लेख-समिक्षण

यशोकहाणी भूगर्भशास्त्रज्ञाची

लंडनजवळील ओल्ड सारम कॅम्प येथे डॉ. रॅडलिफ यांच्या शाळेतील काही नवीन मुले एका जुन्या बोगद्याच्या तोंडाशी थांबली होती. तो बोगदा प्राचीन काळी पाण्याकरिता वापरला जात असे. काळोख्या बोगद्यात शिरताना सगळ्यांची भीतीने थरथर कापणारी अवस्था होती. त्याच वेळी मोठ्या मुलांनी त्यांच्या टोप्या आत फेकून दिल्या. भीतीवर मात करून लहान मुले सरपटत त्या बोगद्यात शिरली. तेथे खूप अंधार होता, खडकावर पाणी ठिबकत होते. शेवटी टोप्या मिळाल्या, मात्र त्यांची अवस्था बिकट झाली होती. त्या मुलांपैकी एक होता चार्ल्स लायल, जो पुढे जागतिक कीर्तीचा भूगर्भशास्त्रज्ञ बनला.
चार्ल्सचा जन्म १७९७ साली स्कॉटलंडमध्ये झाला. लहानपणी त्याला काम करणे फारसे आवडत नसे, पण निसर्ग निरीक्षणाची आवड मात्र जबरदस्त होती. वडिलांच्या ग्रंथालयात त्याला कीटकशास्त्रावरील काही पुस्तके मिळाली. तेथून त्याची जिज्ञासा वाढली. तो नवी फुलपाखरे पकडत असे, जलकिड्यांचे विलक्षण व्यवहार पाहत तलावाजवळ बसत असे. इतर मुले त्याची खिल्ली उडवत, फुलपाखरे पकडणारा चार्ल्स असे म्हणत. त्याला या हौसेसाठी अपमान सहन करावा लागला, पण त्याने ती आवड सोडली नाही.
लहान वयातच त्याला एक गोष्ट उमगली‡लोकांच्या टोमण्यांमुळे आपली आवड सोडायची नसते. जे बरोबर आहे ते न डगमगता करावे. ही शिकवणच पुढे त्याच्या संशोधनाची पायाभरणी ठरली.
शिक्षण पूर्ण झाल्यावर चार्ल्स ऑसफर्ड विद्यापीठात गेला. तेथे भूगर्भशास्त्रज्ञ बलंड यांचे व्याख्यान ऐकून तो मोहित झाला. शिलालेख, जीवाश्म, खडकांच्या थरांचा अभ्यास यातून पृथ्वीची प्राचीन कथा उलगडते, हे त्याला समजले. त्याने प्रवास सुरू केले‡ इंग्लंडपासून फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, सिसिलीपर्यंत. पर्वत, ज्वालामुखी, समुद्रकिनारे, प्रत्येक ठिकाणी तो तासन्तास निरीक्षण करत असे. सिसिलीमध्ये त्याने पाहिले की ज्वालामुखी एटनाच्या लाव्हामध्ये आधुनिक समुद्री शंख-शिंपले अडकलेले आहेत. म्हणजेच भूतकाळातील भूगर्भीय प्रक्रिया आजही सुरू आहे हे त्याला कळले. या निष्कर्षावर आधारून त्याने आपली महान कल्पना मांडली. ‡सर्व बदल हळूहळू, सतत चालणार्‍या प्रक्रियेमुळे होतात; पृथ्वीला एकाच मोठ्या आपत्तीने बदल घडवले नाही. १८७५ मध्ये या महान भूगर्भशास्त्रज्ञाचे निधन झाले,
भूगर्भाचे बाबतीतच नव्हे तर आयुष्यात आपल्याला दिसणारे सर्व बदल हळूहळू आणि सतत चालणार्‍या प्रक्रियेमुळेच होत असतात हे खरे नाही?

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …