पाश्चात्त्य समाजांकडे पाहिले, तर तिथेही गुन्हे घडतात, तिथेही हिंसा आहे. पण खासगी नात्यांमध्ये होणारी अशी टोकाची क्रूरता तिथे सर्वसामान्य घरांमध्ये फारशी आढळत नाही; ती बहुधा अपवादात्मक, गंभीर मानसिक विकृतीच्या प्रकरणांपुरती मर्यादित राहते. तिथे नाते न पटल्यास वेगळे होणे स्वीकारले जाते; एखाद्या नात्यात फरफटत राहणे तिथल्या संस्कृतीला मान्य नाही. आपल्याकडे मात्र नाते तुटणे हे जणू काही स्वतःच्या अस्तित्वालाच आव्हान वाटते, आणि तिथूनच विध्वंसाची सुरुवात होते. हा फरक समजून घेतला, तर आपल्या समाजाच्या मानसिकतेत नेमके कुठे बदल आवश्यक आहेत, हे अधिक स्पष्ट होते.
प्रेम माणसाला घडवते. प्रेम जोडते. प्रेमाशिवाय आयुष्य अपुरे भासते, हे कुणीही नाकारणार नाही. पण अलीकडच्या काळात हेच प्रेम एका विचित्र वळणावर येऊन थांबले आहे. वर्तमानपत्रांची पाने उघडली की प्रेमाच्या नावाखाली घडणाऱ्या हत्यांच्या, क्रूरतेच्या बातम्या समोर येतात, आणि मन सुन्न होते. कुणी प्रेयसीचे तुकडे करते, कुणी होणाऱ्या पतीला डोंगरावरून ढकलून देते, तर कुणी जोडीदाराचा काटा काढण्यासाठी सुपारी देते. हे प्रेम आहे की प्रेमाच्या नावाखाली दडलेली दुसरीच काहीतरी वृत्ती, हा प्रश्न आता टाळता येण्यासारखा राहिलेला नाही.
या घटनांमध्ये एक समान धागा सापडतो, तो म्हणजे नाकारले जाणे किंवा न स्वीकारले जाणे. आपल्या इच्छेप्रमाणे नाते पुढे न सरकल्यास किंवा समोरच्याने नकार दिल्यास येणारा राग इतका टोकाला जातो की तो थेट हिंसेत रूपांतरित होतो. आणि विशेष म्हणजे, अशा घटनांमधील आरोपींच्या चेहऱ्यावर अनेकदा पश्चात्तापाचा लवलेशही दिसत नाही. जणू काही त्यांनी काही चुकीचे केलेच नाही, अशा भावनाशून्य नजरेने ते समोर येतात. हीच बाब अधिक भयावह आणि अस्वस्थ करणारी आहे. याचे मूळ कारण शोधायचे झाले, तर ते आपल्या बदलत चाललेल्या जीवनशैलीत सापडते. आजची पिढी ‘तात्काळ समाधाना’च्या (इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन) युगात वाढते आहे. हवे ते, हवे तेव्हा, हवे तसे मिळायला हवे, ही अपेक्षा फक्त वस्तूंपुरती मर्यादित राहिलेली नाही; ती आता नात्यांमध्येही शिरली आहे. समोरची व्यक्ती एक स्वतंत्र विचार, स्वतंत्र इच्छा असलेला माणूस आहे, हे विसरून तिला जणू आपल्या मालकीची वस्तू समजण्याची वृत्ती बळावते आहे. आणि जेव्हा ही ‘वस्तू’ आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, तेव्हा तिला संपवण्याचा विचार मनात येतो.
समाजमाध्यमांनी या समस्येला अधिकच खतपाणी घातले आहे. प्रत्येकाचे आयुष्य समाजमाध्यमांवर चकचकीत, परिपूर्ण दिसते. प्रेमकहाण्या, प्रेमविवाह, आनंदी जोडपी यांचे चित्र सतत डोळ्यासमोर येत राहते, आणि त्यातून एक अवास्तव अपेक्षांचे जाळे विणले जाते. प्रत्यक्ष आयुष्यात नाती इतकी सोपी कधीच नसतात. त्यात तडजोड असते, जबाबदारी असते, कधी नकारही असतो. हे वास्तव समोर आल्यावर जो भ्रमभंग होतो, तोच पुढे रागात रूपांतरित होतो. आणि हा राग बाहेर पडण्याचा मार्ग अनेकदा हिंसेच्या रूपाने समोर येतो.
या साऱ्या घटनाक्रमात आपली शिक्षणपद्धती आणि संगोपनाची पद्धतही तपासून पाहण्याची गरज आहे. आपण मुलांना अभ्यासात, करिअरमध्ये पुढे कसे जायचे हे शिकवतो, स्पर्धेत टिकून कसे राहायचे हे शिकवतो, पण नकार कसा स्वीकारायचा, अपयश कसे पचवायचे, हे शिकवायला मात्र विसरतो. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही, हे स्वाभाविक सत्य आपण मुलांपासून लपवत असतो किंवा दुर्लक्षित करतो. परिणामी, जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात असा नकार समोर येतो, तेव्हा तो पचवण्याची क्षमता अनेकांमध्ये तयारच झालेली नसते.
मुलांना भावना व्यक्त करायला शिकवणे, हाही एक दुर्लक्षित मुद्दा आहे. विशेषतः मुलांना लहानपणापासूनच ‘रडणे कमजोरीचे लक्षण आहे’ असे शिकवले जाते, त्यामुळे त्यांच्या मनात साचणाऱ्या भावनांना योग्य वाट मिळत नाही. त्या भावना आतल्या आत साचत राहतात आणि योग्य वेळी, योग्य पद्धतीने बाहेर न पडल्यास त्या विध्वंसक रूप धारण करतात. दुसरीकडे मुलींना जबाबदारीचे आणि उत्तरदायित्वाचे धडे तितक्याच गांभीर्याने दिले जात नाहीत. नात्यामध्ये दोन्ही बाजूंनी समान आदर आणि समान जबाबदारी असायला हवी, हे शिकवणे ही केवळ शाळांची नव्हे, तर घरांचीही जबाबदारी आहे.
माध्यमांची भूमिकाही या संदर्भात तपासण्यासारखी आहे. अशा घटना घडल्या की काही दिवस त्यांची चर्चा होते, चवीने तपशील मांडले जातात, मानसशास्त्रज्ञांची मते ऐकवली जातात, आणि मग पुढच्या घटनेची वाट पाहिली जाते. या साऱ्या प्रक्रियेत हे घडतेच का आणि ते थांबवण्यासाठी काय करता येईल, हा खरा प्रश्न मागे पडतो. समाज म्हणून आपणही या घटनांकडे केवळ एक ‘बातमी’ म्हणून पाहतो. त्यामागील खोल सामाजिक आजाराकडे पाहिले जात नाही. कायदा हा नेहमीच घटनेनंतरचा उपाय असतो. फाशीची शिक्षा, कठोर तुरुंगवास हे न्यायाचे प्रतीक असू शकतात, पण ते एखाद्याच्या मनात धुमसणारा द्वेष आधीच विझवू शकत नाहीत. खरा बदल हा कायद्याच्या आधी, घरांमधून, संस्कारांमधून यायला हवा. मुलांना लहानपणापासूनच हे शिकवायला हवे की, कुणाची साथ मिळणे हा अधिकार नसून एक सुयोग आहे आणि ती साथ सुटणे हा अपमान नसून जीवनाचा एक स्वाभाविक भाग आहे. नाती अधिकाराच्या तराजूत तोलण्याऐवजी परस्पर आदराच्या पायावर उभी राहायला हवीत.
आपण नेहमी गुन्हेगाराचा चेहरा शोधतो, पण त्या गुन्हेगाराला घडवणाऱ्या समाजाचा चेहरा पाहायला घाबरतो. न्यायालयांकडून कठोर शिक्षेची मागणी करतो, वृत्तवाहिन्यांवर चर्चा करतो, समाजमाध्यमांवर संताप व्यक्त करतो आणि मग पुढच्या सनसनाटी बातमीची वाट पाहतो. पण प्रेमाच्या नावाखाली होणारी प्रत्येक हत्या ही केवळ एका व्यक्तीचा अंत नसते; ती आपल्या सामूहिक अपयशाची, आपल्या आतल्या समाजाच्या पोखरल्या जाण्याची कहाणी असते. जोपर्यंत आपण ही मूळ समस्या समजून घेत नाही, तोपर्यंत नावे बदलत राहतील, घटनांची ठिकाणे बदलत राहतील, पण हे दुःखद चक्र थांबणार नाही.
एक विचित्र विरोधाभास इथे लक्षात घेण्यासारखा आहे. आपण सत्तेपुढे, अधिकारापुढे सहज नतमस्तक होणारा समाज आहोत मोठ्यांचा मान राखणे, वरिष्ठांसमोर आवाज न काढणे, ही आपली परंपरागत शिकवण आहे. पण हाच समाज आपल्या खासगी नात्यांमध्ये मात्र विलक्षण अधीर आणि निर्दयी बनताना दिसतो. सार्वजनिक जीवनात संयम दाखवणारी हीच माणसे घरात, प्रेमसंबंधांत मात्र चटकन टोक गाठतात. ही विसंगती आपल्या सामाजिक जडणघडणीतील एक खोल विरोधाभास दाखवते मोठ्यांसमोर नमते घ्यायचे, पण बरोबरीच्या नात्यात मात्र स्वतःचेच वर्चस्व हवे. पाश्चात्त्य समाजांकडे पाहिले, तर तिथेही गुन्हे घडतात, तिथेही हिंसा आहे. पण खासगी नात्यांमध्ये होणारी अशी टोकाची क्रूरता तिथे सर्वसामान्य घरांमध्ये फारशी आढळत नाही; ती बहुधा अपवादात्मक, गंभीर मानसिक विकृतीच्या प्रकरणांपुरती मर्यादित राहते. तिथे नाते न पटल्यास वेगळे होणे स्वीकारले जाते; एखाद्या नात्यात फरफटत राहणे तिथल्या संस्कृतीला मान्य नाही. आपल्याकडे मात्र नाते तुटणे हे जणू काही स्वतःच्या अस्तित्वालाच आव्हान वाटते, आणि तिथूनच विध्वंसाची सुरुवात होते. हा फरक समजून घेतला, तर आपल्या समाजाच्या मानसिकतेत नेमके कुठे बदल आवश्यक आहेत, हे अधिक स्पष्ट होते.- योगेश मिश्र, ज्येष्ठ विश्लेषक-स्तंभलेखक
Check Also
शुध्दीकरण मोहीमेचा धडाका
महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) पदावर तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यातील भेसळखोरीच्या साम्राज्याला …
पांचजन्य वृत्तपत्र