मनोरंजनाचे नवीन माध्यम असलेल्या ओटीटीबाबत अशी प्रतिमा तयार झाली होती की, या प्लॅटफॉर्मवर केवळ गुन्हेगारी कथाच दाखवल्या जातात. काही वर्षांपर्यंत ही बाब खरेही वाटली. मात्र, जेव्हा प्रेक्षक कंटाळू लागले, तेव्हा यात बदल घडवून आणला गेला. आता ओटीटीवर सामाजिक पार्श्वभूमीवर तयार झालेल्या कथा आणि नातेसंबंधांचं गुंतागुंतीचं जाळं अधिक दाखवलं जात आहे. प्रेक्षकांना ओटीटीचं हे नवं रूप आवडू लागलं आहे. ‘राजश्री’ची पहिली वेब सिरीजसुद्धा पसंत करण्यात आली. ‘आचारी बा’, ‘मिसेस’, ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ आणि ‘अमर सिंग चमकीला’ यांनाही प्रेक्षकांची भरभरून प्रशंसा मिळाली.- सोनम परब
सिनेमाच्या जगतात कोरोना काळ आणि त्यानंतर मोठा बदल पाहायला मिळाला. कारण, या काळाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकला. मनोरंजन क्षेत्रावर याचा असा परिणाम झाला की, चित्रपटगृहे बंद झाली, टीव्ही मालिकांचे शूटिंग थांबल्यामुळे टीव्हीवर जुन्या कार्यक्रमांचे पुनःप्रक्षेपण सुरू झाले. अशा वेळी मोबाइलवर ‘ओटीटी’ या नावाने मनोरंजनाचं एक नवीन जग उभं राहिलं. कोरोना काळात ओटीटीने लोकांचं मन रमवलं.
कोरोनानंतर असं समजलं जात होतं की, आता ओटीटीच्या प्रेक्षकसंख्येवर परिणाम होईल, पण तसं काही झालं नाही. केवळ मोबाइलपुरतं मर्यादित असलेलं हे माध्यम आता स्मार्ट टीव्हीचाही महत्त्वाचा भाग बनलं आणि त्याचा व्यापही वाढला. सुरुवातीला ओटीटीवर बहुतेक वेब सिरीज गुन्हेगारी विषयांवर आधारित होत्या. ‘क्रिमिनल जस्टिस’, ‘महाराजा’, ‘पाताल लोक’, ‘दिल्ली क्राईम’, ‘फॉरेन्सिक’ आणि ‘आर्या’ यांसारख्या अनेक वेब सिरीजनी प्रेक्षकांना आकर्षित केलं.
पण हळूहळू प्रेक्षक एकसारख्या गुन्हेगारी कथांपासून कंटाळू लागले. या कथा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहण्यासारख्या नव्हत्या. अशा कंटेंटविरोधात आवाज उठू लागला. मात्र, एक ते दीड वर्षात ओटीटीवर झपाट्याने बदल घडला. याचे उदाहरण म्हणजे, राजश्रीसारख्या प्रॉडशन हाऊसनंही आपली पहिली वेब सिरीज ‘बडा नाम करेगा’ ओटीटीसाठी तयार केली. कौटुंबिक नातेसंबंधातील गुंतागुंतीच्या गोष्टींना महत्त्व दिलं जाऊ लागलं. जे ओटीटी एकेकाळी गुन्हेगारी कथांनी व्यापलेलं होतं, तिथं आता नात्यांतील सामंजस्य दिसू लागलं.
स्त्रीच्या बदलत्या भूमिकेचं प्रतिबिंब
काही वेब सिरीज आणि ओटीटीसाठी बनवलेल्या चित्रपटांनी ओटीटीचं स्वरूपच बदलून टाकलं. आरती कदव दिग्दर्शित ‘मिसेस’ हा चित्रपट प्रत्येक स्त्रीशी जोडलेला वाटतो. यात सान्या मल्होत्रा प्रमुख भूमिकेत आहे. एका स्त्रीच्या संघर्षाची ही कथा आहे. ती पितृसत्ताक मानसिकतेशी झगडत आपल्या स्वप्नांची पूर्ती करते. सान्याने साकारलेली ऋचा ही व्यक्तिरेखा डान्सर बनू इच्छिते, पण घरातील जबाबदार्यांमुळे तिची स्वप्नं मागे पडतात. ही कथा मल्याळम चित्रपट ‘द ग्रेट इंडियन किचन’चा हिंदी रिमेक आहे.
सान्या मल्होत्राचीच ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ ही फिल्मसुद्धा अशाच एका स्त्रीची कथा सांगते, जिचा नवरा लग्नानंतर काही दिवसांतच दुसर्या शहरात नोकरीसाठी जातो. लाँग डिस्टन्स मॅरेजचे दुष्परिणाम दाखवणार्या या चित्रपटात सान्याने उत्कृष्ट अभिनय केला आहे. तसंच, रवीना टंडनचा ‘पटना शुला’ हा चित्रपट सामाजिक मुद्द्यावर आधारित आहे. ही एका गृहिणीची कथा आहे, जिला वकील असतानाही कुणी गंभीरपणे घेत नाही. ती स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करते.
राजश्रीचं ओटीटीमध्ये पदार्पण
चित्रपटविश्वात राजश्री प्रॉडशनचं वेगळं स्थान आहे. अशा स्थितीत त्यांचं ओटीटीमध्ये आगमन या माध्यमासाठी लाभदायक ठरणार आहे. ‘बडा नाम करेंगे’ ही राजश्रीची वेब सिरीज आहे, ज्यामध्ये नातेसंबंधांचं जाळं अगदी सहजपणे विणलेलं आहे. कोरोना काळात मुंबईपासून सुरू झालेली ही कथा उज्जैन, इंदूर आणि रतलामपर्यंत पोहोचते. कथानकातील नायक-नायिका योगायोगाने पाच दिवस एका घरात राहायला भाग पडतात. नंतर त्यांचं लग्न ठरवण्याची चर्चा सुरू होते. दोघं पूर्वीपासून ओळखीचे असतात, पण हे सांगण्याची संधी मिळत नाही आणि ‘फुफाजी’ या लग्नात अडथळा ठरतात.
‘पैठणी!’ हीसुद्धा अशाच प्रकारची वेब सिरीज आहे, जिथं आई-मुलीच्या नात्याची गोष्ट सांगितली आहे. आई पैठणी विणणार्या केंद्रात कारागीर म्हणून काम करते. तिचा अनुभव असा की, पैठणी विणणार्यांना ती घालण्याचं भाग्य मिळत नाही. पण मुलगी तिचं हे स्वप्न पूर्ण करते.
नव्या नात्यांची गुंफण करणारी ‘आचारी बा’
‘आचारी बा’ या चित्रपटातील महिलेच्या हातात चविष्ट लोणचं बनवण्याचं कौशल्य आहे. बा यांना त्यांचा मुलगा मुंबईला बोलावतो. पण मुंबईला गेल्यावर कळतं की, मुलग्याने त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी नाही, तर घर आणि पाळीव कुत्र्याची देखभाल करण्यासाठी बोलावलं आहे. मुलगा आणि सून परदेश दौर्यावर निघालेले असतात. शहरात बा स्वतःला एका खोडकर कुत्र्यासोबत एकटेपण अनुभवतात. तेव्हाच ‘आचारी बा’चा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो, ज्यात त्या लोणच्याची रेसिपी सांगत आहेत. इथूनच त्यांचं ‘आचारी बा’ म्हणून ओळख मिळण्याचं प्रवास सुरू होतो.
चाकोरीबाहेरच्या वेब सिरीज आणि चित्रपट
थोडं हटके असलेल्या कथा सांगणार्या वेब सिरीजमध्ये ‘द स्टोरी टेलर’चा समावेश आहे. ती सत्यजित रे यांच्या ‘गोलपो बोलिये तारिणी खुरो’ या लघुकथेवर आधारित आहे. ही एक कथाकथन करणार्या माणसावर आधारित गोष्ट आहे, ज्याला एक व्यावसायिक नियुक्त करतो. हा कथाकार त्याला झोप लागण्यासाठी गोष्टी सांगतो. पण या व्यावसायिकाचे खरे हेतू काही वेगळेच असतात. परेश रावल यांनी यात ‘तारिणी बंदोपाध्याय’ यांची भूमिका साकारली आहे.
आमिर खान प्रॉडशन्सच्या बॅनरखाली किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट यावर्षी चर्चेत राहिला. हा चित्रपट प्रत्येक स्त्रीमध्ये आत्मविश्वास जागवतो, जी आपली स्वप्नं साकार करण्यासाठी लढा देते.
ज्येष्ठ व्यक्तींच्या जीवनावर आधारित कथानक
पंजाबी गायक अमर सिंग चमकीला यांच्यावर आधारित बायोपिक ‘चमकीला’मध्ये दिलजीत दोसांझ यांनी प्रमुख भूमिका केली आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित ही फिल्म लुधियानाच्या धुबरी गावात जन्मलेल्या आणि १९७९ ते १९८८ या काळात पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणार्या अमर सिंग चमकीला यांच्या वादग्रस्त जीवनावर आधारित आहे. त्यांच्या गायकीवर लोक फिदा होते. फक्त २७ व्या वर्षी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली.
राजकुमार राव यांचा ‘श्रीकांत’ चित्रपटसुद्धा प्रभावी ठरला. ही कथा आहे उद्योजक श्रीकांत बोल्ला यांची, जे जन्मतः अंध होते, पण त्यांनी सुमारे ५०० कोटींची कंपनी उभी करून दिव्यांगांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या.
जुन्या नामवंत खेळाडूंच्या खर्या कहाण्या
खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर ‘चंदू चॅम्पियन’ ही कबीर खान दिग्दर्शित बायोपिक चित्रपट आहे, जो चित्रपटगृहात फारसा कमाल दाखवू शकला नाही, पण ओटीटीवर तो प्रेक्षकांना आवडला. कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. ही फिल्म भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. बॉसिंगचा ‘वंडर बॉय’ बनून १९६५च्या युद्धात आपल्या शरीरावर ९ गोळ्या झेलूनही त्यांनी संघर्ष थांबवला नाही. शेवटी ते देशाचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते ठरले.अजय देवगणचा ‘मैदान’ हा चित्रपट फुटबॉलशी संबंधित सत्य घटनेवर आधारित आहे. ही कथा आहे महान कोच सैयद अब्दुल रहीम यांची, ज्यांची भूमिका अजय देवगण यांनी साकारली आहे. त्याशिवायही अनेक वेब सिरीज आहेत, ज्या प्रेक्षकांना पसंत पडल्या आहेत.
पांचजन्य वृत्तपत्र