केशर म्हटले की डोळ्यांसमोर काश्मीरची थंड हवा आणि जांभळ्या फुलांनी बहरलेली शेती येते. विशिष्ट तापमान आणि हवामानाची गरज असल्यामुळे केशराचे उत्पादन प्रामुख्याने काश्मीरशी जोडले गेले आहे. मात्र नागपूरच्या उष्ण हवामानातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केशराचे उत्पादन घेता येते, हे अक्षय होले आणि दिव्या लोहकरे होले या दाम्पत्याने दाखवून दिले आहे. ‘शाया एंटरप्रायझेस’च्या माध्यमातून त्यांनी नियंत्रित वातावरणात केशर उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला. अक्षय हे बीबीए पदवीधर आहेत, तर दिव्या बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. केशर उत्पादन सुरू करण्यापूर्वी दोघांनी त्याचा सखोल अभ्यास केला.
पारंपरिक शेतीची पद्धत, हवामानाची भूमिका आणि कंदांची निगा समजून घेण्यासाठी त्यांनी 2 वर्षांच्या काळात सुमारे साडेतीन महिने काश्मीरमध्ये वास्तव्य केले. तेथील अनुभवी शेतकऱ्यांकडून केशर उत्पादनाचे बारकावे समजून घेतले.
2020 मध्ये त्यांनी नागपुरात प्रत्यक्ष प्रयोग सुरू केला. सुरुवातीला केवळ 1 किलो केशराचे कंद वापरण्यात आले. पहिल्या प्रयत्नातून काही ग्रॅमच उत्पादन मिळाले. मात्र नागपूरसारख्या उष्ण शहरात केशर उगवू शकते, हा विश्वास या छोट्या प्रयोगातून मिळाला. त्यानंतर त्यांनी तब्बल 350 किलो कंदांमध्ये गुंतवणूक केली. त्यातून जवळपास 1600 ग्रॅम केशराचे उत्पादन मिळाल्याचे सांगितले जाते.
नागपूरच्या हवामानात केशर वाढविण्यासाठी त्यांनी ‘एरोपोनिक’ तंत्रज्ञानाचा आधार घेतला. या पद्धतीत मातीशिवाय नियंत्रित वातावरणात पिकाची वाढ केली जाते. तापमान, आर्द्रता आणि प्रकाश यांसारखे घटक आवश्यकतेनुसार नियंत्रित करता येतात.
सुरुवातीला घरातील सुमारे 400 चौरस फूट जागेत त्यांनी केशरासाठी अनुकूल वातावरण तयार केले. पुढे या प्रयोगाचा विस्तार झाला आणि आज त्यांचे उत्पादन दोन ठिकाणी मिळून सुमारे 480 चौरस मीटर क्षेत्रात पसरले आहे.
अक्षय आणि दिव्या यांनी स्वतःच्या उत्पादनाबरोबरच इतरांना या तंत्राचे प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली. उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत 150हून अधिक जणांनी त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले असून त्यापैकी 29 जणांनी स्वतःची केशर उत्पादन केंद्रे सुरू केली आहेत. या व्यवसायातून गेल्या 2 वर्षांत त्यांना वार्षिक सुमारे 40 ते 50 लाखांपर्यंत महसूल मिळाला असून केशराची विक्री सुमारे 630 प्रतिग्रॅम दराने केली जाते.
Check Also
रक्तवाहिन्यांमधील ‘झोंबी’ चा धोका
एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, जसजसे वय वाढते तसतसे रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या ‘झोंबी …
पांचजन्य वृत्तपत्र