माणूस बहुधा त्याच गोष्टींना जास्त भीत असतो ज्या त्याच्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात. त्यामुळे पालकांना आणि विशेषतः आयांना संगोपनादरम्यान सतत मुलांविषयीच्या काही भीती मनात असतात. पालकत्व हा चिंतेचा विषय असला तरी वास्तवाचा योग्य विचार करून आणि आवश्यक ती पावले उचलून, या भीतींवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पालकांनी त्यांच्या कृतींमध्ये संतुलन साधणे आवश्यक आहे.
भीती क्रमांक १ ः माझ्या मुलाला त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार शिक्षण आणि संधी मिळतील का?
ही भीती पालकांमध्ये सर्वाधिक आढळते. पालक आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल काळजी करतात आणि त्याला यशस्वी करण्यासाठी विविध महागड्या शैक्षणिक साधनांवर भर देतात. वस्तुतः महागड्या साधनांपेक्षा मुलाला स्वावलंबी आणि सर्जनशील बनवणे गरजेचे आहे. यासाठी मुलांच्या वाढीच्या प्रक्रियेत खेळण्यांची संख्या मर्यादित ठेवावी, जेणेकरून त्यांची सर्जनशीलता वाढेल. मुलाला स्वयंपूर्ण आणि कल्पक बनवण्यावर भर द्यावा, त्याच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करू नये.
भीती क्रमांक २ ः कोणीतरी माझ्या मुलाला इजा पोहोचवेल का?
माध्यमांमध्ये अशा घटनांना दिली जाणारी प्रसिद्धी पालकांची भीती अधिक तीव्र करते. ती गैर नाही. पण यावर उपाय म्हणजे मुलांशी खास करुन मुलींशी सतत संवाद ठेवावा आणि त्यांना आपल्या शारीरिक सीमांबाबत योग्य शिक्षण द्यावे. मुलांना विश्वास देऊन त्यांना आपल्या अडचणी सांगण्यास प्रोत्साहित करावे. कुटुंबातील व्यक्तींकडून होणार्या संभाव्य शोषणाबाबत जागरूक राहावे.
भीती क्रमांक ३. माझे मूल एखाद्या अपघातात जखमी होईल का?
ही भीती असणे स्वाभाविकही आहे आणि आवश्यकही. पण यावर उपाय म्हणजे मुलांना एकटे कुठेही सोडू नका. लहान वयातच सुरक्षिततेच्या सवयी लावाव्यात. मोठी झाल्यानंतर त्यांना रस्ता क्रॉसिंग करताना कोणती काळजी घ्यावी, सायकल चालवताना काय खबरदारी घ्यावी याविषयीचे ज्ञान सतत देत राहावे आणि आपल्या उपस्थितीत मुले त्याचे पालन करतात ना याची खातरजमा करावी. तसेच सीटबेल्ट, हेल्मेट आणि सुरक्षात्मक उपकरणांचा वापर पालकांनी स्वतः करावा, जेणेकरुन मुलांमध्ये लहानपणापासूनच ती शिस्त राहते.
भीती क्रमांक ४ ः माझे मूल समाजात मिसळू शकणार नाही किंवा इतर मुलांकडून त्रास दिला जाईल. ः अशा प्रकारची भीती असल्यास मुलाला इतरांसोबत नीट वागण्याचे आणि छळ सहन करू न देण्याचे धडे द्यावेत. शाळेशी संपर्क ठेवावा. मुलास भावनिकदृष्ट्या सक्षम बनवावे. कोणत्याही गोष्टीवरुन विचलित न होता, संयत प्रतिसाद कसा द्यावयाचा याचे धडे द्यावेत. यासाठी कौटुंबिक वातावरण आणि पालकांचे आचरणही तसेच असायला हवे. मुलांसमोर वागताना पालकांनीही संयमाने वर्तणूक केली पाहिजे. याशिवाय शाळा-शिकवणीमध्ये कोणी त्रास देत असल्यास त्याच्याशी कसे रिअॅक्ट व्हावे, शिक्षकांकडेे कशा प्रकारे तक्रार करावी याविषयी मुलांना ज्ञान द्यावे.
भीती क्रमांक ५ ः मुलांच्या आहारसवयी कशा बदलायच्या?
जेवणाखाण्याबाबत हट्टीपणा हा मुलांचा स्थायीभाव असतो. त्याबाबत सतत सांगत राहणे आणि आवडीचे पदार्थ आरोग्यदायी ठरतील अशा प्रकारे बनवून देणे हा सुरुवातीचा मार्ग आहे. त्याबरोबरीने कुटुंबासोबत आरोग्यदायी जेवणाची सवय लावावी. त्या निरीक्षणातून मुले खूप काही शिकतात. तसेच मुलांना जास्त गोड किंवा प्रक्रिया केलेले अन्न कमी द्यावे. मुलांना खेळ आणि व्यायामासाठी प्रवृत्त करावे. यामुळे कडकडून भूक लागून मुलांच्या आवडीनिवडीच्या सवयी, जेवणाबाबतचा हट्टीपणा कमी होतो. तसेच आहार आणि आरोग्यासंबंधी सकारात्मक संवाद साधावा.
Check Also
लहान मुले आणि व्हिडिओ कॉलिंग
लहान मुलांच्या निरागस हालचाली सर्वांनाच मोहवून टाकतात. अनेकदा दूर राहणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी बाळाला पाहण्यासाठी …
पांचजन्य वृत्तपत्र