ये या प्रयोगाचे निष्कर्ष तपशीलवार प्रकाशित करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, शास्त्रज्ञांनी आपल्या डोळ्यात ‘लेजर पल्स’ फायर केले. यामुळे त्यांच्या रेटिनामधील पेशींना अतिरिक्त उत्तेजना मिळाली. मानवी डोळ्यांची पाहण्याची क्षमता यामुळे नैसर्गिक क्षमतेपेक्षा अधिक वाढली. आपल्याला न दिसणारा एक रंग आपल्या भोवतालात आहे, हे शास्त्रज्ञांना या प्रयोगामुळेच लक्षात आलं आणि त्यांनी तसा दावा केला. या रंगाला शास्त्रज्ञांनी ‘ओलो’ असं नाव दिलंय. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या मिश्रणातून ही रंगछटा तयार होते, असं ती पाहणार्‍या पाच शास्त्रज्ञांनी सांगितलं. ही छटा फारशी नेत्रसुखद नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे. तथापि, अन्य कोणत्याही रंगछटेशी तिची तुलना मात्र करता येत नाही. ही छटा नेमकी कशी आहे, हे केवळ सांगून लोकांना समजणार नाही; परंतु हा प्रयोग उपयुक्त मात्र ठरेल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. विशेषतः ज्या व्यक्तींना रंगांधळ आहे, त्यांच्यावर संशोधन करण्यासाठी या प्रयोगात वापरलेलं तंत्र उपयुक्त ठरू शकेल, अशी आशा त्यांना आहे. ही केवळ एक मिश्र छटा नसून, ती इतर रंगांपासून विभक्त करून स्वतंत्रपणे पाहायला मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
डोळ्यात ‘लेसर पल्स’ सोडल्यावर एक अद्भुत रंगछटा दिसेल, अशी त्यांना खात्री होती; परंतु मानवी मेंदू त्याला कसा प्रतिसाद देईल, याची कल्पना नव्हती. रंगांचं ज्ञान आपल्याला डोळ्यांमध्ये उमटणार्‍या प्रतिबिंबाचा मेंदूने अर्थ लावल्यानंतर होतं. ‘ओलो’ रंग पाहण्याचं भाग्य लाभलेल्या पाच शास्त्रज्ञांमध्ये चार पुरुष आणि एक महिला संशोधकाचा समावेश आहे. रंगांचा उत्सव साजरा करणार्‍या भारतीयांच्या दृष्टीनं ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. कालांतराने कदाचित तंत्रज्ञानात अधिक संशोधन होईल आणि ही रंगछटा सामान्य माणसालाही पाहायला मिळेल, अशी अपेक्षा करूया. -अवंती कारखानीस

Check Also

दिलासादायक माघार

केंद्र सरकारने बहुचर्चित ‌‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026‌’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …