संस्मरणीय पर्वाची सांगता!

इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) निवृत्तीची घोषणा करत महेंद्रसिंह धोनीने आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. कोट्यवधी क्रिकेटप्रेमींसाठी हा भावनिक क्षण असला, तरी हा निर्णय अपेक्षितच होता. गेल्या दोन आयपीएल हंगामांपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती. त्याच्या फलंदाजीतील पूर्वीचा आवेशही ओसरला होता. अखेर 17 नोव्हेंबर 2026 रोजी धोनीने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दशकभराहून अधिक काळ धोनी आयपीएलमध्ये खेळत राहिला. या काळात तो जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा ‌‘धोनी-धोनी‌’, ‌‘थाला-थाला‌’ या घोषणांनी स्टेडियम दणाणून गेले. क्रिकेटरसिकांचे इतके निरतिशय प्रेम लाभलेले खेळाडू मोजकेच आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 28 वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जिंकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारतीय संघाने अव्वल स्थानही प्राप्त केले. भारतीय क्रिकेटप्रेमींना अभिमानाचे असंख्य क्षण देणाऱ्या धोनीचे त्यांच्या हृदयातील स्थान त्यामुळेच अढळ आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या मार्गदर्शकाची भूमिका आता धोनी बजावणार आहे. गेल्या काही हंगामांपासून तो अनौपचारिकरीत्या ही जबाबदारी पार पाडतच होता. चेन्नई संघाच्या मालकीण रूपा गुरुनाथ यांनी धोनीची नेतृत्वक्षमता, नम्रता, संघाप्रती असणारी बांधिलकी आणि क्रिकेटरसिकांशी असणारे त्याचे अतूट नाते यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम चेन्नईच्या नावावर आहे. या संघाने पाच वेळा विजेतेपद पटकावले. आयपीएलमधील कारकिर्दीत धोनी 100 वेळा नाबाद राहिला. त्याने केलेल्या 5,439 धावांपैकी 1,584 धावा केवळ षटकारांच्या माध्यमातून केल्या. संघाच्या यशातील त्याच्या योगदानाची कल्पना या आकडेवारीवरून येते.
क्रिकेटविश्वात अनेक खेळाडू आपल्या आक्रमक स्वभावामुळे चर्चेत राहतात. मात्र, सचिन तेंडुलकरप्रमाणेच धोनीने आपल्या शांत स्वभावाने आणि आक्रमक फलंदाजीने लौकिक मिळवला. अत्यंत दबावाच्या क्षणीही विचलित न होता निर्णय घेण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला ‌‘कॅप्टन कूल‌’ असे संबोधले गेले. अमाप लोकप्रियता आणि संपत्ती मिळवूनही त्याने आपला साधेपणा जपला. समाजमाध्यमांच्या आजच्या युगात प्रसिद्धीचा अतिरिक्त हव्यास न धरल्यामुळे अनावश्यक वादांपासूनही तो दूर राहिला. झारखंडमधील सर्वाधिक आयकर भरणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याचा समावेश असल्याचेही अनेकदा चर्चेत आले.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील धोनीचे योगदान विश्वचषकांच्या आणि विक्रमांच्या पलीकडे जाणारे आहे. रांचीसारख्या तुलनेने छोट्या शहरातून आलेल्या या खेळाडूने भारतीय क्रिकेटमधील महानगरांची मक्तेदारी मोडून काढली. देशातील छोट्या शहरांमधील असंख्य गुणवंत तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ दिले. भारतीय तिरंग्याची शान जगभरात वाढवणारा धोनी आता मैदानावर फलंदाजी करताना दिसणार नसला, तरी नव्या पिढीच्या क्रिकेटपटूंच्या जडणघडणीतील त्याचे योगदान निश्चितच मोलाचे ठरणार आहे. – प्रशांत कुलकर्णी

Check Also

विळखा चीनी ‌’मधुजाला‌‘ चा

चिपनिर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक साम्राज्यावर अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या ‌‘एनव्हिडिया‌’ या महाकाय कंपनीच्या पायाखालील …