लेख-समिक्षण

संशोधन प्रकल्प सादर करताना…

पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प (रिसर्च प्रोजेक्ट) हा केवळ अभ्यासाचा एक भाग नसून, त्यांच्या शैक्षणिक क्षमतेची खरी कसोटी पाहणारा टप्पा असतो. हा प्रकल्प निवडण्यापासून ते त्याच्या अंतिम सादरीकरणापर्यंतचा प्रवास अत्यंत नियोजनबद्ध असावा लागतो. या प्रक्रियेत विषयाची योग्य निवड हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अनेकदा विद्यार्थी बाजारात उपलब्ध असणाऱ्या विषयांमुळे गोंधळात पडतात. अशा वेळी काहीतरी वेगळे करण्याच्या नादात अवाढव्य किंवा कठीण विषय निवडणे स्वतःला अडचणीत आणणारे ठरू शकते. त्याऐवजी ज्या विषयाची मूळ माहिती सहज उपलब्ध होऊ शकते आणि ज्या विषयात आपल्याला खरोखरच रस आहे, अशाच विषयाची निवड करावी. आपल्या आवडीच्या विषयात काम करताना उत्साह टिकून राहतो आणि संशोधनाचा दर्जाही सुधारतो.
प्रकल्पाचा विषय निश्चित करताना थेट एकाच नावावर शिक्कामोर्तब न करता, आपल्या क्षमतेला आणि आवडीला झेपतील अशा चार-पाच विषयांची एक प्राथमिक यादी तयार करावी. ही यादी घेऊन आपल्या मार्गदर्शक प्राध्यापकांशी चर्चा करावी. प्राध्यापक त्यांच्या अनुभवातून त्यातील सर्वोत्तम आणि आपल्या भविष्यासाठी, कौशल्यवाढीसाठी फायदेशीर ठरणारा पर्याय सुचवू शकतात. जर काही कारणास्तव आपल्याला आवडीचा विषय मिळाला नाही, तर उपलब्ध झालेला प्रकल्पच आपण अधिक चांगल्या पद्धतीने कसा मांडू शकतो, यावर लक्ष केंद्रित करावे. यासाठी मित्र, वरिष्ठ विद्यार्थी आणि पालकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. विषय ठरल्यानंतर त्यापुढील आव्हानात्मक भाग असतो तो म्हणजे पूरक घटकांची आणि माहितीची जुळवाजुळव करणे. प्रकल्पाची मूळ संकल्पना, त्याचा मुख्य उद्देश, समाजासाठी किंवा उद्योगासाठी असणारी त्याची उपयोगिता आणि सध्याची बाजारातील स्थिती या सर्व गोष्टींचा ताळमेळ बसवावा लागतो. यासाठी केवळ इंटरनेटवर विसंबून न राहता ग्रंथालयातील पुस्तके, जुने शोधनिबंध, वरिष्ठ विद्यार्थ्यांचे प्रकल्प आणि वृत्तपत्रांमधील संबंधित लेखांचा आधार घ्यावा लागतो. आजकाल संकेतस्थळांवर माहितीचा खजिना उपलब्ध असला, तरी त्या माहितीची सत्यता आणि वास्तवता तपासून पाहणे अत्यंत गरजेचे असते. गोळा केलेल्या माहितीमधून महत्त्वाच्या नोंदी (नोट्स) काढणे, नकाशे, चित्रे आणि आकृत्यांची जोड देणे यामुळे प्रकल्पाची व्याप्ती स्पष्ट होते आणि तो समजून सांगणे सोपे जाते.
अनेक संशोधनांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रातील सर्वेक्षणाची (सर्वे) गरज असते. अशा वेळी शंभर ते दोनशे लोकांकडून प्रश्नावली भरून घ्यावी लागते. या कामासाठी सुट्ट्यांच्या दिवसांचा वापर केल्यास दैनंदिन अभ्यासावर आणि कॉलेजच्या वेळेवर कोणताही परिणाम होत नाही. गरज भासल्यास संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन प्रकल्पाची विश्वासार्हता वाढवता येते. कोणत्याही संशोधन प्रकल्पाचे यश हे त्याच्या मांडणीवर आणि संरचनेवर अवलंबून असते. सुटसुटीत आणि आकर्षक मांडणी असलेला प्रकल्प परीक्षकांचे लक्ष वेधून घेतो. प्रकल्पाची मांडणी करताना प्रस्तावना, संशोधनाचा हेतू, विलेषणात्मक माहिती, फायदे-तोटे, उपाययोजना आणि शेवटी काढलेले निष्कर्ष असा एक निश्चित क्रम असावा.
प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेळेचे नियोजन अत्यंत कडक असणे आवश्यक आहे. जर एखादी संकल्पना किंवा प्रकरण समजण्यास कठीण जात असेल, तर तिथेच अडकून न पडता तो भाग तात्पुरता बाजूला ठेवून पुढील काम पूर्ण करावे. प्रकल्पाचा सारांश लिहिताना किंवा निष्कर्ष काढताना संभ्रम निर्माण झाल्यास थोडा वेळ विश्र्ांती घेऊन पुन्हा ताजेतवाने होऊन कामाला लागावे. संपूर्ण लिखाण पूर्ण झाल्यावर प्रकल्पाचा आद्यंत आढावा घ्यावा आणि त्यातील त्रुटी दूर कराव्यात. आपले संशोधन विलेषणात्मक आणि आटोपशीर असावे. अंतिम टप्प्यात केवळ अहवाल सादर न करता, आवश्यकतेनुसार स्लाईड शो किंवा लघुपटाच्या माध्यमातून केलेले सादरीकरण आपल्या प्रकल्पाला अधिक भरीव आणि प्रभावी बनवते.

Check Also

यशाच्या शिखरावर पोहोचायचंय?

आजच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात केवळ कठोर परिश्रम (हार्ड वर्क) करून चालत नाही. पूर्वीच्या काळी जो …