लेख-समिक्षण

गळचेपी करणारी अटक

लडाखमधील सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना करण्यात आलेली अटक हा सध्याचा हॉट टॉपिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्यांच्या अटकेचा निषेध केला जात आहे. भारतातल्याही अनेक ज्येष्ठ विचारवंतांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वांगचुक यांच्या अटकेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत सरकारला ही अटक महागात पडेल, असा इशारा दिला आहे. अगदी मोदी सरकारचे समर्थक समजले जाणारे काही विचारवंतसुद्धा या अटकेच्या विरोधात आपले मतप्रदर्शन करताना दिसत आहेत. वांगचुक यांच्यावर देशद्रोहाची कलमे लावली गेली आहेत, हा सगळ्यात आक्षेपाचा भाग आहे. जो माणूस लडाखमधील चिनी आक्रमणाच्या विरोधात आवाज उठवतो आहे त्याच माणसाला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करणे हे केवळ सुडापोटीच झालेले काम आहे यावर बहुतांश लोकांचे एकमत होताना दिसते आहे. सोनम वांगचुक यांनी ज्या मागण्यांसाठी उपोषण आंदोलन सुरू केले होते, त्या मागण्या काही अवास्तव किंवा जगावेगळ्या नाहीत. उलटपक्षी भारतीय जनता पक्षानेच ज्या मागण्यांचे लडाखवासीयांना निवडणुकांपूर्वी जाहीर आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची केंद्र सरकारला आठवण करून देण्याचे काम सोनम वांगचुक करीत आहेत. त्यासाठीच ते उपोषणाला बसले होते. लडाखवासियाना स्वतंत्र राज्य हवे आहे, तसेच या राज्याचा किंवा या प्रदेशाचा समावेश घटनेच्या सहाव्या शेड्युलमध्ये करावा अशी त्यांची मागणी आहे. या दोन्ही मागण्या भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच मान्य केलेल्या आहेत. त्या मागण्यांची पूर्तता कधी होणार असा लडाखमधील आंदोलकांचा साधा सवाल आहे. पण निवडणुकीपूर्वी आश्वासने द्यायची आणि निवडणुका झाल्या की तेथून काढता पाय घ्यायचा अशा राजकीय प्रवृत्तीनुसार लडाख वासियांच्या मागण्यांनाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या, त्यातून लडाखमधील नागरिकांचा असंतोष दिवसेंदिवस वाढत गेला. त्याचीच परिणिती हिंसाचारात झाली. या आंदोलनाला संयमित स्वरूपात हाताळण्यापेक्षा त्यांच्यावर थेट बंदुका चालवल्या गेल्या आणि या आंदोलनाला कारणीभूत ठरल्याबद्दल सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून कारागृहात डांबण्यात आले. त्यांना लडाखहून राजस्थानच्या तुरुंगात नेण्यात आले आहे. त्यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचाही आरोप ठेवला गेला आहे. त्यांच्या स्वयंसेवी संस्थेला विदेशातून देणग्या मिळतात आणि त्यातून ते देशात अस्थिरता माजवतात हा नेहमीचा आरोपही त्यांच्यावर केला गेला. त्यांना विदेशातून देणग्या घ्यायला बंदी केली गेली आणि हे आंदोलन सरसकट शस्त्राच्या बळावर चिरडले गेले. देशाच्या भवितव्याचा विचार करून कुठल्याही प्रांतातील जनसमुहांना अस्थिर ठेवणे किंवा त्यांच्यामध्ये सतत असंतोष धुमसता ठेवणे हे देशहिताच्या दृष्टीने धोकादायकच आहे. भविष्यात त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात याचा अंदाज केंद्रातील सरकारला एव्हाना यायला हवा. त्यामुळे सोनम वांगचुक यांच्यावर दडपशाही करण्यापेक्षा त्यांना बरोबर घेऊन लडाखमध्ये कायमस्वरूपी शांतता कशी प्रस्थापित करता येईल आणि हा प्रदेश कायमस्वरूपी भारताशीच कसा जोडलेला राहील यासाठी केंद्राने प्रयत्न करायला हवेत.- – राकेश माने

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …