लेख-समिक्षण

अव्वल यशाची कहाणी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशातील एकूण 792 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत इमॉन घोष हा देशात पहिला, तर तिसरे स्थान पुण्यातील ॠतुजा वर्‍हाडे हिने मिळविला आहे. ॠतुजा हिने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे.
एनडीएच्या लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ही परीक्षा 1 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आली हेाती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सेवा निवड मंडळाने या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या परीक्षेतील निवडीनंतर राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या आणि भारतीय नौदल अकादमीमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे दरवाजे मुलींसाठी उघडले, तेव्हाच ऋतुजाने या क्षेत्रात झेप घेण्याचा निश्चय केला होता. एनडीए प्रवेश परीक्षा ही देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक असते. जिद्द आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तिने हे यश मिळविले आहे. यापूर्वी तिने विज्ञान ऑलिम्पियाड आणि राज्यस्तरीय गणित स्पर्धांमध्येदेखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ती एक प्रशिक्षित हार्मोनियमवादक आणि गायिकादेखील आहे. तिचे वडील संदीप वर्‍हाडे हे वेब डिझाइन प्राध्यापक असून, आई जयशी वर्‍हाडे या गणिताच्या शिक्षिका आहेत.
एनडीए परीक्षेत यश मिळवण्यासाठी सुरुवातीला लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे, त्यानंतर पाच दिवस चालणार्‍या तोंडी परीक्षेत यश संपादन कठीण काम आहे. ऋतुजा ही प्रचंड मेहनती मुलगी असल्याने ती यात झेप घेऊ शकली. लेखी परीक्षेला सुमारे दीड लाख मुली होत्या. त्यापैकी 1 हजार मुलींची तोंडी परीक्षेसाठी निवड झाली आणि त्यातून 90 मुलींची निवड करण्यात आली. त्यात ऋतुजाने देशात अव्वलस्थान बळकावले आहे.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …