लेख-समिक्षण

अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या 80 दिवसांनंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंडे यांचे ओएसडी प्रशांत जोशी यांनी मंगळवारी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांकडे मुंडेंचा राजीनामा सोपवला.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोप पत्रातून अनेक खुलासे झाले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचे दोषारोप पत्रात म्हटले आहे. दुसर्‍या बाजूला सीआयडीच्या दोषारोप पत्रातून या घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. काळीज चिरणारे ते फोटो पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. परिणामी वाल्मिक कराड व त्याच्या टोळीविरोधात कठोर कारवाई करण्याची, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. त्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती एक्सवर पोस्ट करून दिली. आपल्या पोस्टमध्ये मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे सोपवलाला आहे, असे त्यांनी नमूद केले.
जर तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल, अशी धमकी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना दिली असल्याची माहिती बाहेर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस प्रारंभीपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आग्रही होते. यापूर्वी त्यांनी 3 ते 4 वेळा अजित पवारांशी चर्चा केली होती. स्वत: धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितले होते. पण, मुंडे ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे शेवटी एका क्षणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविण्याचा इशारा दिला. सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीला फडणवीसही गेले होते. उद्याच राजीनामा द्या, असा आदेशच या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दिला. त्यानंतर मंगळवारी सकाळी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले होते. मुंडे यांच्या राजीनाम्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे, असे ते म्हणाले, तर विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी मी तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून आम्ही त्यांना त्यांच्या जबाबर्‍यांमधून मुक्त केले आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. मुंडे यांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन वाल्मिक कराडकडे होते, असा दावा केला जातो. वाल्मिक कराड आरोपी असल्याने या प्रकरणी तपास योग्य रीतीने होणार नाही, असेही विरोधकांनी म्हणत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. धनंजय मुंडे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील, असा दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता. मात्र, मुंडेंनी राजीनामा न दिल्याने त्यांचा दावा फोल ठरला होता. त्यानंतर करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून तो दोन -तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असा नवा दावा केला होता.

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …