लेख-समिक्षण

आरोग्यवर्धक ‘लाल सोने ’

जगातील सर्वात महागडा मसाला म्हणजे केशर. इराणमधून अतिशय चांगल्या दर्जाचे केशर जगभर निर्यात केले जात असते. आपल्याकडे काश्मीरमध्येही केशराची शेती होते. हे ‘लाल सोने’ स्वाद व सुगंधासोबतच आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक असते. आहारात केशरचा नियमित समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. केशरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात.
शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठीही केशराचे नियमित सेवन लाभदायक ठरते. केशर रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते तसेच इन्सुलिनची संवेदनशीलता देखील वाढवू शकते, जे मधुमेहामुळे होणारी समस्या कमी करण्यास मदत करते. केशरमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंटस् असतात, जे हानिकारक फ्री रॅडिकल्स बेअसर करण्यात मदत करू शकतात. संशोधनानुसार फ्री रॅडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत केशर कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करू शकते. केशर नियमित खाल्ल्याने तणाव-नैराश्याच्या समस्या कमी होऊ शकतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, दररोज ३० मिलीग्राम केशर खाल्ल्याने नैराश्य कमी होऊ शकते. याशिवाय, हे नैराश्याच्या औषधांचे दुष्परिणाम देखील कमी करू शकते. वाढत्या वजनाची समस्या कमी करण्यासाठीही केशर मदत करू शकते. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या केशराच्या सेवनाने कमी होते. सतत काही आठवडे केशर खाल्ल्याने भूक कमी होते, जे वजन कमी करण्यात प्रभावी आहे. अल्झायमरच्या रुग्णांसाठी केशर फायदेशीर ठरू शकते. केशरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म अल्झायमर रोगामुळे होणारी समस्या कमी करण्यास मदत करतात. तसेच याचे नियमित सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते. त्याच प्रमाणे केशराचे सेवन केल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होऊ शकतात. त्वचेचा पोत चांगला होण्यासही केशराच्या सेवनाने मदत होते.

Check Also

जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …