महान संशोधक सर जेम्स लार्क रॉस यांची जीवनगाथा धैर्य, चिकाटी आणि ज्ञानलालसेचा महाग्रंथ आहे. स्कॉटलंडमध्ये जन्मलेला हा तरुण लहानपणापासून समुद्राकडे ओढला गेला. समुद्रावर जावे हेच त्याचे पहिले स्वप्ने होते. प्रसिद्ध आर्टिक संशोधक सर जॉन रॉस यांच्या साहसकथा ऐकत तो मोठा झाला आणि बारा वर्षांचा असतानाच त्याने नेव्हीत प्रवेश केला. त्यानंतर समुद्रच त्याचे विद्यापीठ ठरले. गणित, नौकानयन, भूचुंबकत्व यांचे धडे त्याने जहाजावर घेतले आणि अनोख्या आव्हानांचा सामना करीत तो खर्या अर्थाने वैज्ञानिक बनला.
रॉसचा जीवनमार्ग हा केवळ साहसाचा नव्हता, तर ज्ञानासाठी केलेल्या संघर्षाचा होता. पृथ्वीचा अदृश्य चुंबकीय नकाशा तयार करण्याचे स्वप्न त्याने पाहिले. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असणारे डेलिनेशन, डिप आणि इंटेन्सिटी या भूचुंबकीय घटकांचे मोजमाप करणे, ही त्याच्यासारख्या संशोधकांची ध्येययात्रा होती. रॉससाठी विज्ञान आणि साहस हे वेगळे नव्हते, ते एकमेकांना पूरक होते.
आर्टिक मोहिमांत तो सतत सहभागी झाला. कधी बर्फाच्या डोंगरांमध्ये अडकला, कधी भुकेचा सामना करावा लागला तर कधी रक्त गोठवणार्या थंडीच्या संकटातून जावे लागले, पण त्याने कधीही माघार घेतली नाही. १८३१ साली त्याने कॅनडाच्या उत्तरेकडील भूमीत पोहोचून पृथ्वीच्या उत्तर चुंबकीय ध्रुवाचे स्थान प्रत्यक्ष शोधून काढले. ही कामगिरी एखाद्या नकाशावर बिंदू चिन्हांकित करण्याइतकी सोपी नव्हती, तर मानवजातीला पृथ्वीच्या अदृश्य शक्तींच्या स्वरूपाची नवी दिशा दाखवणारी होती.
रॉसचा सर्वात मोठा पराक्रम अंटार्टिक मोहिमेत दिसून येतो. १८३९ साली तो एरेबस आणि टेऱर या दोन जहाजांचा प्रमुख बनून दक्षिण ध्रुवाकडे निघाला. कल्पनाही न केलेल्या बर्फभिंती, भीषण थंडी, अथांग समुद्र आणि मृत्यूसमान धोके यांचा सामना करून त्याने व्हिटोरिया लँड, माऊंट एरेबस आणि माऊंट टेऱर यांसारख्या नवी भूमी आणि पर्वत शोधले. त्याने पाहिलेली ४५० मैलांची बर्फाची भिंत आजही रॉस आइस शेल्फ या नावाने ओळखली जाते. हे सर्व करताना त्याच्या मनात फक्त एकच विचार होता मानवजातीला नवे ज्ञान द्यायचे. त्याच्या प्रवासात वैयक्तिक सुखसोयींना फारसे स्थान नव्हते. महिनोनमहिने बर्फात अडकून राहावे लागायचे, जहाज बुडण्याची भीती असायची, परत फिरण्याची वेळ यायची; पण अशा असंख्य अडचणी येऊनही त्याने प्रत्येक वेळी अपयशाला पायरी मानले आणि नव्या प्रयत्नांनी मार्ग काढला. विज्ञानासाठी त्याने आपले जीवन धोयात घातले, पण त्याच धाडसामुळे आज आपण पृथ्वीच्या चुंबकत्वाबद्दल आणि अंटार्टिक प्रदेशाबद्दल इतकी माहिती मिळवू शकलो.
मोठी स्वप्ने पूर्ण करायची असतील तर संकटांना मिठी मारावीच लागते ही बाब रॉसच्या जीवनप्रवासातून स्पष्ट होत नाही काय?
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र