लेख-समिक्षण

आकोटात भाजपा-एमआयएम युती?

अकोला जिल्ह्यातील आकोट नगरपरिषदेत आक्रित घडले होते. साप आणि मुंगूस याप्रमाणे एकमेकांना पाण्यात पाहणारे जानी दुष्मन एकत्र आले. हिंदुत्ववादी भाजपाने इस्लामवादी एमआयएमसोबत युती केली होती. धर्माधर्मात भांडण लावून सामान्य लोकांना एकमेकांचे हत्याकांड करण्यास उद्युक्त करणारे हे दोन पक्ष सत्तेसाठी काहीही करण्यास तयार झाले. त्यावरून राज्यभरात विरोधकांनी भाजपावर टीका केली. हे प्रकरण अंगाशी येताच मुख्यमंत्र्ाी देवेंद्र फडणवीस यांनी यावर नाराजी व्यक्त केली तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांना नोटीस बजावली. मात्र या घटनेवरून अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी मोठा खुलासा केला. माध्यमे आणि विरोधकांनी संपूर्ण माहिती घेऊन बोलले पाहिजे. भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही, असा नवीन शोध उघड करीत भाजप आमदार सावरकरांनी एमआयएमच्या नगरसेवकांनी पक्षाशी फारकत घेतल्याचा दावा केला.
आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, एमआयएमच्या विचारधारेशी फारकत घेत त्यांना सोडचिठ्ठी देत चार नगरसेवक आकोट विकास मंचाकडे आले. या आघाडीत भाजपाचे 11 नगरसेवक आहेत. त्यामुळे ही आघाडी भाजपाप्रणित आहे, हे समजण्याइतके ते दुधखुळे नाहीत. या नगरसेवकांनी आमचे विचार स्वीकारले आणि एमआयएमचे विचार सोडले म्हणून आघाडी झाली. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नव्हता. एमआयएमसारख्या जातीयवादी संघटनेची विचारधारा सोडून मुस्लीम समाजाचे नगरसेवक आघाडीत सहभागी होत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे त्यांनी म्हटले. तसेच अजूनही आपण या नगरसेवकांना विचारून घेऊ, तुम्ही एमआयएमचे विचार सोडणार असतील तर आजही आम्ही त्यांचे स्वागत करायला तयार आहोत. जर ते विचार सोडणार नसतील तर आमचा आणि त्यांचा संबंध नाही. राज्याचे मुख्यमंत्री आपल्या विचाराशी खूप प्रामाणिक आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतला. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. एमआयएम सोबत युती करण्याचा प्रयत्न झालाच नाही. पण झाला असेल तर ते आम्हाला दाखवून द्यावे. निश्चित संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.
दरम्यान, आकोट विकास मंचमध्ये नगरसेवक एकत्र येऊन युती झाली आहे, परंतु एमआयएमसोबत युती झाली नाही. अकोट विकास मंच ही आघाडी कागदोपत्री आहे त्याला कुठलीही मान्यता नाही. जिल्ह्याचे त्याला समर्थन नाही. राज्यातील भाजपाचे त्याला समर्थन नाही. ही स्थानिक पातळीवर आघाडी झाली. हा एक प्रयोग होता. एमआयएमचे विचार सोडून ते 4 नगरसेवक सोबत आणण्याचा, मात्र त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असेही आमदार रणधीर सावकर यांनी स्पष्ट केले. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व एमआयएम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माजी मुख्यमंत्र्ाी व भाजपा नेते अशोक चव्हाण हे एमआयएमला उमेदवारी देण्यास सांगत आहेत. एमआयएम ही भाजपीची बी टीम आहे,‌‘ असा आरोपही सपकाळ यांनी केला.
तिकडे ठाणे जिल्ह्यात अंबरनाथमध्ये भाजपने शिंदेसेनेच्या पाठीत खंजिर खुपसला आहे. महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसच्या 12 नगरसेवकांशी युती केली आहे. या भाजपला साथ देणाऱ्या 12 नगरसेवकांचा आता अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. पक्षश्रेष्ठींना अंधारात ठेवून भाजपशी हातमिळवणी केल्याने काँग्रेसने या 12 नगरसेवकांचे थेट निलंबन केले आहे. पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवताच हे सर्व नगरसेवक आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच हाती कमळ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह 12 नगरसेवकांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी या कारवाईचे पत्र जारी केले आहे. पक्षात राहून भाजपला साथ देणे या नगरसेवकांना महागात पडले असले, तरी आता त्यांनी आपला मोर्चा पूर्णपणे भाजपकडे वळवला आहे.

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …