लेख-समिक्षण

खलनायकीचा नवा सुवर्णकाळ

सध्याच्या चित्रपटसृष्टीत खलनायक केवळ काळ्या-पांढऱ्या रंगातील नैतिक विभागणीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता अँटी-हिरो, ग्रे-झोन आणि गुन्हेगारी केंद्रित कथानकाचा प्रतीक बनला आहे. ‌‘के.जी.एफ.‌’, ‌‘पुष्पा‌’, ‌‘मिर्झापूर‌’, ‌‘छावा‌’ आणि ‌‘ॲनिमल‌’ यांसारख्या कलाकृतींनी हा ट्रेंड अधिक मजबूत केला. बॉक्स ऑफिसची आकडेवारी सांगते की, प्रेक्षक आता या गडद आणि हिंसक पात्रांमध्ये थरार शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर अक्षय खन्ना आणि बॉबी देओल यांनी ‌‘स्टार व्हिलन‌’चे एक नवे मॉडेल उभे केले आहे, जिथे नकारात्मक भूमिका करिअरला उभारी देण्याचे साधन आणि अभिनय कौशल्याची प्रयोगशाळा बनली आहे.
– सोनम परब, सिनेअभ्यासक
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात नायक नेहमीच केंद्रस्थानी राहिला असला, तरी कथेचे चक्र फिरवणारी खरी शक्ती खलनायकच असतो. अलीकडच्या काळात अक्षय खन्ना आणि बॉबी देओल या दोन दिग्गज कलाकारांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सुरुवातीला नायकाच्या भूमिका केल्या, मात्र कालांतराने त्यांनी स्वत:ला पूर्णपणे बदलले. नायकाचा मुखवटा उतरवून त्यांनी पडद्यावर खलनायकी वृत्ती अशा प्रकारे जिवंत केली की, आज त्यांना आधुनिक सिनेमाचे प्रभावी खलनायक मानले जात आहे. अक्षय खन्नाने ‌‘छावा‌’ आणि ‌‘धुरंधर‌’ या चित्रपटांतून आपल्या क्रूर अभिनयाची चुणूक दाखवली, तर बॉबी देओलने ‌‘आश्र्म‌’ या वेब सीरीज आणि ‌‘ॲनिमल‌’ चित्रपटातून भीती आणि आकर्षणाचे एक वेगळेच समीकरण मांडले. आजचा खलनायक केवळ नायकाचा विरोधक नाही, तर तो कथेचा इंजिन आणि प्रेक्षकांच्या कुतूहलाचा मुख्य बिंदू बनला आहे.
सध्याच्या चित्रपटसृष्टीत खलनायक केवळ काळ्या-पांढऱ्या रंगातील नैतिक विभागणीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता अँटी-हिरो, ग्रे-झोन आणि गुन्हेगारी केंद्रित कथानकाचा प्रतीक बनला आहे. ‌‘के.जी.एफ.‌’, ‌‘पुष्पा‌’, ‌‘मिर्झापूर‌’, ‌‘छावा‌’ आणि ‌‘ॲनिमल‌’ यांसारख्या कलाकृतींनी हा ट्रेंड अधिक मजबूत केला. बॉक्स ऑफिसची आकडेवारी सांगते की, प्रेक्षक आता या गडद आणि हिंसक पात्रांमध्ये थरार शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर अक्षय खन्ना आणि बॉबी देओल यांनी ‌‘स्टार व्हिलन‌’चे एक नवे मॉडेल उभे केले आहे, जिथे नकारात्मक भूमिका करिअरला उभारी देण्याचे साधन आणि अभिनय कौशल्याची प्रयोगशाळा बनली आहे.
अक्षय खन्ना: बौद्धिक आणि स्टायलिश दहशत
अक्षय खन्नाचा अभिनय हा संवेदनशीलता आणि थंड करिष्म्याचा अनोखा संगम आहे. ‌‘रेस‌’, ‌‘इत्तेफाक‌’ आणि ‌‘धुरंधर‌’ सारख्या चित्रपटांतील त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांना हे पटवून दिले की खलनायक नेहमीच हिंसक नसतो, तर कधीकधी तो बौद्धिकदृष्ट्‌‍या अत्यंत धोकादायक असू शकतो. तो सिनेमाचा ‌‘मॉडर्न व्हिलन‌’ आहे, जो स्टायलिश, विचारशील आणि रहस्यमय आहे. अक्षयचा प्रवास ‌‘हमराझ‌’पासून सुरू होऊन ‌‘छावा‌’मधील औरंगजेब आणि ‌‘धुरंधर‌’मधील रहमान डकैतपर्यंत पोहोचला आहे. त्याचे नियंत्रित संवाद, संथ पण भीतीदायक देहबोली आणि डोळ्यांतील थंडपणा त्याला 70-80 च्या दशकातील खलनायकांपासून वेगळे करतो. विशेषत: ‌‘धुरंधर‌’मधील त्याच्या पात्राची तुलना हॉलिवूडच्या प्रतिष्ठित खलनायकांशी केली जात आहे.
बॉबी देओल: मौनाचा थरार आणि पुनरागमन
रोमँटिक हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉबी देओलचे ‌‘व्हिलन युग‌’ ‌‘आश्र्म‌’मधील बाबा निरालापासून सुरू झाले आणि ‌‘ॲनिमल‌’मधील मुक्या अबरार हकपर्यंत येऊन स्थिरावले. अबरारसारख्या संवादाशिवाय असलेल्या पात्रात केवळ शरीर, डोळे आणि हिंसेच्या माध्यमातून प्रभाव पाडणे, हे आधुनिक ॲक्शन सिनेमाच्या सौंदर्याला साजेसे आहे. ‌‘आश्र्म‌’मध्ये त्याने धर्मगुरूच्या रूपात सत्ता आणि शोषणाचे जे जाळे विणले, त्यातून सिद्ध झाले की नकारात्मक भूमिका स्टारची हरवलेली चमक पुन्हा मिळवून देऊ शकतात. ‌‘रेस-3‌’ आणि ‌‘लव्ह हॉस्टेल‌’ नंतर आता इंडस्ट्री त्याच्याकडे मोठ्या प्रकल्पांसाठी एक जबरदस्त खलनायक म्हणून पाहत आहे.
हिंदी सिनेमातील खलनायकीचा वारसा
हिंदी सिनेमाच्या कथानकात नायकाचा प्रकाश तेव्हाच चमकतो, जेव्हा त्याच्यासमोर प्रबळ खलनायक उभा असतो. 1930 आणि 40 च्या दशकात के.एन. सिंग यांनी विचार करणाऱ्या गुन्हेगाराची प्रतिमा निर्माण केली. त्यानंतर प्राण यांचा काळ आला, ज्यांनी खलनायकीला प्रतिष्ठा आणि ग्लॅमर दिले. ‌‘परख‌’ आणि ‌‘बड़ी बहन‌’ मधील त्यांचा अभिनय जितका भीतीदायक होता, तितकाच तो प्रेक्षकांना आकर्षित करणारा होता. त्यानंतर अजित यांनी ‌‘गँगस्टर जेंटलमॅन‌’ची शैली आणली, तर प्रेम चोप्रा, रणजीत आणि गुलशन ग्रोव्हर यांनी एका वेगळ्या धाटणीची खलनायकी साकारली.
1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‌‘शोले‌’मधील गब्बर सिंगने हे सिद्ध केले की खलनायक देखील नायकासारखा लोकप्रिय होऊ शकतो. अमजद खान यांनी संवादफेकीतून जो आतंक निर्माण केला, तो आजही अविस्मरणीय आहे. हाच वारसा अमरीश पुरी यांनी पुढे नेला. ‌‘मिस्टर इंडिया‌’चा मोगॅम्बो असो किंवा ‌‘नायक‌’मधील मुख्यमंत्री, त्यांच्या आवाजातील जरब आणि कडक व्यक्तिमत्त्वाने खलनायकाला एक वेगळे वलय दिले.
प्रत्येक युगाचा खलनायक हा त्या काळातील समाजाचा आरसा असतो. 50-60 च्या दशकात तो भ्रष्ट संपत्तीचा प्रतीक होता, 70-80 च्या दशकात तो व्यवस्थेविरुद्धचा राग होता, तर 2000 नंतर तो मानवी अंतर्विरोधांचा चेहरा बनला. के.एन. सिंग यांची बुद्धिमत्ता, प्राण यांची दहशत, अजित यांचा डौल, अमजद खान यांची संवादशैली, अमरीश पुरी यांचा दरारा, अक्षय खन्नाची चतुराई आणि बॉबी देओलचा थंडपणा हे सर्व मिळून हेच दर्शवतात की हिंदी सिनेमाच्या सर्वात गडद आठवणी या खलनायकांमुळेच तयार झाल्या आहेत. आज जेव्हा सिनेमा वास्तववादाकडे वळत आहे, तेव्हाही प्रेक्षक अशा खलनायकाच्या शोधात असतात जो कथेला खोली देतो. अक्षय आणि बॉबीने दाखवून दिले की अभिनयाची खरी उंची केवळ नायक होण्यात नाही, तर खलनायकीच्या विविध थरांमध्ये दडलेली असते.
सिनेमाचा इतिहास चाळला तर असे लक्षात येते की काही अभिनेत्यांनी केवळ एका भूमिकेसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले आणि त्यातून अजरामर खलनायक जन्माला आले. नव्वदच्या दशकात शाहरूख खानने ‌‘डर‌’ आणि ‌‘बाजीगर‌’ मधून जो वेडापिसा प्रियकर किंवा सूडबुद्धीने पेटलेला तरुण साकारला, त्याने खलनायकीला एका नव्या ग्लॅमरस उंचीवर नेऊन ठेवले. हे पात्र केवळ वाईट नव्हते, तर ते परिस्थितीचे बळी होते आणि म्हणूनच प्रेक्षकांना त्या पात्रांबद्दल सहानुभूतीही वाटली. हीच परंपरा पुढे नेत संजय दत्तने ‌‘अग्निपथ‌’ मध्ये कांचा चीना साकारून क्रूरतेची एक नवीन सीमा गाठली. त्याचे ते भयानक रूप आणि अंगावर शहारे आणणारे हसणे हे आधुनिक काळातील रावणाचेच एक रूप होते, ज्याने नायकाच्या अस्तित्वाला खऱ्या अर्थाने आव्हान दिले होते.
दुसरीकडे सध्याच्या काळात खलनायकीची व्याख्या ‌‘ग्रे शेड‌’ मध्ये अधिक सामावलेली दिसते. नवाजुद्दीन सिद्दीकीने ‌‘रमण राघव 2.0‌’ मध्ये साकारलेला मानसिक दृष्ट्या अस्थिर मारेकरी असो किंवा सैफ अली खानने ‌’ओमकारा‌’ मध्ये साकारलेला लंगडा त्यागी, हे खलनायक आता केवळ मारामारी करत नाहीत तर ते मानवी मनाच्या कोपऱ्यातील अंधार पडद्यावर मांडतात. या पात्रांची स्वतःची एक विचारसरणी असते आणि ते स्वतःला कधीच चुकीचे मानत नाहीत, हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे आकर्षण ठरते. आजचे लेखक आणि दिग्दर्शक खलनायकाच्या बालपणापासून त्याच्या गुन्हेगारी विश्वात येण्यापर्यंतच्या प्रवासाला महत्त्व देत आहेत, ज्यामुळे प्रेक्षक केवळ त्यांच्या कर्माचा तिरस्कार करत नाहीत तर त्यांच्या मानसिकतेचा सखोल विचारही करू लागले आहेत.

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …