कधी-कधी पालकांशी एखाद्या मुद्द्यावरून चर्चा करणारे मुले नकळतपणे बोलून जातात की, तुम्हाला काय माहित किंवा तुम्हाला त्यात काय कळते? असं जेव्हा मुलं किंवा मुली बोलतात तेव्हा पालकांना वाटू लागते की आपला पाल्य मोठा होऊ लागला आहे. परंतु त्याचवेळी मुलांनाहीअसा भास होतो की आपण आता मोठे होऊ लागलो आहेत. आई-वडिलांपेक्षा आपल्याला अधिक कळते किंवा समजते. परंतु स्वत:चा अभिमान बाळगण्यासाठी नोकरी असणे, स्वतंत्रपणे राहणे किंवा स्वत:ची गाडी असणे इतकेच पुरेसे आहे काय? त्याचे उत्तर नाहीच असे असेल. कारण समाजात घडणाऱ्या किंवा अनुभवास येणाऱ्या अशा अनेक गोष्टी असतात, की त्या पाल्यांना माहित देखील नसतात आणि ते उगाचच स्वत:वर अभिमान बाळगत फिरत असतात. पुढील काही बाबी अशा आहेत की, त्याजर आपल्या अंगी असतील तर तुम्ही स्वाभिमान किंवा स्वत:वर गर्व करण्यास हरकत नाही. अर्थात कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो. परंतु दोष टाळून निर्दोष वागण्यावर भर देण्याचा प्रयत्न करायला हवा.
मित्रमंडळींशी दोस्ती : शालेय, कॉलेज आणि करियरमधून वाटचाल करत असताना मित्रमंडळींशी दोस्ती टिकवणे फार अवघड बाब मानली जाते. नवीन मित्र जमवताना जुन्या मित्रांचा विसर पडू नये, याची काळजी आपण घ्यायला हवी. मित्रांकडून मिळणारे मार्गदर्शन, सल्ला कधी उपयोगी पडेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे शक्य तेवढे मित्रांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महिन्यातून एकदा तरी डिनरचे आयोजन केले पाहिजे, जेणेकरून अनुभवाचे, जुन्या दिवसाचे शेअरिंग होऊन आपला मूड फ्रेश होईल. त्याचबरोबर अडचणींवरही सल्लामसलत झाल्यास मनावरचा भार हलका होऊ शकतो.
स्वावलंबी होणे : नोकरी असूनही तुम्ही स्वत:चे घर घेण्यास असमर्थ असाल तर तुम्हाला त्यात कमीपणा बाळगण्याचे कारण नाही. घरात राहूनही बचत कशी वाढवता येईल याचा विचार केला पाहिजे. घरच्या कामात हातभार लावून उधळपट्टी न करता नोकरीतून मिळणाऱ्या पैसा कसा वाढविता येईल, याचा विचार केला पाहिजे. त्यातून तुमच्यातील स्वतंत्रवृत्ती वाढीस लागतेच तसेच बचतीची सवय लागते. लग्नासाठी किंवा घर घेण्यासाठी आर्थिक नियोजन करताना पालकांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्यातून तुमच्यातील आर्थिक स्वावलंबीपणा वाढीस लागेल आणि ही बाब तुम्हाला अभिमानास्पद वाटू लागेल.
प्रयत्नशील राहणे : स्वप्नपूर्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक मोठा असतो, असे म्हटले जाते. युवकांनी सतत प्रयत्नशील राहणे, ही बाब सुद्धा त्याला अभिमानास्पद वाटणारी असते. नोकरी नसली तरी त्यासाठी त्याच्याकडून होणारे प्रयत्न हे त्याचा आत्मविश्वास वाढवितात. चिकाटी, जिद्द आणि प्रयत्न हे गुण त्याच्या अंगी असतील, तो स्वत:बाबत अभिमान बाळगत असतो.
छंद जोपासणे : नोकरी मिळवताना किंवा कॉलेजजीवनात अभ्यास असताना आपले छंदाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आपण आठवड्यातील काही वेळ राखून ठेवला पाहिजे. पुस्तक वाचणे, पेंटिंग करणे, मैदानावर खेळायला जाणे, फिरायला जाणे, धावणे. त्यामुळे कामाच्या दगदगीमुळे आलेली उदासिनता, कंटाळा दूर होण्यास हातभार लागेल.
ध्येयात स्पष्टता असावी : कॉलेज सुटल्यावर तुम्ही कोठे जाणार, या स्वरुपाचे प्रश्न पालक विचारत नाहीत. एका ठराविक वयानंतर पालकही तुमच्यावर निर्णय घेण्याचे अधिकार सोडून देतात. तुम्ही काय ठरविले आहे, भविष्यातील योजना काय, याबाबतही पालकही निर्णय तुम्हालाच घ्यायला लावतात. अशावेळी आपल्या विचारात आणि ठरविलेल्या ध्येयात स्पष्टता असावी. जेणेकरून भविष्याकडे वाटचाल करताना गोंधळ उडणार नाही आणि पालकांनाही प्रत्येकवेळी स्पष्टीकरण देण्याची वेळ भासणार नाही.
तुम्हाला समाजकारणाची आवड असेल तर गरीब वस्तीत जाऊन जागृती करण्यात भाग घ्या, वृद्धाश्रमांना , अनाथाश्रमांना भेट देऊन तिथल्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकायला मिळतं. त्यातून पैसा मिळाला नाही तरी चालेल कारण त्यातून मिळणारा अनुभव त्यापेक्षा खूप महत्वाचा असतो. तो तुम्हाला कारकिर्द घडवायला मदत करणार असतो.
ध्येय निश्चित करणे : युवक-युवतींनी आपले ध्येय, उद्दिष्ट्य निश्चित केली पाहिजेत. ते तुमचे स्वप्न नसेल, परंतु त्या दिशेने हळूहळू का होईना वाटचाल केली पाहिजेत. ध्येयाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल ते आपल्यातील आत्मविश्वास वाढविते. येणाऱ्या अडचणींवर मात करून आपण ते ध्येय कसे तडीस नेता येईल, याचाच नेहमी विचार केला पाहिजे.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र