लेख-समिक्षण

भावनाप्रधान गीतांचा काळ सरला

हिंदी सिनेसृष्टीतील असंख्य अवीट गीतांनी तीन पिढ्यांहून अधिक काळ भारतीय जनमानसाच्या मनाला मोहिनी घातली. आजही या गीतांची जादू रसिकांच्या मनावर कायम आहे. नव्या रुपामध्ये ही गाणी सादर केली जातात तेव्हा त्यांनाही तितकीच लोकप्रियता लाभते आहे. दुर्दैवाने, आज अशा गाण्यांची कमतरता भासत आहे. यामागचे कारण प्रतिभा संपली आहे असे नसून, हृदयापर्यंत पोहोचणारा रस्ता बदलला आहे आणि तो खूप छोटा करण्यात आला आहे. आजच्या बॉलीवूड संगीताचे बारकाईने निरीक्षण केले तर असे स्पष्ट दिसते की, खालच्या सुरात गायलेली, स्थैर्य असलेली आणि आत्मसंवाद साधणारी गाणी आता केवळ अपवाद उरली आहेत.आज संगीत शांतपणे ऐकण्याऐवजी मोबाईल स्पीकर, सोशल मीडियावरील रील्स आणि जिममधील प्लेलिस्टसाठी तयार केले जाते. यावर उपाय म्हणून संगीतकारांनी बाजारपेठेच्या दबावाखाली न येता पुन्हा एकदा संथ लयीच्या प्रयोगांकडे वळणे गरजेचे आहे. – सोनम परब
———————-
भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाचा विचार केला तर असे लक्षात येते की, त्या काळी संथ लय, खोलवर जाणारे भाव आणि प्रामुख्याने मंद्र सप्तकात म्हणजेच खालच्या सुरात गायलेली गाणीच मुख्य प्रवाहाचा अविभाज्य भाग होती. ही गाणी केवळ त्या काळापुरती मर्यादित राहिली नाहीत, तर ती आजही तितकीच शाश्वत आणि टवटवीत वाटतात. मात्र, आजच्या काळात अशा भावनाप्रधान गीतांची जागा वेगवान बीट्स आणि आरडाओरडा करणाऱ्या उंच सुरांनी घेतली आहे. हा बदल केवळ संगीतापुरता मर्यादित नसून तो आपल्या काळाचा, बदलत्या मानसिकतेचा आणि बाजारपेठेचा एक गंभीर प्रश्न आहे.
खरे तर थेट काळजाला भिडणारे गाणे तेच असते जे केवळ ऐकतानाच नाही, तर ते संपल्यानंतरही बराच वेळ आपल्या कानात आणि मनाच्या कोपऱ्यात गुंजत राहते. आज अशा गाण्यांची कमतरता भासण्याचे कारण प्रतिभा संपली आहे असे नसून, हृदयापर्यंत पोहोचणारा रस्ता बदलला आहे आणि तो खूप छोटा करण्यात आला आहे. आजच्या बॉलीवूड संगीताचे बारकाईने निरीक्षण केले तर असे स्पष्ट दिसते की, खालच्या सुरात गायलेली, स्थैर्य असलेली आणि आत्मसंवाद साधणारी गाणी आता केवळ अपवाद उरली आहेत.
भारतीय शास्त्रीय परंपरेमध्ये खालच्या सुरांना गांभीर्य, ठहराव, विरह आणि आत्मीयतेचा स्वर मानले जाते. चित्रपट संगीतात जेव्हा या सुरांचा वापर झाला, तेव्हा त्यातून कोणताही गोंगाट निर्माण न होता एक निखळ अनुभूती जन्माला आली. उदाहरणार्थ, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले आणि लता मंगेशकर यांनी गायलेले ‌’लग जा गले‌’ हे गाणे खालच्या सुरातील सुखाची पराकाष्ठा आहे. या आवाजात कोणतीही घाई नाही की कोणताही दिखावा नाही, तर केवळ एक आर्तता आहे जी कुजबुजण्याच्या स्वरूपातही अमर झाली आहे. तसेच आर. डी. बर्मन यांच्या संगीतातील आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील ‌’चिंगारी कोई भडके‌’ हे गीत सिद्ध करते की, मध्यम आणि मंद्र स्वर वेदना ओरडून सांगत नाहीत, तर ती सहन करण्याची ताकद देतात. महंमद रफी आणि लता मंगेशकर यांचे ‌’अभी न जाओ छोडकर‌’ हे गाणे म्हणजे दोन प्रेमींमधील एक सुसंस्कृत संवाद आणि थांबण्याचा आग्रह आहे. तसेच हेमंत कुमार यांच्या संगीतातील ‌’वो शाम कुछ अजीब थी‌’ मध्ये सूर चालत नाहीत, तर ते एका ठिकाणी स्थिरावतात.
आज अशी गाणी न बनण्यामागे अनेक तांत्रिक आणि सामाजिक कारणे आहेत. प्रामुख्याने आपली ऐकण्याची सवय आता बदलली आहे. आज संगीत शांतपणे ऐकण्याऐवजी मोबाईल स्पीकर, सोशल मीडियावरील रील्स आणि जिममधील प्लेलिस्टसाठी तयार केले जाते. मंद्र सुरांच्या गाण्यांसाठी शांत वातावरण आणि एकाग्रतेची गरज असते, जी आजच्या धावपळीच्या काळात दुर्मिळ झाली आहे. आजची गाणी प्रामुख्याने ‌’महसूस‌’ होण्यासाठी नाही तर केवळ ‌’सुनाई‌’ देण्यासाठी बनवली जातात. वेगवान बीट्स आणि उंच सुरांचे वर्चस्व वाढले आहे कारण ते त्वरित लक्ष वेधून घेतात. पूर्वी गायक पात्राच्या भावनांचा शोध घ्यायचे, परंतु आज अनेकदा गायक स्वतःच परफॉर्मर बनले आहेत. शिवाय, खालच्या सुरात गाण्यासाठी जो रियाज आणि श्वासावर नियंत्रण लागते, त्याची कमतरता सध्याच्या चित्रपट सृष्टीत जाणवते. संगीत कंपन्यांनाही पहिल्या दहा सेकंदात गाणे हिट हवे असते, आणि मंद्र सुरांचे गाणे हळूहळू उलगडत जात असल्याने ते बाजारपेठेच्या दृष्टीने धोकादायक मानले जाते.
असे असले तरी, मधुर संगीत चित्रपट संगीताच्या मुख्य प्रवाहातून थोडे बाजूला फेकले गेले असले तरी ते पूर्णपणे संपलेले नाही. काही मोजक्या चित्रपटांत आणि स्वतंत्र संगीतात आजही असे प्रामाणिक प्रयत्न दिसतात. अरिजीत सिंग आणि अलका याज्ञिक यांनी गायलेले ‌’अगर तुम साथ हो‌’ हे गाणे आधुनिक काळातील मधुर संगीताची सशक्त पुनरावृत्ती आहे. या गाण्यातील अंतरे प्रामुख्याने मंद्र आणि मध्य सप्तकात टिकून आहेत. अलका याज्ञिक यांचा आवाज जुन्या काळातील गांभीर्य आठवून देतो तर अरिजीतचा संयम त्याला आजच्या काळाशी जोडतो. ‌’फिर ले आया दिल‌’ हे गाणेही उंच सुरांवर अवलंबून नसून श्वासांच्या चढ-उतारावर चालते. याशिवाय ‌’चन्ना मेरेया‌’ सारख्या गाण्याचा मुखडा जरी उंच पट्टीत असला, तरी त्याचा भावनिक आधार आणि अंतरे खालच्या सुरातच बसवलेले आहेत. अमित त्रिवेदींचे ‌’इकतारा‌’ हे गीतही कोणत्याही तामझामाशिवाय केवळ एकटेपणा आणि आत्मसंवादाच्या धूनवर चालते.
