हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही दशकांत विविध प्रवाह दिसून आले. एका टोकाला प्रचंड खर्च करून तयार करण्यात आलेली ऐश्वर्यशाली मांडणी असलेली, परंतु कथानकाच्या दृष्टीने बोजड ठरलेली चित्रपटांची मालिका दिसते; तर दुसर्या टोकाला थेट जीवनाला भिडणार्या, साधेपणा असणार्या, पण प्रभावी चित्रपटकृती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. या दोन प्रवाहांमध्ये ‘बोल्ड दृश्ये’ या घटकाला जणू काही ठरावीक स्थान प्राप्त झाले आहे. काही निर्माते प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यासाठी कामोत्तेजक प्रणयदृश्ये, तोकडे कपडे अथवा अंगप्रदर्शन यांचाच आधार घेतात. मात्र अलीकडच्या काळात जेव्हा अशा प्रयोगांविरुद्ध उभी राहिलेली उदाहरणे समोर येतात, तेव्हा हे स्पष्ट होते की प्रेक्षकांना खर्या अर्थाने कथा आणि प्रामाणिक सादरीकरण हवे असते. केवळ अंगावर येणारी चमकधमक किंवा अश्लिल दृश्ये त्या तुलनेत दुय्यम ठरतात.
अलीकडच्या हिट चित्रपटांचे उदाहरण
अलीकडे प्रदर्शित झालेल्या छावा, रेड, सैयारा, महाअवतार नरसिंह, कुली या चित्रपटांचे बारकाईने परीक्षण केले तर त्यांतून एक महत्त्वाचा संदेश समोर येतो. या सर्व चित्रपटांत कथा केंद्रस्थानी आहे. प्रेक्षकांना भावणारी पार्श्वभूमी, ओळख पटणारे पात्र आणि घटनांची सलग मांडणी या गुणांमुळे हे चित्रपट घराघरांत पोहोचले. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटांत कुठेही उगाचच प्रणयदृश्ये किंवा अतार्किक किसिंग सीन दिसत नाहीत. कथेला जिथे आवश्यक आहे तिथेच नायक-नायिकेचे भावनिक नाते चित्रित केले आहे. त्यामुळे चित्रपट सुसंगत आणि आत्मीय वाटतात.
या चित्रपटांची ताकद त्यांच्या साधेपणात दडलेली आहे. दृश्यात्मक भव्यता असली तरी कथानकाच्या ओघात प्रेक्षक स्वतःला सामावून घेतात. पात्रांच्या संवादांमध्येही कुठेही अतिरंजितपणा नाही. परिणामी प्रेक्षकांनी या चित्रपटांचे खुलेपणाने स्वागत केले. ही बाब सिद्ध करते की आजच्या प्रेक्षकांना फक्त भडक दृश्यांची भुरळ पडत नाही; उलट अशी दृश्ये जाणीवपूर्वक घुसडली गेली तर ती प्रेक्षक नजरेआड करतात.
काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’ चित्रपटाने या प्रवाहाला वेग दिला. तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च करून साकारलेली ही मालिका जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरली. विशेष म्हणजे या भव्य चित्रपटात कोणत्याही प्रकारची अंगावर येणारी दृश्ये नव्हती. कथानक, व्यक्तिरेखा आणि तांत्रिक कौशल्य यांवरच चित्रपट उभा होता. हा यशस्वी प्रयोगच हे सांगून गेला की प्रेक्षक नेहमीच बोल्ड दृश्यांसाठी हपापलेले नसतात. त्यांना उत्कंठावर्धक कथा, भावनिक ओघ आणि दर्जेदार दिग्दर्शन अधिक महत्त्वाचे वाटते. तथापि अद्याप अनेक निर्माते व दिग्दर्शक नायक—नायिकेच्या प्रणयदृश्यांशिवाय प्रेक्षकांना चित्रपट रुचणार नाही या गैरसमजात अडकलेले दिसतात. अनेक हिंदीपटांमध्ये नायिकेचे अंगप्रदर्शन अकारण दाखवले जाते, नायक—नायिकेच्या चुंबनदृश्यांना फार महत्त्व दिले जाते. पण प्रत्यक्षात हे दृश्य कथानकात काहीही भर घालत नाहीत. उलट अनेकदा प्रेक्षकांना ती दृश्ये अनाकलनीय वाटतात. प्रेक्षक केवळ कथा पाहायला येतो हा साधा मुद्दा अनेकदा चित्रपटसृष्टीतील मोठमोठ्या घराण्यांच्या लक्षात येत नाही.
आजची नवी पिढी माहितीच्या, दृश्यसंस्कृतीच्या प्रचंड पूरात वाढली आहे. इंटरनेटवर सर्व प्रकारची माहिती व दृश्ये सहज उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटगृहात येणार्या प्रेक्षकाला वेगळा अनुभव हवा असतो. फक्त अंगप्रदर्शन अथवा उथळ प्रणयदृश्ये दाखवून त्याला खेचणे वा थांबवणे शय नाही. उलट जेव्हा कथेला वेगळेपण असते, पात्रांची वाटचाल आयुष्याशी जवळची वाटते, तेव्हा प्रेक्षक आनंदाने पैसे मोजतो.
प्रणयदृश्ये ही चित्रपटकलेचा भाग असू शकतात, याबाबत वाद नाही. मानवी नात्यांचे सर्व पैलू पडद्यावर येणे स्वाभाविक आहे. पण ती दृश्ये कलात्मकता आणि शालीनता जपत चित्रित झाली तरच ती परिणामकारक ठरतात. जुन्या काळातले अनेक चित्रपट याचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. नायक—नायिकेतील आत्मीयता कधी नजरेतून, कधी गाण्यांतून, तर कधी हावभावांतून दर्शवली जायची. प्रेक्षक त्यात रंगून जायचे, कोणत्याही उघड दृश्यांची गरज भासत नसे.
आजचे दिग्दर्शक आणि लेखक जर फक्त आर्थिक फायद्याच्या हव्यासापोटी अंगप्रदर्शन घुसडत राहिले तर दीर्घकाळात प्रेक्षक त्यांना नाकारतील. कारण हा प्रेक्षक हुशार आहे; त्याला काय खरे आणि काय बनावट हे सहज कळते. त्यामुळे कथा हीच खरी नायक असावी, हा मूलमंत्र स्वीकारणे गरजेचे आहे.
प्रेक्षकांना पडद्यावर नायिका आकर्षक दिसावी असे वाटते, यात दुमत नाही. पण आकर्षण हे केवळ कपड्यांच्या लांबीवर अवलंबून नसते. व्यक्तिमत्त्व, अभिनय, पात्राला साजेसे पोशाख, आत्मविश्वास या गोष्टी नायिकेला ग्लॅमरस ठरवतात. म्हणूनच जुन्या चित्रपटांत पूर्णपणे झाकलेल्या वेशभूषेतही नायिका प्रेक्षकांना मोहक वाटायच्या. आजही जर नायिका पात्रानुरूप पोशाखात दिसली तर प्रेक्षक तिचे कौतुक करतो.
चित्रपट समीक्षकांचेदेखील हेच मत आहे की बहुतेक प्रेक्षकांना उगाचच दाखवलेली इंटीमेट दृश्ये कंटाळवाणी वाटतात. काही वेळा प्रेक्षकांचा एक छोटा गट ती पाहायला येतोही, पण त्या गटावर आधारून संपूर्ण कथानक घडवले तर चित्रपट फार काळ टिकत नाही. चित्रपटाचे दीर्घायुष्य हे नेहमीच कथानकाच्या ताकदीवर ठरते.
भारतीय चित्रपटसृष्टीत ‘कर्म’ या चित्रपटातील देविका राणी आणि हिमांशु रॉय यांचे पहिले किसिंग मानले जाणारे दृश्य आजही चर्चेत येते. मात्र त्या दृश्यामागे प्रेक्षकांची मागणी नव्हती. ते कथानकाला आवश्यक वाटले म्हणून निर्मात्याने ते दाखवले. या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की कथेची गरज असेल तेव्हाच अशा दृश्यांना स्थान असावे; अन्यथा त्यांना जाणीवपूर्वक घुसडणे निरर्थक आहे.
आजच्या काळात प्रेक्षकांना चित्रपटातून जीवनाशी नाते सांगणारी कथा हवी असते. नायक—नायिकेचे संघर्ष, समाजातील प्रश्न, मानवी भावभावना यांची मांडणी प्रेक्षकांना भिडते. मग ती ऐतिहासिक पार्श्वभूमी असो, समकालीन प्रश्न असोत किंवा काल्पनिक कल्पनाविश्व असो — कथेतल्या प्रामाणिकतेमुळेच प्रेक्षक पडद्याशी नातं जोडतो.
आजच्या जागतिक स्पर्धेच्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीसमोर मोठी संधी आहे. जगभरातील प्रेक्षकांना केवळ दृष्यांचा भडिमार नको आहे; त्यांना हवी आहे भारतीय कथाकथनाची समृद्ध परंपरा, भावनिक ओलावा आणि कलात्मकता. जर निर्माते—दिग्दर्शकांनी हे लक्षात घेतले तर केवळ देशांतच नव्हे तर परदेशांतही भारतीय चित्रपटांची छाप अधिक गडद होईल. – सोनम परब
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र