लेख-समिक्षण

विजय एका स्वप्नाचा

जेव्हा मी लहान होते, तेव्हा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं खेळणं म्हणजे वडिलांची क्रिकेटची बॅट होती. ती बॅट माझ्यापेक्षा उंच, जड आणि मला हाताळायलाही अवघड वाटायची. पण तीच बॅट माझं पहिलं स्वप्न बनली. मला अजून आठवतं, मी अंगणात उभी राहून ती बॅट दोन्ही हातांनी उचलायचा प्रयत्न करायचे आणि वडिलांना म्हणायचे की मी सुद्धा भारतासाठी खेळणार आहे. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की त्या छोट्या वायात माझं संपूर्ण आयुष्य दडलंय.
एक दिवस बाबांनी तीच बॅट थोडी छोटी करून मला दिली. ती बॅट हातात घेतल्यापासून मी कधीच क्रिकेटमध्ये चमकण्याचं स्वप्न पाहणं थांबवलं नाही. टीव्हीवर भारताचे सामने पाहताना मला नेहमी वाटायचं ‡कधी ना कधी मी सुद्धा ही निळी जर्सी घालून खेळेन. तेव्हा मला महिला क्रिकेटबद्दल फारसं माहीत नव्हतं, पण मनात एक ठाम विश्वास होता की‡ काहीतरी मोठं करायचं आहे.
अखेर २ नोव्हेंबर २०२५ रोजी तो दिवस उगवला. नवी मुंबईमध्ये विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढत शिगेला पोहोचलेली असताना शेवटचा चेंडू टाकला गेला आणि भारत विजेता ठरला. त्या क्षणी माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. डोळ्यातून आनंदाश्रूंचा बांध फुटला. जगज्जेतेपदाची ट्रॉफी हातात घेताना मी बालपणातली ती छोटी बॅट आठवत होते. तीच मला इथपर्यंत घेऊन आली. म्हणूनच मी मनापासून सांगते, स्वप्न पाहणं कधीही थांबवू नका. तुम्हाला माहित नाही की तुमचं नशीब तुम्हाला कुठे घेऊन जाईल. माझं नशीब मला क्रिकेटच्या मैदानात घेऊन आलं, पण त्यामागे होती एकच गोष्ट न डळमळणारा विश्वास. माझ्या प्रवासात अनेक अडथळे आले, अनेक वेळा मन खचलं. पण मी नेहमी स्वतःशी ‘हे शक्य आहे’ असे म्हणत राहिले. कारण गोष्टी कशा घडतील, हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही; पण काहीही झाले तरी मी हार मानणार नाही, हे तुम्ही हे नक्की ठरवू शकता. मला वाटतं, हाच माझ्या प्रवासाचा सर्वात मोठा धडा आहे. आज मी स्वतःला भाग्यवान समजते की, मी जे काही मनापासून मागितलं, ते देवाने ऐकलं. सगळं काही योग्य वेळी घडत गेलं आणि अखेर आपण विश्वविजेते झालो. जेतेपदाची ट्रॉफी माझ्या हातात आली, तेव्हा मी देवाचे आणि माझ्या संघाचे आभार मानले. कारण यानिमित्तानं एका पिढीचं स्वप्न पूर्ण झालं.
मला आजही २०१७ चा लंडनचा सामना आठवतो. इंग्लंडविरुद्ध आम्ही केवळ ९ धावांनी हरलो होतो. संपूर्ण सामना आपल्या नियंत्रणात होता, पण शेवटच्या काही क्षणांनी सगळं बदललं. आम्ही भारतात परत आलो तेव्हा मन तुटलं होतं. पण विमानतळावर लोकांनी आम्हाला फुलांनी, जयघोषांनी स्वागत केलं आणि जाणवलं की संपूर्ण देश आमच्यासोबत आहे. त्या दिवशी आपण एकटं खेळत नाही, आपल्या मागे संपूर्ण भारत उभा आहे याची खर्‍या अर्थाने जाणीव झाली. यंदाच्या विश्वचषकाच्या विजयातही प्रत्येक चाहत्याचं योगदान आहे. मला वाटतं, जेव्हा लाखो लोक एकत्र प्रार्थना करतात, तेव्हा विश्वही त्यांचं ऐकतं.
आजही माझ्याकडे ती पहिली बॅट आहे. ती पाहिली की मला माझ्या बालपणाचा प्रत्येक क्षण आठवतो. धूळ उडवलेले रस्ते, उन्हात घाम गाळत केलेला सराव आणि प्रत्येक पराभवानंतर पुन्हा उभं राहण्याची जिद्द हे सारं काही डोळ्यासमोर तरळतं. म्हणून मी पुन्हा सांगते की, स्वप्नं पाहा. कारण जेव्हा तुम्ही स्वप्न पाहता, तेव्हाच तुमचं आयुष्य अर्थपूर्ण होतं. भरपूर मेहनत करा, आपल्या स्वप्नावर, ध्येयावर आणि स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. स्वतःवर कधीच शंका घेऊ नका. एक दिवस तुमचं स्वप्नही माझ्याप्रमाणेच प्रत्यक्षात उतरेल. — हरमनप्रित कौर

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …