कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक व्यवसायांचे स्वरूप बदलले आहे. त्यात चित्रफित संपादनाचे (व्हिडिओ एडिटिंग) क्षेत्रही अपवाद नाही. काही वर्षांपूर्वी एखादी चित्रफीत तयार करण्यासाठी चित्रीकरण, संपादन, ध्वनिसंयोजन, रंगसुधारणा आणि अंतिम रूप देण्यासाठी स्वतंत्र व्यक्तींची गरज भासत असे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने यातील अनेक कामे काही मिनिटांत करून देतात. त्यामुळे ‘आता चित्रफित संपादकांची गरजच राहणार नाही’, असा समज अनेक तरुणांमध्ये निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात परिस्थिती त्याच्या उलट आहे. चित्रफित संपादकांची गरज संपलेली नसून, केवळ चित्रफित कापून जोडणाऱ्या संपादकांची मागणी कमी होत आहे.
आज वृत्तमाध्यमे, जाहिरात संस्था, समाजमाध्यमे, संकेतस्थळे, दूरचित्रवाणी, चित्रपट, माहितीपट, शिक्षणसंस्था, विवाह समारंभ, व्यवसायविषयक प्रसिद्धी आणि वैयक्तिक आशय निर्मिती अशा असंख्य क्षेत्रांत चित्रफितींचा वापर वाढला आहे. विशेषतः लघुचित्रफिती, माहितीपर चित्रफिती, उत्पादनांची जाहिरात, संस्थांच्या समाजमाध्यम मोहिमा आणि वैयक्तिक प्रसिद्धीसाठी तयार होणाऱ्या चित्रफितींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कुशल संपादकासाठी संधी आहेत; मात्र त्याला केवळ संपादनाचे सॉफ्टवेअर येणे पुरेसे राहिलेले नाही.
नव्या युगातील एडिटरने सर्वप्रथम कथा सांगण्याची कला (स्टोरी टेलिंग) शिकणे आवश्यक आहे. कोणता दृश्यांश कुठे ठेवायचा, कोणता भाग वगळायचा, प्रेक्षकाचे लक्ष पहिल्या काही सेकंदांत कसे वेधायचे आणि शेवटपर्यंत ते कसे टिकवायचे, याचे भान असणे अधिक महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता दृश्ये जोडू शकते; परंतु आशयामागचा हेतू समजून घेऊन परिणामकारक मांडणी करण्यासाठी मानवी कल्पकतेची गरज आहे.
त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एडिटिंग टूल्सचा वापर शिकणे अत्यावश्यक झाले आहे. स्वयंचलित उपशीर्षके, आवाज स्वच्छ करणे, पार्श्वभूमी काढणे, रंगसुधारणा, दृश्यांची निवड, आवाजाचे अनुवाद, भाषांतर आणि विविध आकारांमध्ये चित्रफितीचे रूपांतर यांसारखी कामे आता कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने करू शकते. या साधनांचा प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे, तर आपल्या कामाचा वेग आणि दर्जा वाढवणारे सहकारी म्हणून वापर करणारा संपादक पुढे जाईल.
याशिवाय ध्वनीची जाण, रंगसंगती, अक्षररचना, प्रकाशयोजना, कॅमेऱ्याचे मूलभूत ज्ञान आणि समाजमाध्यमांवरील प्रेक्षकांचे वर्तन यांचीही माहिती असणे आवश्यक आहे. विशेषतः उभ्या आकारातील चित्रफिती, लघुचित्रफिती आणि विविध समाजमाध्यमांसाठी आशयाचे पुनर्रूपांतर करण्याचे कौशल्य रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे.
भविष्यात कंपन्यांना ‘व्हिडिओ एडिटर’पेक्षा ‘व्हिडिओ कंटेंट क्रिएटर’ किंवा ‘व्हिडिओ प्रोड्यूसर’ अधिक उपयुक्त वाटू शकतो.म्हणजेच चित्रीकरणापासून संकल्पना, पटकथा, संपादन, ध्वनी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि अंतिम प्रकाशनापर्यंत संपूर्ण प्रक्रिया हाताळणाऱ्या व्यक्तीला अधिक संधी मिळतील.
कालपर्यंत ज्याचे मूल्य सॉफ्टवेअर चालवण्याच्या कौशल्यात होते, ते आता कल्पकता, कथनशैली, तंत्रज्ञानाची जाण आणि प्रेक्षकांचे मानसशास्त्र समजून घेण्याच्या क्षमतेत आहे. त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरण्याऐवजी तिच्यावर प्रभुत्व मिळवावे. कारण उद्याच्या बाजारपेठेत चित्रफित तयार करणाऱ्यांची नव्हे, तर प्रेक्षकाला थांबवून ठेवणारी चित्रफित तयार करणाऱ्यांची किंमत अधिक असेल.
Check Also
‘ब्ल्यू इकॉनॉमी’तील कारकिर्द
वैद्यकीय शिक्षण, जैवतंत्रज्ञान, कृषीशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना परिचित असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत …
पांचजन्य वृत्तपत्र