लेख-समिक्षण

युद्धकथा-गीतांचे योगदान

हिंदी सिनेसृष्टीने युद्धकथांच्या आधारे राष्ट्रीयत्व, राष्ट्रवादी भावना, देशनिष्ठा, जाज्वल्य राष्ट्राभिमान याबाबत जनसामान्यांना स्फुरण चढवतानाच युद्धाच्या परिणामांबाबतही आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. युद्धाचं वातावरण असो वा नसो, युद्धभूमीवर आधारित चित्रपटांच्या कथा आणि गाणी प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजतात. सीमेवर तैनात सैनिक युद्धभूमीत असोत, जखमी असोत किंवा आपल्या प्रियजनांपासून दूर असण्यामुळे खचलेले असोत त्यांना प्रेरणा देण्यासाठी, उद्दिष्ट दृढ करण्यासाठी आणि आशेचा किरण दाखवण्यासाठी चित्रपटांच्या कहाण्या आणि गाणी महत्त्वाची भूमिका बजावत आली आहेत. बलिदान दिलेल्या शूरवीरांवर आधारित बहुतांश चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.- सोनम परब
——-
जगभरातील चित्रपटसृष्टीमध्ये युद्ध हा एक प्रभावशाली आणि भावनिक विषय राहिला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीदेखील त्याला अपवाद नाही. युद्धावर आधारित हिंदी चित्रपट केवळ मनोरंजन देत नाहीत, तर देशभक्ती, त्याग, शौर्य आणि राष्ट्रीय अस्मिता या भावनांचा जागरही करतात. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही काळाने हिंदी चित्रपटांमध्ये युद्धाला मुख्य विषय म्हणून स्थान मिळू लागले. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर आलेला चेतन आनंद यांचा ‘हकीकत’ हा चित्रपट युद्धपटांच्या श्रेणीतील पहिला वास्तवदर्शी चित्रपट मानला जातो. सैनिकांचे व्यक्तिगत दुःख, देशप्रेम आणि बलिदान अशा भावनांचा त्यांनी संयमित पण प्रभावी वापर केला होता. या काळातील चित्रपट अधिक राष्ट्रवादी व वीररसप्रधान असायचे. हिंदुस्तान की कसम (१९७३), एल.ओ.सी. कारगिल (२००३) किंवा बॉर्डर (१९९७) हे चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहेत. बॉर्डरसारख्या चित्रपटांमध्ये युद्धाच्या क्रूरतेसह सैनिकांची मानवी बाजूही ठळकपणे दाखवली गेली होती. २००० नंतरच्या काळात युद्धपट अधिक वास्तवदर्शी स्वरूपात येऊ लागले. उरी: द सर्जिकल स्ट्राईक (२०१९) सारखे चित्रपट ही नवीन पिढीतील राष्ट्रवादाची अभिव्यक्ती ठरले. हे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या प्रगत होतेच; पण त्यांची मांडणी अधिक आक्रमक आणि नायककेंद्री होती. थोडक्यात, हिंदी चित्रपटांतील युद्धविषयक चित्रण काळानुसार बदलले आहे. सुरुवातीला फक्त वीरगाथा सांगणारे चित्रपट आता अधिक वास्तववादी होऊ लागले आहेत.
युद्धाचं वातावरण असो वा नसो, युद्धभूमीवर आधारित चित्रपटांच्या कथा आणि गाणी प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजतात. सीमेवर तैनात सैनिक युद्धभूमीत असोत, जखमी असोत किंवा आपल्या प्रियजनांपासून दूर असण्यामुळे खचलेले असोत त्यांना प्रेरणा देण्यासाठी, उद्दिष्ट दृढ करण्यासाठी आणि आशेचा किरण दाखवण्यासाठी चित्रपटांच्या कहाण्या आणि गाणी महत्त्वाची भूमिका बजावत आली आहेत. बलिदान दिलेल्या शूरवीरांवर आधारित बहुतांश चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
चित्रपट ‘एलओसी कारगिल’ मधील ‘जब अमन की बांसुरी, गूंजे गगन के तले, जब दोस्ती का दिया इन सरहदों पे जले, बस इतना याद रहे, एक साथी और भी था…’ हे गाणं युद्धाऐवजी शांतीचा संदेश देणारे आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या अशा चित्रपटांची आणि त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता अफाट राहिली आहे.
भारत-चीन युद्धानंतर १९६३ मध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘ऐ मेरे वतन के लोगों…’ हे गीत, १९६५ च्या शहीद चित्रपटातील ‘मेरा रंग दे बसंती चोला’ किंवा १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या ‘कर्मा’ चित्रपटातील ‘दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए…’ ही सर्व देशभक्तीपर गीते भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जनमानसात गूंजू लागली आहेत. ए. आर. रहमानचं १९९७ चं ‘माँ तुझे सलाम.. वंदे मातरम’, २००२ मधील ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’ चित्रपटातील ‘देश मेरे देश मेरे…’ आणि २०१९ च्या ‘केसरी’ मधील ‘तेरी मिट्टी’ ही गीतेही जनतेत राष्ट्रभक्तीचा उत्साह जागवतात.
राष्ट्रभक्ती जागवणार्‍या गीतांच्या यादीत १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉर्डर चित्रपटातील ‘संदेशे आते हैं’ हे गीत आजही लोकांच्या मनात घर करून आहे. जे. पी. दत्तांच्या दिग्दर्शनाखाली सनी देओल, सुनील शेट्टी, जैकी श्रॉफ आणि अक्षय खन्ना यांच्या भूमिकांनी सजलेला हा चित्रपट लोंगेवाला सीमेवरील जवानांच्या संघर्षावर आधारित आहे. हे गीत राष्ट्रासाठी कर्तव्य बजावताना प्रियजनांपासून दूर राहण्याच्या वेदना हृदयस्पर्शीपणे मांडतं.
१९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या रामानंद सागर दिग्दर्शित ‘ललकार’ चित्रपटात राजेंद्र कुमार आणि धर्मेंद्र यांनी दोन भावांची भूमिका केली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला सामोरे जाण्याची कहाणी चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं ‘आज गा लो, मुस्कुरा लो…’ हे गीत युद्धाच्या सावलीतही प्रेम आणि आशावाद जपण्याचं स्मरण करून देतं.
२०१९ मध्ये आलेल्या उरी: द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटातील ‘ जग्गा जितेया….’हे गीत पारंपरिक देशभक्ती गाण्यांपेक्षा वेगळं आहे. या गीतात योद्ध्याच्या मनातील अग्नी प्रकट होतो. मातृभूमीसाठी बलिदान देण्याची तीव्र प्रेरणा. हा चित्रपट २०१६ मधील उरी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित होता. या चित्रपटात विक्की कौशल यांनी काल्पनिक मेजर विहान सिंह शेरगिल यांची भूमिका साकारली आहे.
गीतकार कैफी आजमी लिखित ‘कर चले हम फिदा’ हे गीत शौर्य आणि बलिदानाची अमर कविता आहे. ‘हकीकत’ चित्रपटातील हे गीत १९६२ च्या भारत-चीन युद्धावर आधारित आहे. यामध्ये धर्मेंद्र यांनी एक भारतीय कॅप्टन साकारला आहे. कैफी आजमी आणि चेतन आनंद यांच्या जोडीचं हिंदुस्तान की कसम हे आणखी एक गीत मन्ना डे आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात आणि मदन मोहन यांच्या संगीताने सजलेलं आहे.
२०२१ च्या शेरशाह चित्रपटातील ‘जय हिंद की सेना’ हे गीत भारतीय सशस्त्र दलांचे स्तुतीगीत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटामागे खर्‍या जीवनातील प्रेरणा म्हणजे कारगिल युद्धातील वीर शहीद कॅप्टन विक्रम बत्रा आहेत. ‘जब अमन की बांसुरी’ हे गीत शौर्य आणि दुःख एकत्रित करणारे गीत आहे, जे आपल्या शौर्यबांधवांच्या स्मृती जपणार्‍या एलओसी कारगिल चित्रपटातील आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, सुनील शेट्टी आणि रानी मुखर्जी यांसारख्या अनेक तार्‍यांनी युक्त आहे
२००४ मध्ये आलेला फरहान अख्तर दिग्दर्शित ‘लक्ष्य’ हा चित्रपट एका दिशाहीन तरुणाच्या सैन्यात भरती होण्यापूर्वी व नंतरच्या बदलांची कथा सांगतो. ‘कंधों से कंधे मिलते हैं…’ हे या चित्रपटातील गीत केवळ युद्धातच नव्हे, तर सामान्य जीवनातील जबाबदार्‍या आणि उद्दिष्टांबाबतही प्रेरणा देतं. २०२३ च्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटात विक्की कौशल यांनी सॅम माणेकशॉ यांची ठसठशीत भूमिका साकारली. यातील ‘चट्टान से चौड़े, सीनों में तूफान उठाना है’ हे गीत सैन्याच्या साहस आणि धैर्याचं प्रतीक ठरतं.
आजच्या काळातील काही चित्रपट युद्धाने सैनिकांवर होणार्‍या मानसिक परिणामांवरही लक्ष केंद्रित करत आहेत. युद्धात केवळ शरीर झिजत नाही, तर मन देखील लेशांतून जातं. पोस्ट ट्रुमॅटिक स्ट्रेस ऑर्डर, गुन्हेगारी वृत्ती, एकाकीपणा या समस्या शेरशाह, द गाझी अ‍ॅटॅक, द गुंजन सक्सेना यांसारख्या चित्रपटांमध्ये थोड्याफार प्रमाणात चर्चिल्या गेल्या आहेत.
एकंदरीत, हिंदी सिनेसृष्टीने युद्धकथांच्या आधारे राष्ट्रीयत्व, राष्ट्रवादी भावना, देशनिष्ठा, जाज्वल्य राष्ट्राभिमान याबाबत जनसामान्यांना स्फुरण चढवतानाच युद्धाच्या परिणामांबाबतही आत्मचिंतन करण्यास भाग पाडले.

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …