उद्योजकतेची खरी ओळख म्हणजे संघर्षातून स्वतःला घडवत, अपयशांवर मात करत यशाची नवी उंची गाठणं. अशीच एक प्रेरणादायक कहाणी आहे चिनू काला यांची जी एकेकाळी घराघरात वेगवेगळ्या वस्तू विकणारी एक साधी मुलगी होती आणि आज रुबन्स अॅक्सेसरीज या प्रसिद्ध ब्रँडची संस्थापक आहे.
चिनू काला यांचं बालपण फारसं सुखकर नव्हतं. केवळ 15 व्या वर्षी, कौटुंबिक मतभेदांमुळे त्यांनी घर सोडलं. हातात पैसा नव्हता, राहायला जागा नव्हती आणि खाण्याचीही भ्रांत होती. पण त्यांच्या मनात एकच जिद्द होती स्वतःचं आयुष्य घडवायचं.
घरभाडं आणि जेवणासाठी वस्तू विकल्या
रोजचं घरभाडं आणि जेवणाचे पैसे मिळवण्यासाठी चिनूने घराघरात जाऊन स्टीलचे भांडे, वेगवेगळ्या वस्तू विकायला सुरुवात केली. एका दिवशी फक्त 20-30 रुपये मिळाले तरी ते तिच्यासाठी मोठं होतं. त्या अनुभवांनी त्यांना खूप काही शिकवलं माणसं, व्यवहार, आणि संघर्ष कसा झेलायचा हे.
मॉडेलिंगपासून व्यवसायाकडे वळण
संघर्ष करत असतानाच चिनूने मॉडेलिंग क्षेत्रातही पाऊल ठेवलं. 2008 मध्ये त्यांनी मिसेस इंडिया या स्पर्धेत भाग घेतला आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या. या यशाने त्यांचा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट जगतात सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करून अनुभव घेतला.
‘रुबन्स अॅक्सेसरीज’चा जन्म
2014 साली, त्यांनी रुबन्स अॅक्सेसरीज या ब्रँडची स्थापना केली. सुरुवातीला फक्त 3 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेला हा व्यवसाय काहीच वर्षांत ऑनलाइन ज्वेलरी मार्केटमधील एक मोठं नाव ठरला. आज रुबन्स हा ब्रँड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लाखों ग्राहकांपर्यंत पोहोचतो आहे.
‘शार्क टँक इंडिया’मध्ये प्रवेश
चिनू काला यांची यशोगाथा इतकी प्रभावशाली ठरली की 2022 मध्ये ‘शार्क टँक इंडिया’ या प्रसिद्ध व्यावसायिक कार्यक्रमातही त्यांचा ब्रँड चर्चेचा विषय ठरला. तिथे त्यांच्या बिझनेस मॉडेलचं कौतुक झालं आणि देशभरात त्यांचं नाव पोहोचलं. चिनू काला यांचं यश हे त्यांच्या जिद्दीचं, चिकाटीचं आणि कधीही न हार मानणार्या वृत्तीचं फलित आहे. त्यांचं म्हणणं आहे संकटं कितीही असली, पण तुमचं ध्येय स्पष्ट असेल आणि तुम्ही सतत शिकत राहिला, तर काहीही अशक्य नाही.
Check Also
स्मार्टफोनच्या साथीने बनला कोट्यधीश
जिद्द, योग्य कल्पना आणि बदलत्या काळाची अचूक ओळख असेल तर यशासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते, …
पांचजन्य वृत्तपत्र