लेख-समिक्षण

दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याची घटना कळताच मोठी खळबळ उडाली. तेथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले. या हल्ल्यात 28 लोकांचा जीव गेला आणि अनेकजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन काश्मिरी मुस्लिमांचाही समावेश आहे. सर्व जखमींना त्यांच्या गावांना हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट निर्माण झाली. जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंदू व मुसलमानांनी पाकिस्तानच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळला. या हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीर गाठले. त्यांनी हल्ल्यात जखमींसोबत संवाद साधला. दहशतवादी हल्ल्यामध्ये जीव गेलेल्यांची पार्थिव त्यांच्या शहरात पाठविण्यात आले. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली, तर पंतप्रधान मोदींनी दिल्लीमध्ये सुरक्षा बाबींवर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या हल्ल्यानंतर कडक पाऊल उचलण्याची मागणी करण्यात आली. पहलगाम हल्ल्यात दोन स्थानिक व तीन पाकिस्तानी दहशतवादी यांचा समावेश असल्याचे तपासात उघड झाले आहे. सुरक्षा दलांनी अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचीही माहिती आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना जिवंत ताब्यात घेण्यासाठी लष्कराकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. काही ठिकाणी फायरिंग झाल्याचीही माहिती मिळाली आहे.
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद असल्याचे सूत्रांनी सांगितले. तो पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून अतिरेकी कारवाया घडवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे लोकेशन रावळकोट असल्याचे सांगितले जाते. सैफुल्लाने महिन्याभरापूर्वीच हल्ल्याचा इशारा दिला होता. आता सैफुल्लाला ठेचून काढण्याची मागणी केली जात आहे. लष्कर अलर्ट मोडवर आहे. तिन्ही लष्कर प्रमुखांची आज दिल्लीत बैठक झाली.
या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले दिलीप देसले (62) यांच्या पार्थिवावर पनवेलमध्ये बुधवारी संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मूळ गाव असलेले देसले कुटुंब 30 वर्षांपासून नवीन पनवेलमध्ये वास्तव्यास आहे. नवीन पनवेल येथील पोदी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्यासह लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. पुणे येथील कर्वेनगरमधील गल्ली क्रमांक दोनमधील ज्ञानदीप कॉलनीतील संतोष जगदाळे यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनाही मोठा धक्का बसला होता. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे बालपणापासून एकदम खास मित्र. बालपणापासूनच्या या मैत्रीचा शेवट मात्र, दुर्दैवी ठरला. दोघेही मित्र आपल्या परिवारासह जम्मू काश्मीरला फिरायला गेले आणि पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात दोघांचाही बळी गेला. जगदाळे यांचे निधन झाल्याची वार्ता रात्री उशिरा आली आणि अन्य नातेवाइकांसह परिसरातल्या नागरिकांनी जगदाळे यांच्या घरी धाव घेतली.
नाशिकचे पर्यटक अमोल पाटील व अबोली पाटील (पर्यटकांच्या विनंतीनुसार नाव बदलले आहे) हे दाम्पत्य काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. श्रीनगर येथे मंगळवारी पोहोचताच थोडावेळ आराम करून आम्ही निसर्ग बघण्यासाठी ट्युलिप गार्डन येथे गेलो. तेथे पोहोचत नाही तोच नाशिकहून कुटुंबीयांनी फोनद्वारे काश्मीरमध्ये असा हल्ला झाल्याचे कळविले. हल्ल्याचे वृत्त समजताच आम्ही तातडीने हॉटेलमध्ये परतलो, तर हॉटेलच्या दाराशीच मोठ्ठा जमाव होता. गर्दीत डोकावून बघितले तर आतडे पिळवटून टाकणारा आक्रोश एक महिला करीत होती. या महिलेदेखत तिच्या पतीला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून मारले होते. हे भीषण दृश्य बघून आमच्या पायाखालची जमीन निघून गेल्यासारखे वाटले.

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …