लेख-समिक्षण

उत्कंठा शिगेला

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सहा नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि आता दुसर्‍या टप्प्याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांतच बिहारच्या जनतेचा कौल कळणार आहे. पहिल्या टप्प्यात १३१४ उमेदवारांसाठी बिहारी जनतेने मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यातील निकालातूनच बिेहारचा मुख्यमंत्री ठरणार आहे.
उमेदवारांची संख्या आणि मतदान याचे आकलन केले असता यंदाची बिहारची निवडणूक अधिक उत्कंठावर्धक, चुरशीची आणि अटीतटीची होत असल्याचे स्पष्ट होते. बिहारच्या पहिल्या टप्प्यात मिथिलांचल, कोसी, मुंगेर विभाग आणि भोजपुर पट्ट्यातील मतदारसंघाचा समावेश होता. या ठिकाणचे राजकारण नेहमीच जातीय समीकरण आणि स्थानिक चेहर्‍यांभोवती घुटमळत राहिले आहे. या भागात नितीश कुमारांचा जेडीयू तेजस्वी यादवांचा आरजेडी, भाजप, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्यात थेट लढत होत आहे. एकुण १३१४ उमेदवारांपैकी १२२ महिला रिंगणात उतरल्या आणि यानुसार बिहारच्या राजकारणात महिलांचा सक्रिय सहभाग वाढत असल्याचे दिसून येते.
पहिल्या टप्प्यातील लढाईत एनडीए आणि महाआघाडी यांच्यात थेट लढाई झाली आहे. मात्र दोन्हीकडे जागावाटप आणि अन्य कारणांवरुन अंतर्गत संघर्ष तितकाच तीव्रतेने सुरू होता. महाआघाडीकडून आरजेडीने ७२ जागा, काँग्रेस २४ आणि सीपीआय (माले) ने १४ जागा लढविल्या. त्याचेवळी सीपीआय आणि व्हिआयपीने प्रत्येकी ६ जागा, सीपीएम तीन आणि इंडियन इंलूसिव्ह पक्षाने २ जागांवर लढत दिली. ‘एनडीए’चा विचार केल्यास जेडीयूने ५७, भाजप ४८, लोजप (रामविलास) १३, आरएलएम दोन आणि हम (जीतनराम मांझी यांचा पक्ष) हा एका जागेवर नशिब आजमावत आहेत. याशिवाय खासदार असददुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ८ जागांवर उमेदवार उभे केले तर जनसुराज पक्षाने ११९ जागांवर उमेदवार उभे केले. या आकडेवारीवरून निवडणुकीचे गणीत ठरविले जात असले तरी प्रत्यक्षात उमेदवारांची कामगिरी आणि विभागनिहाय समीकरणावरच सर्वकाही अवलंबून आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ३२ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्याचे ‘एडीआर’ (असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स) च्या अहवालात म्हटले आहे. त्यांच्या मते प्रत्येक तिसरा उमेदवार हा कोणत्या ना कोणत्या खटल्याचा सामना करत आहे. यापैकी २० टके उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. बिहारच्या राजकारणाची हीच एक काळी बाजू असून इथे गुन्हेगारी, दडपशाही आणि राजकारण यांचे साटेलोटे राहिले आहे.
मागील निवडणुकीच्या निकालाचे आकलन केल्यास २०२० मध्ये या १२१ जागांवर एनडीए आणि महाआघाडी यांच्यात काटे की टक्कर झाली होती. महाआघाडीने ६१ जागा तर एनडीएने ५९ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी चिराग पासवान हे एकटेच मैदानात उतरले आणि तेव्हा त्यांना एकच जागा जिंकता आली. आरजेडीने चांगली कामगिरी करत ४२ जागा जिंकल्या. भाजपला ३२, जेडीयूला २३ आणि काँग्रेसला आठ, ‘माले’ ला सात, व्हिआयपीला चार आणि सीपीआय व सीपीएमला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या. या कारणांमुळेच यावेळी आरजेडीने अधिक जागा पदरात पाडून घेतल्या आणि त्या कायम ठेवण्याचा दबाव देखील त्यांच्यावर आहे. त्याचवेळी जेडीयू आणि एनडीएसमोर गमावलेले लोकमत पुन्हा मिळवण्याचे आव्हान आहे. नितीश कुमार यांच्यासाठी पहिला टप्पा हा अग्निपरीक्षेसारखाच होता. ५७ जागांवर जेडीयू लढत असताना पैकी ३६ जागांवर आरजेडी, तेरा जागांवर काँग्रेस आणि सात जागांवर सीपीआय माले यांच्याशी थेट मुकाबला होता. याशिवाय दोन जागांवर व्हिआयपीशी लढत दिली. या कारणामुळेच नितीश कुमार यांचे राजकीय भवितव्य याच पहिल्या टप्प्यावर अवलंबून असल्याचे म्हटले गेले. थोडेफार कमी जास्त झाले तर नितीश कुमार यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अडचणीत येऊ शकते. गेल्या दोन दशकांपासून नितीशकुमार बिहारची सत्ता सांभाळत आहेत आणि म्हणूनच यावेळची त्यांच्यासाठी ही आरपारची लढाई होती. त्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे.
दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्यासाठी पहिला टप्पा हा सत्तेच्या मार्गातील पहिली पायरी म्हणावी लागेल. मागील वेळी त्यांनी भोजपूर आणि सारण पट्ट्यात आरजेडीचा झेंडा फडकविला आणि यावेळी त्यांचे ध्येय या भागात आघाडी कायम ठेवण्याचे आहे. तेजस्वी यादव हे स्वत: राघोपूर मतदारसंघातून मैदानात असून या जागेवर त्यांचा पारंपरिक दबदबा राहिला आहे. याठिकाणचा त्यांचा विजय सोपा आहे. परंतु अन्य जागांवर लढणारे घटक पक्ष काँग्रेस आणि डाव्यांच्या उमेदवारांनी देखील चांगली कामगिरी करणे अपेक्षित असून हेच त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे. मागील वेळी घटक पक्षांची कामगिरी सुमार राहिल्याने तेजस्वी यादव यांना बहुमत गाठता आले नाही. यावेळी त्यांचे संपूर्ण लक्ष्य महाआघाडीच्या ऐयावर असून त्या आधारवर त्यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न निर्भर आहे.
पहिल्या टप्प्यात नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील १६ सदस्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. यात जेडीयूचे पाच आणि भाजपच्या ११ मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपचे आरोग्यमंत्री मंगल पांडे (सिवान), उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी (तारापूर), दुसरे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा (लखिसराय) हे मैदानात आहेत. याशिवाय पाटण्याच्या बांकीपूर येथून नितीन नवीन, दरभंगाच्या जाले मतदारसंघातून राजु कुमार सिंह, अमनौर येथून आयटी मंत्री कृष्ण मंटू, बिहारशरीफ येथून पर्यावरण मंत्री सुनीलकुमार यांच्यासारखे दिग्गज चेहरे उतरले आहेत. ‘जेडीयू’चे जलस्रोत मंत्री विजय चौधरी हे सरायरंजन येथून, समाज कल्याण मंत्री मदन सहानी बहादूरपूर येथून, माहिती मंत्री महेश्वर हजारी कल्याणपूर येथून मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासाठी ही लढाई राजकीय भवितव्य निश्चित करणारी आहे.
प्रशांत किशोर यांचा पक्ष ११९ जागांवर लढत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एसआयआर नंतर झालेल्या या पहिल्या निवडणुका आहेत. एसआयआरमध्ये अनेक मते वगळण्यात आली, तर काही नवीन मते जोडण्यात आली आहेत. बिहारमधील विधानसभा निवडणुकांचा विचार करता, १९५१-५२ ते २०२० पर्यंत मतदानाची टक्केवारी केवळ तीन वेळा ६० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. १९९० मध्ये मतदानाची टक्केवारी ६२.०४ होती, १९९५ मध्ये ६१.७९ टक्के होती आणि २०२० मध्ये सर्वाधिक ६२.५७ टक्के मतदान झाले. तथापि, यावेळी सर्व विक्रम मोडले आहेत. पहिल्याच टप्प्यात मतदानाची टक्केवारी ६४.६९ टक्के होती. पुढच्या टप्प्यातही त्याच गतीने मतदान सुरू राहिले तर ते बिहारच्या इतिहासातील एक विक्रम ठरेल. भारतीय निवडणूक इतिहासात, सामान्यतः असे मानले जाते की जेव्हा मतदान जास्त असते तेव्हा जनता बदल (अँटी-इंकम्बन्सी) इच्छिते. तथापि, नेहमीच असे होत नाही. बिहारमधील मतदार सक्रियता कोणत्या दिशेने जाणार हे पहावे लागेल.-प्रा. पोपट नाईकनवरे,
राज्यशास्र अभ्यासक

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …