हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या नव्या जोड्यांची चर्चा रंगू लागली आहे. आजवर एकमेकांसोबत काम न केलेले अनेक लोकप्रिय कलाकार आगामी चित्रपटांच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येत आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांचा समावेश आहे. काही जोड्या रोमँटिक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, तर काही ॲक्शन, थरार आणि कौटुंबिक कथांमधून आपली छाप पाडण्यास सज्ज आहेत. सलमान खान-नयनतारा, अल्लू अर्जुन-दीपिका पदुकोण, प्रभास-तृप्ती डिमरी, रणदीप हुड्डा-श्र्द्धा कपूर अशा जोड्यांनी चित्रपटप्रेमींची उत्सुकता वाढवली आहे. या कलाकारांची स्वतंत्र लोकप्रियता मोठी असली, तरी पडद्यावर त्यांच्यातील अभिनयाचा मेळ किती प्रभावी ठरतो, यावरच नव्या जोड्यांचे भवितव्य अवलंबून असेल. आगामी काळात रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या अशाच काही बहुचर्चित जोड्यांविषयी…- सोनम परब
—————–
चित्रपटाच्या यशामध्ये कथा, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनयाइतकेच महत्त्व कलाकारांच्या जोडीला असते. हिंदी चित्रपटसृष्टीत काही जोड्यांनी अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. राज कपूर-नर्गिस, धर्मेंद्र-हेमा मालिनी, अमिताभ बच्चन-रेखा, शाहरुख खान-काजोल अशा जोड्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यांच्या चित्रपटांमधील प्रेमकथा, संवाद, गाणी आणि पडद्यावरील सहज वावर प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. काळानुसार चित्रपटांचे विषय बदलले, कथाकथनाच्या पद्धती बदलल्या आणि कलाकारांच्या निवडीचे निकषही बदलले. आता प्रेक्षकांना परिचित जोड्यांबरोबरच यापूर्वी कधीही एकत्र न आलेल्या कलाकारांना पाहण्याची उत्सुकता असते.
अलीकडच्या काळात हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अंतरही कमी होत आहे. दक्षिणेतील लोकप्रिय कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये काम करीत आहेत, तर हिंदीतील आघाडीचे कलाकार दाक्षिणात्य दिग्दर्शकांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटांचा भाग बनत आहेत. त्यामुळे भाषिक आणि प्रादेशिक सीमा ओलांडून नव्या जोड्या तयार होत आहेत. अशा जोड्यांमध्ये अभिनयाच्या दोन वेगवेगळ्या शैली एकत्र येतात. त्यातून पडद्यावर काहीतरी वेगळे पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण होते. आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या अनेक चित्रपटांमधील नव्या जोड्यांनी आतापासूनच चित्रपटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
सलमान खान – नयनतारा : दोन सुपरस्टार्सची भेट
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सलमान खान आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा प्रथमच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या दोघांची जोडी ‘मॉन्स्टर’ या आगामी ॲक्शनपटात पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाची ‘एसव्हीसी 63’ या नावानेही चर्चा आहे. सलमानचा पडद्यावरील रुबाब, त्याची संवादफेक आणि ॲक्शनमधील खास शैली यामुळे त्याचा स्वतंत्र चाहतावर्ग आहे. दुसरीकडे नयनताराने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विशेषतः प्रभावी स्त्री व्यक्तिरेखा साकारण्यात तिचा हातखंडा आहे. सलमानच्या लोकप्रियतेला नयनताराच्या अभिनयाची जोड मिळाल्यास ही जोडी प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरू शकते.
रणदीप हुड्डा – श्रद्धा कपूर
रणदीप हुड्डा आणि श्रद्धा कपूर ‘ईठा’ या आगामी चित्रपटातून प्रथमच एकत्र येणार आहेत. रणदीपने आपल्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. व्यक्तिरेखेचा स्वभाव, देहबोली आणि मानसिकता समजून घेऊन अभिनय करण्यासाठी तो ओळखला जातो. श्रद्धा कपूरने रोमँटिक, विनोदी आणि भयपट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयातील सहजता आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना आवडते. रणदीपचा गंभीर, वास्तववादी अभिनय आणि श्रद्धाचा उत्स्फूर्त वावर यांचा मेळ कसा साधला जातो, याविषयी उत्सुकता आहे. दोघांच्या अभिनयशैलीतील फरकच या जोडीचे वैशिष्ट्य ठरू शकतो.
कार्तिक आर्यन श्रीलीला : प्रेमकथेला संगीताची साथ
कार्तिक आर्यन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला ‘तू मेरी जिंदगी है’ या रोमँटिक संगीतप्रधान चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अनुराग बसू यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांच्या टी-सीरिजकडून केली जात आहे. कार्तिकने तरुणाईच्या भावविश्वाशी संबंधित भूमिका साकारून आपली ओळख निर्माण केली आहे. त्याचा खट्याळ स्वभाव, विनोदाची शैली आणि रोमँटिक अभिनय लोकप्रिय आहे. श्रीलीला तिच्या नृत्यकौशल्यासाठी आणि उत्साही अभिनयासाठी ओळखली जाते. संगीतप्रधान प्रेमकथेत या दोघांची जोडी आकर्षक ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः चित्रपटातील गाणी आणि नृत्यदृश्यांविषयी चाहत्यांना उत्सुकता आहे.
आयुष्मान खुराना – शर्वरी :
आयुष्मान खुराना आणि शर्वरी राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘ये प्रेम मोल लिया’ या आगामी चित्रपटात प्रथमच एकत्र काम करणार आहेत. कौटुंबिक नातेसंबंध, प्रेम, परंपरा आणि भावनिक गुंतागुंत यांवर आधारित चित्रपटांसाठी राजश्रीची स्वतंत्र ओळख आहे. आयुष्मानने सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातील वेगळे विषय हाताळणाऱ्या चित्रपटांमधून स्वतःचे स्थान निर्माण केले. त्याच्या अभिनयात नैसर्गिकपणा जाणवतो. शर्वरीनेही आपल्या अभिनयातून आणि पडद्यावरील आत्मविश्वासपूर्ण वावरातून लक्ष वेधले आहे. राजश्रीच्या पारंपरिक कौटुंबिक कथाकथनात या दोघांचा ताजेपणा कसा खुलतो, हे पाहणे रंजक ठरेल.
प्रभास -तृप्ती डिमरी :
‘बाहुबली’मुळे देशभर लोकप्रिय झालेला प्रभास आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी ‘स्पिरिट’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. संदीप रेड्डी वांगा या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. ॲक्शन आणि थरार यांचा मिलाफ असलेल्या या चित्रपटाविषयी आधीपासूनच उत्सुकता आहे. प्रभासच्या भव्य व्यक्तिमत्त्वाला आणि दमदार ॲक्शनला मोठा चाहतावर्ग आहे. दुसरीकडे तृप्तीने आपल्या अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. भावनिक आणि गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारण्याची क्षमता तिने दाखवून दिली आहे. त्यामुळे प्रभास आणि तृप्ती यांच्यातील पडद्यावरील नातेसंबंध चित्रपटाच्या कथेला कोणते नवे परिमाण देतात, याकडे लक्ष असेल.
अल्लू अर्जुन -दीपिका पदुकोण
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रथमच ‘राका’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. ॲटली यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या भव्य विज्ञानकाल्पनिक ॲक्शनपटाची निर्मिती सन पिक्चर्स करीत आहे. अल्लू अर्जुनच्या अभिनयातील ऊर्जा, नृत्यकौशल्य आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे त्याला देशभर लोकप्रियता मिळाली आहे. दीपिकाने विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारून आपल्या अभिनयाची व्याप्ती सिद्ध केली आहे. तिचे प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि पडद्यावरील आत्मविश्वास ही तिची बलस्थाने आहेत. दोन मोठ्या चित्रपटसृष्टींतील लोकप्रिय कलाकार एकत्र आल्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
*रणवीर सिंह -कल्याणी प्रियदर्शन
रणवीर सिंह आणि कल्याणी प्रियदर्शन ‘प्रलय’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. जय मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट जगाच्या विनाशाच्या पार्श्वभूमीवर आधारित ॲक्शन आणि सर्व्हायव्हल थ्रिलर असल्याचे सांगितले जाते. रणवीर सिंह आपल्या ऊर्जावान अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक भूमिकेसाठी वेगळी देहबोली आणि व्यक्तिमत्त्व आत्मसात करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. कल्याणी प्रियदर्शनने दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. संकटाच्या परिस्थितीत माणसांचे बदलणारे स्वभाव आणि नातेसंबंध मांडणाऱ्या कथेत या दोघांची अभिनयातील जुगलबंदी पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
*नव्या जोड्यांची खरी परीक्षा पडद्यावरच!
चित्रपटातील जोडी लोकप्रिय होण्यासाठी दोन्ही कलाकारांची स्वतंत्र प्रसिद्धी पुरेशी नसते. त्यांच्या व्यक्तिरेखांमधील नाते, संवाद, भावनिक प्रसंग आणि दिग्दर्शकाने साधलेला समतोल यांवर त्या जोडीचा प्रभाव अवलंबून असतो. अनेकदा अनपेक्षित कलाकारांच्या जोड्यांनी प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. तर मोठी नावे एकत्र असूनही काही जोड्या अपेक्षित परिणाम साधू शकलेल्या नाहीत.
आगामी चित्रपटांमधील या नव्या जोड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यातील विविधता. कुठे हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार एकत्र येत आहेत, तर कुठे अभिनयाच्या परस्परविरोधी शैली असलेले कलाकार एकाच कथेत दिसणार आहेत. प्रेमकथा, कौटुंबिक चित्रपट, विज्ञानकाल्पनिक ॲक्शन आणि थरारपट अशा वेगवेगळ्या प्रकारांमधून या जोड्या प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यांच्यातील कोणती जोडी सर्वाधिक लोकप्रिय ठरेल, कोणाची पडद्यावरील जुळवाजुळव लक्षात राहील आणि कोणती जोडी पुन्हा एखाद्या चित्रपटात दिसेल, याची उत्तरे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळतील. तोपर्यंत या नव्या जोड्यांविषयीची उत्सुकता चित्रपटप्रेमींमध्ये कायम राहणार आहे.
Check Also
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा नवा टीझर
महाराष्ट्रातील सत्ताकारण, गुन्हेगारी जगतातील धागेदोरे आणि सत्तेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात शिजणारी कटकारस्थाने यावर थेट बोट ठेवणारा …
पांचजन्य वृत्तपत्र