हा प्रश्न केवळ आवडीचा नसून तो बाजारपेठेचा आहे. मंद्र आणि मध्यम सुराची गाणी आवडणारा 30 पेक्षा जास्त वयोगटाचा एक मोठा वर्ग आजही अस्तित्वात आहे, जो संपूर्ण गाणे शांतपणे ऐकण्याची इच्छा ठेवतो. परंतु, सध्याच्या संगीत उद्योगाचे निर्णय ज्यांच्या आवडीवर अवलंबून आहेत, तो वर्ग म्हणजे दहा सेकंदात गाणे स्क्रोल करणारा तरुण वर्ग आहे. डेटा ॲनालिटिक्स आणि ट्रेंडनुसार आज वेगवान आणि लगेच पकड घेणाऱ्या सुरांना प्राधान्य दिले जाते. खालच्या सुरांचा परिणाम उशिरा होतो, पण बाजारपेठेला त्वरित निकाल हवा असतो. तसेच मोबाईल स्पीकर किंवा इयर बड्समध्ये लो फ्रिक्वेन्सीचे सूर अनेकदा दबले जातात, त्यामुळे निर्माते जाणीवपूर्वक अशा सुरांना प्राधान्य देतात जे लहान स्पीकरवरही स्पष्ट ऐकू येतील.
शेवटी, खालच्या सुरातील गाणी केवळ संगीताचा भाग नसून ती एक मानसिक गरज आहेत. आज अशा गाण्यांना पसंद करणारे लोक कमी झालेले नाहीत, तर ते केवळ बाजारातील निर्णायक शक्ती राहिलेले नाहीत. जोपर्यंत संगीतातील ‌’अनुभूती‌’ पेक्षा ‌’गोंगाटा‌’ला जास्त महत्त्व दिले जाईल, तोपर्यंत हे मधुर स्वर असेच परिघावर राहतील.
ध्वनीमुद्रण आणि ध्वनीप्रक्षेपणाच्या तंत्रज्ञानानेही या बदलात मोठी भूमिका बजावली आहे. जुन्या काळात रेकॉर्डिंगसाठी मोठे स्टुडिओ आणि नैसर्गिक वाद्यांचा वापर व्हायचा, ज्यामुळे आवाजातील नैसर्गिक खोली जपली जात असे. आजचे संगीत डिजिटल सॉफ्टवेअरवर तयार होते, जिथे अनेकदा आवाजाला कृत्रिमरित्या धारदार बनवले जाते. यामुळे मानवी आवाजातील तो ‌’बेस‌’ किंवा खालच्या पट्टीतला उबदारपणा कमी होत चालला आहे. तसेच, श्र्ोत्यांची जीवनशैली आता इतकी गतिमान झाली आहे की, संगीताकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन केवळ ‌’करमणूक‌’ असा उरला आहे. शांतपणे बसून सुरांच्या लहरी अंगावर घेण्यापेक्षा, गाणे हे पार्श्वभूमीला वाजत राहणारे एखादे उत्पादन बनले आहे.
यावर उपाय म्हणून संगीतकारांनी बाजारपेठेच्या दबावाखाली न येता पुन्हा एकदा संथ लयीच्या प्रयोगांकडे वळणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे जागतिक स्तरावर ‌’स्लो म्युझिक मुव्हमेंट‌’ जोर धरत आहे, तसाच विचार भारतीय चित्रपट संगीतात होणे आवश्यक आहे. मंद्र सप्तकातील गाणी केवळ ऐकणाऱ्याला शांत करत नाहीत, तर ती मानवी मनाच्या अस्वस्थतेला आणि एकाकीपणाला साद घालतात. जोपर्यंत संगीत कंपन्या केवळ ‌’व्हायरल‌’ होण्याच्या शर्यतीत राहतील, तोपर्यंत ही दर्जेदार गाणी दुर्लक्षितच राहतील. परंतु, अभिजात संगीताची ओढ असलेल्या श्र्ोत्यांनी अशा गाण्यांना दाद देऊन त्यांचे महत्त्व अधोरेखित केले, तरच हे चित्र बदलू शकेल आणि पुन्हा एकदा चित्रपट संगीतात ‌’भाव‌’ आणि ‌’खोली‌’ यांना मुख्य स्थान प्राप्त होईल.

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …