लेख-समिक्षण

त्रिवेणी संगमावर तारकांची मांदियाळी

प्रयागराज येथील ऐतिहासिक महाकुंभमेळा शेवटच्या टप्प्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून प्रयागराजच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातून कोट्यावधी भाविकांचा ओघ सुरू आहे. सामान्यांपासून ते गर्भश्रीमंत आणि सेलिब्रिटी लोक प्रयागराज येथे दाखल होत असून अध्यात्माचा अनुभव घेत आहेत. एरवी पडद्यावर चमकणारे तारकामंडळ संगमतीरावर धार्मिक श्रद्धा आणि भावना जोपासताना दिसत आहे.
एकार्थाने धर्म आणि श्रद्धा याचा अनोखा संगम साधत प्रयागराज येथील महाकुंभमेळा भव्यदिव्यतेने पार पडत आहे. आतापर्यंत कोट्यावधी भाविकांसह, संत-महंत आणि प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. अशावेळी सेलिब्रिटी देखील अपवाद राहू शकत नाहीत. कलाकार, संगीतक्षेत्र आणि उद्योगपती तसेच टेलिव्हिजनवरील कलाकारांनी महाकुंभमेळ्यात हजेरी लावली आणि गंगा, युमना आणि सरस्वती या पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करून अध्यात्मिकाची अनुभूती घेतली. जगाच्या दुसर्‍या भागात हिंसाचार, धार्मिक द्वेष, संघर्ष पाहवयास मिळत असताना भारतात मात्र अध्यात्मिक वलय तयार झाले आहे. म्हणूनच महाकुंभमेळा जगभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. प्रत्येक जण या श्रद्धेच्या सोहळ्यात सहभागी होऊ इच्छित आहे. यासाठी जादा रेल्वेगाड्या, विमानसेवा, शटल बससेवा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. वाहतुक कोंडीने कळस गाठला असून यावरुन भाविकांच्या गर्दींची तीव्रता लक्षात येते. प्रचंड गर्दीतही चित्रपट कलाकार प्रयागराज येथे दाखल होत आहेत. विशेष म्हणजे ते कोणताही गाजावाजा न करता आणि व्हिआयपीचे निकष न पाळता संगमाकडे जात आहेत. त्यांनी देखावा करण्याऐवजी श्रद्धेला अधिक महत्त्व दिले आहे. बहुतांश कलाकारांनी ओळख न सांगता त्रिवेणी संगमात डुबकी मारली. खासदार हेमा मालिनी, रवी किशन यांनी काही प्रमाणात सुरक्षा व्यवस्था बाळगली. मात्र दक्षिणेतील बड्या कलाकारांनी सामान्य भाविकाप्रमाणे प्रयागराजचे दर्शन घेतले आणि पवित्र स्नान केले. एका प्रसिद्ध खलनायकाने तर आपली ओळख सार्वजनिक केल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी महाकुंभमेळ्यात सेलिब्रिटीवरून काही घटनाही घडल्या. यात 1990 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी, फुलविक्री करणारी मोनालिसा, आयआयटीएन्स संत याचा उल्लेख करावा लागेल. ममता कुलकर्णीने या कुंभमेळ्यात किन्नर आखाड्यात सहभागी होऊन सन्यास घेतला. त्यांच्या निर्णयाला मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र संतांनी विरोध केल्यानंतर तिचे महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आले.
श्रद्धा व्यक्त करणारे कलाकार
हिंदी आणि भोजपुरीचे प्रसिद्ध कलाकार आणि खासदार रवि किशन याने संगमात डुबकी घेतली. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आणि ते त्यात पूजा आणि स्नान करताना दिसतात. यावेळी त्यांनी म्हटले, तीर्थक्षेत्र प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करत पूजा केली. धार्मिक अस्मिता, संस्कृतीचे प्रतिक असलेली गंगा, यमुना नदी स्वच्छ आणि पवित्र करण्याचे कार्य पूर्ण व्हावे, अशी मनोकामना रवि किशन यांनी व्यक्त केली. अभिनेते अनुपम खेर यांनी देखील महाकुंभमेळ्यात हजेरी लावली. त्यांनी पवित्र स्नान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियवार शेअर केला आणि या अध्यात्मिक क्षणी प्रार्थना करत मंत्रोच्चारही केला. कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसुजा यांनीही पवित्र स्नान केले. त्यांनी चाहत्यापासून चेहरा लपवत स्नान केले आणि त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी देखील संगमतिरी पवित्र स्नान केले.
त्रिवेणीस संगमात स्नान आणि प्रचार
अभिनेत्री नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांनी देखील महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला. दोन्ही कलाकारांनी कुंभमेळ्यात भटकंती केली आणि संगमात स्नान करण्याबरोबरच गंगा नदीचे पूजन केले. दोन्ही कलाकार हे आगामी चित्रपट वध-2 च्या प्रचारासाठी प्रयागराजला दाखल झाले होते. नीना गुप्ता म्हणाल्या, माता गंगा नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करण्याची संधी हा एक अध्यात्मिक प्रवासाचा अनुभव देणारा क्षण होता. संजय मिश्रा म्हणाले, श्रद्धेचा महासगार पाहणे सुखद असून ते शब्दांत व्यक्त करता येणार नाही.
ईश्वराचे मानले आभार
चित्रपट अभिनेता राजकुमार राव आणि पत्नी पत्रलेखा या दोघांनी महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला आणि याबद्दल त्यांनी ईश्वराचे आभार मानले. महाकुंभमेळ्याच्या वातावरणात असलेली अध्यात्मिक भावना आणि त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणारे भाविक पाहून ते भारावून गेले. ‘मैने प्यार किया’ चित्रपत्रटाने बॉलिवुडमध्ये खळबळ उडवून देणारी भाग्यश्री ही देखील मुले अवंतिका आणि अभिमन्यु दासानीसह प्रयागराज येथे दाखल झाली. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले. लोकगायिका मलिनी अवस्थीने देखील आवाहन करत भाविकांना पवित्र स्नान करण्याचे आणि अध्यात्मिक अनुभव घेण्याचे सांगितले.
पवित्र स्नान आणि सोशल मीडियावर फोटो
कलाकार मिलिंद सोमणने देखील पत्नी अकिता कंवरसह प्रयागराजला हजेरी लावली. या जोडप्याने मौनी अमावस्येला पवित्र स्नानाच्या दिवशी संगमात डुबकी घेतली. दोघांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ड्रीम गर्ल आणि खासदार हेमा मालिनी यांनी देखील मौनी अमावस्येला महाकुंभमेळ्यात हजेरी लावली. योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील प्रयागराज येथे उपस्थिती दर्शविली. अभिनेत्री हिमानी शिवपुरीने महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला. त्यांनी संगमात स्नान केले आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केले. अभिनेत्री तनिषा मुखर्जीने देखील स्नानासाठी हजेरी लावली. ईशा गुप्तानेही संगमात स्नान केले. ‘जन्नत’ चित्रपटातील नायिका सोनल चौहान देखील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी दाखल झाली होती. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडेही प्रयागराज येथे आली होती. तिने पवित्र स्नान करतानाचे अनेक फोटो शेअर केले. तिने म्हटले, आयुष्याचा जवळून अनुभव घेताना जेव्हा एखादा सत्तर वर्षाचा ज्येष्ठ संगमाकडे अनवाणी जातो तेव्हा त्या भावनेला, श्रद्धेला शब्दांत व्यक्त करता येत नाही. त्यांच्या भक्तीने मला नि:शब्द केले आहे. बॉलिवुडमधील अनेक कलाकारांनी महाकुंभमेळ्यात उपस्थित दर्शवून संगमावर स्नान केले. यात गायक गुरू रंधावा, केजीएफ फेम श्रीनिधी शेट्टी, निर्माती एकता कपूरसह अनेकांनी उपस्थिती दर्शविली आहे. त्याचेवळी आंतरराष्ट्रीय रॉक बँड कोल्ड प्लेचे गायक ख्रिस मार्टिन आणि अभिनेत्री डकोटा जॉन्सन यांनीही महाकुंभमेळ्यात स्नान केले.
महाकुंभमेळ्यातील नामांकित व्यक्ती
मॉडेल हर्षा रिछारिया, फुलांची विक्री करणारी घार्‍या डोळ्यांची मोनालिसा, आयआयटीएन्स बाबा आणि पूर्वाश्रमीची अभिनेत्री ममता कुलकर्णी हे पात्र चर्चेत राहिले. सर्वाधिक चर्चा तर ममता कुलकर्णीची होती. बोल्ड लुक आणि सौंदर्याने लोकप्रियता मिळवणारी ममता ही सुमारे दोन दशकांपूर्वी गायब झाली. तिचे नाव अंडरवर्ल्डपासून ते अमली पदार्थाची तस्करी करणारे माफिया आणि अनेक कुख्यात गुंडांशी देखील जोडले गेले. मात्र ती अचानक महाकुंभमेळ्यात अवतरली आणि किन्नर आखाडाची महामंडलेश्वर झाली. संगम किनार्‍यावर तिने पिंडदान केले आणि तिला यमाई ममता नंदगिरी असे नाव मिळाले. मात्र आंठवडाभरातच तिचे नाव धुळीस मिळाले. साधू महंतांनी तिच्या नावाला विरोध केल्यानंतर तिला महामंडलेश्वर पदावरून काढून टाकले. अशीच रातोरात लोकप्रियता मोनालिसाला मिळाली. महाकुंभमेळ्यात तिला एवढी प्रसिद्धी मिळाली की तिला तिच्या कुटुंबाने मध्य प्रदेशातील गावी पाठवून दिले. तिच्या सौंदर्याने चित्रपटसृष्टीवर छाप पाडली आणि तिला एखाद्या नायिकेप्रमाणे प्रसिद्धी मिळाली. सध्या मुंबईत ती अभियनाचे प्रशिक्षण घेत असून ती मेकओव्हर करत आहे. शिवाय मॉडेल हर्षा रिझारिया आणि आयआयटीएन्स बाबा देखील चर्चेत होते. पण कालांतराने ते पुन्हा विस्मृतित गेले. परंतु श्रद्धा अणि धार्मिक भावना जोपासणारा महाकुंभमेळा सुरू आहे.- सोनम परब

Check Also

गुप्तहेरपटांची कालातीत मोहिनी

बदलत्या राजकीय वास्तवासह, युद्धांच्या स्वरूपासह आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसह गुप्तहेरपटांचे रूप बदलत गेले; मात्र …