जगाच्या दानशूर व्यक्तींची जेव्हा चर्चा होते तेव्हा कायम तरूण मनाला प्रश्न पडतो की आपण काय दान करावं? असं काही जे आपल्या मेहनतीतून आलेलं असेल आणि त्याचा उपयोग कोणालाही होऊ शकतो.दान हे आपल्या संस्कृतीत सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. ते कुणी करावं याला काही बंधन नाही. आपल्याकडचं काही दुसऱ्याच्या उपयोगी येत असेल तर ते दिल्यानं जे समाधान मिळतं ना त्याची तुलना इतर कोणत्याही समाधानाशी होऊ शकत नाही.
आता तरूणांनी काय दान करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही सगळ्यात महत्वाची आणि अमूल्य गोष्ट दान करू शकता, तीही अगदी तुमची स्वत:ची असलेली ! कोणती म्हणून काय विचारता, रक्तदानाचं पुण्य तुम्ही तरूणवयातच मिळवू शकता. त्यासाठी कोणाकडून काही घेण्याची गरज नाही. उलट तुमच्या रक्तदानाने तुम्ही कितीतरी गरजू लोकांचे प्राण वाचवू शकता. रक्तदान 18 ते 60 वर्ष वयाची कोणतीही निरोगी व्यक्ती करू शकते.
विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी रक्त तयार करणं काही मानवाला जमलेलं नाही.त्यामुळे विविध आजारात किंवा अपघातप्रसंगी रक्त द्यायची वेळ येते तेव्हा ते अन्य व्यक्तीकडून घ्यावंच लागतं. ते दाते तुम्ही सहज होऊ शकता. दर तीन महिन्यांनी रक्तदान करायला काहीच हरकत नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. शिवाय रक्त दिल्यामुळे तुमच्या शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते जी शरीरशुध्दीकरणाला कारणीभूत ठरते. एकावेळी दिलेलं रक्त पुन्हा तयार व्हायला एका दिवसापेक्षा कमी कालावधी लागतो. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. एका सर्वेक्षणात असंही आढळून आलंय की तरूणपणात नियमित रक्तदान करण्याची सवय असलेल्या लोकांना उतारवयात रक्तदाबाचा त्रास कमी होतो. म्हणजे रक्तदान हेअसं दान आहे की ज्यातून दात्यालाही फायदा होतो.
तरूणांमध्ये ही जागरूकता वाढताना दिसतेय. दर तीन महिन्यांनी रक्तदान करणाऱ्या दात्यांमध्ये तरूणांची संख्या वाढतेय. त्याबद्दलची जागृती वाढतेय. भारतासारख्या महाकाय लोकसंख्या असलेल्या देशात अनेक गरजू रूग्ण आहेत जे कोणाच्या तरी रक्तदानावर अवलंबून आहेत. ज्यात महिन्याला किंवा आठवड्याला रक्त बदलण्याची सक्ती असलेली कितीतरी लहान मुलं आहेत. देशाचं भवेिष्य वाचवायचं असेल तर हे एक पाऊल उचलायला हवंच. तेव्हा तरूणांनी यात पुढाकार घ्यायलाच हवा नाही का?
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र