हैदराबादच्या कोलाहलापासून दूर, चिलकूर गावातील एक एकर शेतात झाडांच्या सावलीत आणि खुल्या आकाशाखाली एक वेगळीच सृष्टी आकाराला येत आहे. जहाजाच्या जुन्या ‘कंटेनर’ला कल्पकतेने घराचे रूप देऊन तिथे राहणारा एक तरुण कलाकार आज जागतिक कलाविश्वात आपली मोहोर उमटवत आहे. हर्ष दुरूगड्डा असे या शिल्पकाराचे नाव असून, त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे. सध्या त्यांच्या कार्याचा गौरव होत असताना, त्यांच्या या प्रवासातील जिद्द आणि सृजनशीलता विशेष अधोरेखित होते.
हर्ष यांचा जन्म मूर्तिकारांच्या समृद्ध परंपरेत झाला. कर्नूलजवळील अल्लागड्डा हे गाव मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध असून, हर्ष यांचे वडील हरिप्रसाद आचारी हे स्वतः राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिल्पकार आहेत. बालपण दगडांच्या आणि छन्नी-हातोड्याच्या आवाजात गेल्याने कला त्यांच्या रक्तातच होती. विशाखापट्टणमच्या समुद्रकिनाऱ्यावर काढलेले पहाटेचे तास आणि वडिलांच्या स्टुडिओत मातीशी केलेली मैत्री, हीच त्यांची खरी पाठशाळा ठरली. अभ्यासाचा कोणताही ताण न घेता केवळ सर्जनशीलतेला प्राधान्य देणाऱ्या वातावरणामुळे हर्ष यांची विचारप्रक्रिया स्वतंत्रपणे विकसित झाली.
2017 मध्ये ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘रिओ टिंटो स्कल्पचर अवॉर्ड’ जिंकल्यानंतर हर्ष यांचे नाव जागतिक नकाशावर आले. त्यानंतर 2018 मध्ये जर्मनीतील ’बियाफरिन अवॉर्ड’ आणि 2021 मध्ये न्यूयॉर्कमधील ‘सोदबी’ लिलावात झालेला त्यांचा सहभाग, हे त्यांच्या यशाचे महत्त्वाचे टप्पे ठरले.
लंडनमधील ‘ द आर्टस् फॅमिली’चा दक्षिण आशियाई उदयोन्मुख कलाकार पुरस्कारही त्यांना मिळाला. मात्र, हे आंतरराष्ट्रीय यश पदरी असले तरी हर्ष यांची पावले आजही जमिनीवर असल्यामुळेच तो क्षितीज भरारी घेऊ शकला हे खरे नाही काय?
Check Also
शून्यातून बनला कोट्याधीश…
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस यशाची कोणतीही शिखरं सर करू …
पांचजन्य वृत्तपत्र