लेख-समिक्षण

तंत्रज्ञानातून शेतीकडे..

शेतीतील आर्थिक अस्थिरता जवळून पाहत मोठे झालेले शशी कुमार यांनी आयुष्याची सुरुवात मात्र शेतीतून केली नाही. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शशी यांनी संगणकशास्त्राचे शिक्षण घेतले आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कारकीर्द घडवली. विप्रोमध्ये 13 वर्षे आणि एकूण 17 वर्षेतंत्रज्ञान उद्योगात काम केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कारकीर्द सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यामागे एकच प्रश्न होताशेतकऱ्याला शेतीतून स्थिर आणि सन्मानजनक उत्पन्न कसे मिळेल?
याच प्रश्नातून 2010 मध्ये शशी कुमार, डॉ. जी. एन. एस. रेड्डी आणि विप्रोमधील शशी यांच्या 27 सहकाऱ्यांच्या सहभागातून ‌‘अक्षयकल्प ऑरगॅनिक‌’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. सहकाऱ्यांनी स्वतःच्या पगारातून पैसे उभे करून व्यवसायाला सुरुवातीचे भांडवल दिले. मात्र वाटचाल सोपी नव्हती. योग्य व्यावसायिक प्रारूप शोधण्यात अनेक वर्षे गेली. आर्थिक अडचणींमुळे व्यवसाय बंद करण्याचा विचारही किमान 6 वेळा करावा लागल्याचे शशी कुमार यांनी सांगितले आहे.
या अनुभवातून ‌‘अक्षयकल्प‌’ने शेतकरीकेंद्रित दुग्धव्यवसायाचे प्रारूप विकसित केले. सेंद्रिय शेती, पशुपालन आणि दुग्धव्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आवश्यक मदत दिली जाते. त्यांच्याकडील दूध कंपनी खरेदी करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या प्रारूपामुळे सहभागी शेतकऱ्यांना सरासरी दरमहा 1 लाखांपर्यंत उत्पन्न मिळविणे शक्य झाले आहे.
आज या उपक्रमाशी हजारो शेतकरी जोडले गेले आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ‌‘अक्षयकल्प‌’चा महसूल सुमारे 393 कोटींवर पोहोचला, तर 2026 मध्ये 550 कोटींचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. एका अभियंत्याने सुरक्षित कारकीर्द सोडून शेतीकडे वळण्याची ही केवळ व्यक्तिगत यशोगाथा नाही. शेतीला तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि व्यावसायिक व्यवस्थापनाची जोड मिळाल्यास ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा देता येते, याचे ‌‘अक्षयकल्प‌’ हे बोलके उदाहरण ठरले आहे.

Check Also

दुधापासून कपडे निर्मिती

दुधाला फाटल्यानंतर तुम्ही खराब म्हणून फेकून देत असता त्यापासून डिझायनर साडी, कुर्तेआणि फॅशनेबल आऊटफिट तयार …