लेख-समिक्षण

सेमीकंडक्टर क्रांतीत भारताची छाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच ‘विक्रम-३२’ ही देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडटर चिप प्रदान करण्यात आली. हा भारताच्या तंत्रज्ञानाच्या विश्वातील आकांक्षांच्या इतिहासातील निर्णायक टप्पा आहे. आतापर्यंत भारताचे योगदान डिझाईन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात जागतिक दर्जाचे असले तरी प्रत्यक्ष उत्पादनात तो मागे राहिला होता. परंतु आता सेमीकंडटर निर्मितीच्या स्पर्धेत भारताने अग्रणी स्थान मिळविण्याची दिशा निश्चित केली आहे.
आजची दुनिया एका प्रचंड तांत्रिक क्रांतीच्या टप्प्यावरून जात आहे आणि या क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे सेमीकंडटर. ही छोटाशी चिप आधुनिक जीवनातील जवळपास प्रत्येक क्षेत्राला नियंत्रित करते आहे. स्मार्टफोन असो वा संगणक, मोटारगाडी असो वा रॉकेट, आरोग्य उपकरणे असोत वा कृत्रिम बुद्धिमत्तेचे जटिल रचना ‡या सर्वांमध्ये सेमीकंडटरच खरे इंजिन म्हणून कार्य करत आहेत.
भारताने ज्या वेगाने सेमीकंडटर निर्मिती व संशोधनाच्या दिशेने पाऊले टाकली आहेत, ती येत्या काळात केवळ आत्मनिर्भरतेचा आधार ठरणार नाहीत तर जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची निर्णायक भूमिका निश्चित करतील. आज देशात ६५ कोटींपेक्षा अधिक स्मार्टफोन वापरकर्तेआहेत आणि इलेट्रॉनिस निर्मितीचा बाजार वार्षिक १२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत भारताने आता आपली तांत्रिक मागणी देशांतर्गत उत्पादनातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे हे स्वाभाविक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनामुळे व सरकारच्या त्वरित धोरणात्मक उपक्रमांमुळे ‘सेमीकंडटर मिशन’ला ठोस आकार मिळू लागला आहे.
सरकारने ‘इंडिया सेमीकंडटर मिशन’ अंतर्गत आतापर्यंत १० सेमीकंडटर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यापैकी अनेक युनिटस्मध्ये बांधकाम वेगाने सुरू आहे. गुजरातमधील साणंद येथे पायलट उत्पादन लाइन सुरू झाली आहे आणि याच वर्षात पहिली ‘मेड-इन-इंडिया’ चिप बाजारात येण्याची अपेक्षा आहे. हा क्षण भारताच्या तांत्रिक इतिहासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. विशेष म्हणजे, सेमीकंडटरला केवळ एक तांत्रिक वस्तू म्हणून न पाहता या शतकातील स्टील, वीज आणि रसायन यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधांच्या घटकांपैकी एक म्हणून मान्यता मिळू लागली आहे. चिपशिवाय आधुनिक उद्योग व सेवा अस्तित्वातच राहू शकत नाहीत.म्हणूनच सेमीकंडटरवरील पकड म्हणजे जागतिक पुरवठा साखळीवर निर्णायक प्रभाव. हे वास्तव चीन आणि अमेरिकेने आधीच ओळखले आहे आणि आता भारतही या शर्यतीत ठामपणे उतरला आहे.
भारताची ताकद केवळ धोरणे किंवा गुंतवणूक एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर त्याचा सर्वात मोठा भांडार म्हणजे मानवसंसाधन. आज जगातील ग्लोबल डिझाइन वर्कफोर्सपैकी २० टक्के हिस्सा भारताचा आहे. याचा अर्थ असा की भारतीय अभियंते, संशोधक आणि तांत्रिक तज्ज्ञ आधीच जगातील चिप डिझाइन व निर्मिती प्रक्रियेत सक्रिय योगदान देत आहेत.
पुढील दशकाच्या सुरुवातीपर्यंत जगाला १० लाखांहून अधिक सेमीकंडटर व्यावसायिकांची कमतरता भासेल. भारत ही आव्हानात्मक गरज संधीमध्ये बदलू शकतो, कारण आपल्याकडेे तांत्रिक संस्थांचे आणि स्टार्टअप्सचे जाळे झपाट्याने उभे राहत आहे. सरकारने ३५० संस्थांना आणि स्टार्टअप्सना जागतिक दर्जाची इलेट्रॉनिस डिझाइन ऑटोमेशन टूल्स विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे नवोपक्रमाची संस्कृती विकसित होत आहे आणि देशांतर्गत स्तरावर नवे चिप डिझाइन तयार होत आहेत. याच कारणामुळे स्टार्टअप्स आता भारताच्या चिप इकोसिस्टमचा कणा बनत आहेत.
या संपूर्ण प्रक्रियेत जागतिक कंपन्यांचा सहभागही महत्त्वाचा ठरत आहे. अनेक बहुराष्ट्रीय दिग्गज कंपन्या भारतात गुंतवणूक करून पुरवठा साखळीला बळकट करत आहेत, ज्यामुळे हा क्षेत्र अधिक स्थिरपणे सक्षम होत आहे. आज धोरण, गुंतवणूक आणि जागतिक सहकार्य यांचे असे संतुलित मिश्रण दिसत आहे की ज्यामुळे देश पुढील दशकात सेमीकंडटर महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे.
तथापि, आव्हानेही कमी नाहीत. सेमीकंडटर उद्योग हा भांडवल व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीचा आहे. उच्च दर्जाची वीज, पाणी, लॉजिस्टिस आणि प्रशिक्षित कामगार यांची सातत्याने गरज भासते. जागतिक पातळीवरील स्पर्धाही अत्यंत कठीण आहे. चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान यांसारख्या देशांनी दशके गुंतवणूक करून या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भारताला या आव्हानांशी सातत्याने सामना करत पुढे जायचे आहे. तरीदेखील आज भारताची स्थिती यापूर्वीपेक्षा खूपच आशादायक आहे. सरकार, उद्योग व शैक्षणिक संस्था यांनी एकत्रितपणे या दिशेने ताळमेळ राखला तर पुढील काही वर्षांत भारत केवळ आपली देशांतर्गत गरज भागवणार नाही, तर जागतिक बाजारपेठेतही प्रभावी उपस्थिती दर्शवेल.
‘मेड-इन-इंडिया चिप’ ही केवळ औद्योगिक उपलब्धी ठरणार नाही, तर ती आत्मनिर्भरतेचे प्रतीक असेल. ही देशाच्या तांत्रिक क्षमतेची आणि जागतिक नेतृत्वाच्या आकांक्षेची अभिव्यक्ती असेल. एकूणच, सेमीकंडटर क्रांती भारताच्या अर्थव्यवस्थेला व समाजाला नवीन ऊर्जा देईल. हाच तो पाया ठरेल ज्यावर ‘डिजिटल भारत’ आणि ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार होईल. येणार्‍या काळात भारताने जर आपला संकल्प व गती कायम ठेवली, तर तो निःसंशयपणे जागतिक सेमीकंडटर नकाशावर अग्रगण्य स्थान मिळवेल.
गेल्या अनेक दशकांपासून भारतीय अभियंते जगातील अग्रगण्य चिप कंपन्यांच्या डिझाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत. इंटेलपासून क्वालकॉमपर्यंत प्रत्येक मोठ्या कंपनीचे संशोधन व डिझाईन केंद्र बेंगळुरू, हैदराबाद आणि नोएडा येथे कार्यरत आहेत. हजारो अभियंते आयआयटी व इतर संस्थांतून घडून या केंद्रांत पुढील पिढीच्या चिप्स डिझाईन करत आहेत. मात्र, प्रत्यक्ष उत्पादन तैवान, दक्षिण कोरिया वा अमेरिका या देशांत होत होते. ‘विक्रम-३२’च्या निर्मितीने ही कथा बदलली आहे.भारताकडे या क्षेत्रात तीन मोठी बलस्थाने आहेत. एक म्हणजे मानवी भांडवल ‡ जगातील सर्वाधिक पदवीधर भारतातून बाहेर पडतात. दुसरी म्हणजे विशाल बाजारपेठ. भारतात‡ मोबाईल फोनपासून इलेट्रिक वाहनांपर्यंत वाढणारी मागणी यादृष्टीने अनुकूल आहे. आणि तिसरी म्हणजे धोरणात्मक मदत .‡इंडिया सेमीकंडटर मिशन अंतर्गत केंद्र व राज्य सरकारे संशोधन, उत्पादन आणि पॅकेजिंग यासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रोत्साहन देत आहेत.भारतापुढे दोन आव्हाने होती. पहिले म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षमता उभी करणे, आणि दुसरे म्हणजे उद्योग व शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्य वाढवणे. गुजरात व तमिळनाडूतील नवीन फॅब्ज पहिल्या कमतरतेची भरपाई करत आहेत, तर आयडीएसपीएस इंडस्ट्री कन्सोर्टियमसारख्या उपक्रमांत जागतिक कंपन्या व अग्रगण्य शैक्षणिक संस्था एकत्र येऊन दुसरी कमतरता दूर करत आहेत. या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीही होणार आहे. प्रत्येक फॅब्रिकेशन प्लांट हजारो थेट व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करतो. पॅकेजिंग व चाचणी कंपन्यांमुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना बळ मिळेल. चिप डिझाईन स्टार्टअप्स नवीन बौद्धिक संपदा निर्माण करतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वतःचे सेमीकंडटर परिसंस्था उभारल्यामुळे भारताला सामरिक स्वायत्तता मिळेल.आपल्याकडे दृष्टिकोन आहे, अपार प्रतिभा आहे आणि आता संधीही उपलब्ध आहेत. डिजिटल भविष्यातील जग सिलिकॉनवर उभे राहणार आहे आणि विक्रम-३२ च्या माध्यमातून भारताने या क्षेत्रात पहिल्या रांगेत आपली उपस्थिती नोंदवली आहे.
– शहाजी शिंदे, संगणकप्रणाली तज्ज्ञ

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …