एकेकाळी बॉलिवुडपटात ग्रामीण संस्कृती, परंपरा,चालीरिती, बाजारपेठ आदींचे दर्शन घडायचे. खेडेगाव कसे असते, हे चित्रपटातून कळायचे. बॉलिवुडपटातील नायक आणि नायिकेची पार्श्वभूमी ग्रामीण असायची आणि त्यांच्याभोवती कथानक फिरताना खेडगाव अनुभवास येत असे. कालांतराने बॉलिवुडपटात व्यावसायिकता आल्याने आणि लोकांची जीवनशैली बदलल्याने शहरीकरण वाढत गेले. साहजिकच पडद्यावरच्या शेतीची जागा मॉलने घेतली आणि झोपडीची जागा आलिशान बंगल्याने किंवा फ्लॅटने घेतली.- सोनम परब
अलिकडच्या काळातील हिंदी चित्रपटांचा उल्लेख केला तर ग्रामीण भाग किंवा खेड्याची संस्कृती गायबच झाल्याचे दिसून येते. कथानकातून गाव हद्दपार होणे म्हणजे देशातील ६० टक्के लोकसंख्या सिनेमातून हरवणे. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे सिनेमा कृष्णधवल काळात सतत येत असत. पण आता ग्रामीण निरागसपणा दुर्मीळ झाला आहे. आजच्या काळातील हिंदी चित्रपट प्रॉडट म्हणून समोर येत असून ते शहरवासीयांना केंद्रीत ठेऊन तयार केले जात आहेत. अर्थात ग्रामीण कथानकाच्या आधारे हिंदी चित्रपटाचा गल्ला भरलाच जातो असेही नाही. परंतु समांतर चित्रपटाचा मूळ गाभा ग्रामीण पार्श्वभूमी राहिलेली आणि त्याचेच प्रतिबिंब कथानकात उमटल्याचे दिसून येते. अंकुर, दो बीघा जमीन, सूरज का सातवा घोडा, अंतर्नाद यासारख्या चित्रपटांनी ग्रामीण भागाचे यशस्वी प्रतिनिधीत्व केले. मात्र आता अशा प्रकारचे चित्रपट तयार होताना दिसत नाहीत.
गावापासून दूर जाणारे चित्रपट
मागील एक दोन वर्षात ग्रामीण भागाचे चित्र दाखविणारा चित्रपट आठवतो का ते पाहा. फारतर ‘लापता लेडिज’चा उल्लेख करता येईल. परंतु त्याचे कथानक गावाभोवती नसून नव्या पिढीतील सुनांचे प्रतिनिधीत्व करणारे होते. पण आमीर खान यांच्या ‘लगान’ नंतर क्वचितच गावावर आधारित चित्रपट झळकले असतील. आजच्या काळातील चित्रपट हे उच्चभ्रू सोसायटी, कॉर्पोरेट कल्चर, आधुनिक जीवनशैलीभोवती फिरताना दिसतात. यात व्यवसायाच्या माध्यमातून कटकारस्थान दाखवतात. एखादी कंपनी ताब्यात घेण्यासाठी खलनायक- नायकाची धडपड दाखविली जाते.
आर्थिक कारणेही जबाबदार
आजकालच्या चित्रपटांचे बजेटही अव्वाच्या सव्वा असते. शंभर, दोनशे, पाचशे कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य ठेवतच त्याची निर्मिती केली जाते. कमाईच्या स्पर्धेमुळे चित्रपटांतील गावे गायब होऊ लागली. गावावर चित्रपट तयार केला तर अपेक्षेप्रमाणे कमाई होणार नाही, असे निर्मात्यांना वाटते. त्यामुळे काही प्रसंगापुरतीच गावाची आठवण काढली जाते. याबाबतचे उदाहरण द्यायचे असेल तर शाहरुख खानच्या ‘स्वदेश’चे द्यावे लागेल. हा चित्रपट ग्रामीण व्यवस्थेवर आधारित नसून मायदेशात परतलेल्या भारतीय नागरिकावर आधारित होता. यानंतर कुस्तीवर आधारित ‘दंगल’ चित्रपटही झळकला. परंतु त्यातील कथानक ग्रामीण भाग केंद्रीत नव्हते. ‘पीपली लाईव्ह’सारखा चित्रपट गावातील स्थिती आणि समस्येचे दर्शन घडविणारा होता. शेतकर्यांसाठी राबविण्यात येणार्या योजनांतून सरकारी अधिकारी कशा रितीने फायदा घेतात, याचे चित्र मांडण्यात आले होते. एकुणातच सध्या तरी ‘मदर इंडिया’, ‘करण अर्जुन’ यासारख्या ग्रामीण बाज असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीपासून निर्मात्यांनी हात आखडता घेतला आहे.
ग्रामीण कथानकांचा सुवर्णकाळ
१९६०-७० च्या दशकांतील बहुतांश चित्रपट ग्रामीण व्यवस्थेवर आधारित असायचे अणि तो एकप्रकारे सुवर्णकाळ समजला जाईल. मात्र जसजसे गावाचे शहरीकरण होऊ लागले, तसतसे ग्रामीण व्यवस्था गायब झाली. चित्रपटांचा इतिहास पाहिला तर प्रारंभीच्या काळातील अनेक चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीवेच असायचे. व्ही शांताराम यांचा दो बीघा जमीन, विमल रॉय यांचा यादगार, बंदिनी, राजकपूर यांचा आवारा, श्री ४२०, बुट पॉलिश यासारख्या चित्रपटांनी देश अणि जगाला ग्रामीण भागाच्या स्थितीचे सत्य सांगितले. गावावर आधारित चित्रपटांची शैली वेगळीच असायची आणि ती सर्वांना भारावून टाकत असे.
गावाकडील मातीचा सुगंध हरवला
चित्रपटातून गावाकडील मातीचा सुगंधच हरवला नाही तर लोकगीत देखील गायब झाले. अर्थात हा बदल अचानक झालेला नसून १९८० च्या दशकांपासून गावाचे दर्शन दुर्मीळ हेाऊ लागले. शेतीवाडी, ट्रॅटर, बैलगाडी, नांगर, फेटा, कुर्ता-धोतरचा पेहराव करणारा नायक, झाडाखाली भरणारी पंचायत, रम्य नदीकाठ यासारख्या गोष्टी कमी झाल्या. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही वेब मालिकेत गावांचे दर्शन घडविले जाते, परंतु त्यांचा फोकस गुन्हेगारी आणि गुन्हेगारांवर असतो. म्हणूनच ग्रामीण भाग, गावावर आधारित कथानक आणि शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांतील रुची कमी झाली आणि साहजिकच प्रेक्षकांच्या मनातील गावांची आठवणही विस्मरणात गेली.
आता ट्रेंडवर आधारित चित्रपट
आता तर खेडेगाव पडद्यावरून हद्दपारच झाले आहे. आता एखाद्या फॉर्म्युलावर आधारित चित्रपट तयार होतात. तोच फॉर्म्युला लोकांच्या पसंतीस पडला की निर्माते त्याच धाटणीचे चित्रपट तयार करण्यास उत्सुक राहतात. ‘लगान’च्या यशानंतरही त्याचे अनुकरण झाल्याचे दिसत नाही. कारण ग्रामीण भागावरचे चित्रपट सरसकट हीट ंहोतीलच याची खात्री निर्मात्यांना नव्हती. ऐतिहासीक ‘शोले’ चित्रपट हा ग्रामीण पार्श्वभूमीचा आहे. परंतु तो केवळ गावामुळे हीट झाला नाही तर ठाकूर आणि गब्बर सिंग यांच्या संघर्षाने यशस्वी ठरला आणि यात गावपण हरवले गेले. पण त्यात बारा बलुतेदारांचे समर्पक चित्रण केले आहे. ग्रामीण आयुष्य आणि प्रथांवर आधारित चित्रपट तयार करणारे ‘राजश्री प्रॉडशन’ देखील संयुक्त कुटुंब आणि त्यातील कटकारस्थानावर आधारित मल्टीस्टार चित्रपट तयार करत आहेत. नदिया के पार, बालिका वधू, गीत गाता चल यासारखे दर्जेदार चित्रपट तयार करणार्या या कंपनीने गावातील आपला ‘मुक्काम’ हलवला आहे. प्रत्यक्षात सर्वकाही पैशाचा खेळ आहे. गल्लाभरू चित्रपटांची लाट असल्याने ग्रामीण भागाशी निर्मात्यांना देणेघेणे पडलेले नाही आणि त्यांनाही वाहत्या गंगेत हात धुवायचे आहेत. साहजिकच चित्रपटातून गावांची पाटी पुसट झाली आहे.
मराठी चित्रपटातील स्थिती
मराठी चित्रपटाचा वैभवशाली इतिहास ग्रामीण कथानकाने नोंदविला आहे. दादा कोंडके यांचे सर्व सुपरहिट चित्रपट ग्रामीण बाजवर आधारित आहेत. १९८० दशकांपर्यंत मराठी चित्रपटांचा केंद्रबिंदू शेतकरी, खेडेगाव, गावातील सावकारी यावर आधारित राहिलेला आहे. पण शहरीकरणाची मराठी चित्रपटांनाही लागण झाल्याने विनोदी, गुढपटांची लाट आली. ग्रामीण भागावर आधारित काही प्रमाणात चित्रपट तयार होत असले तरी त्याचा संबंध ताटातील लोणचेप्रमाणे असतो. तोंडी लावण्यापुरता.
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र