लेख-समिक्षण

‘झुकानेवाला’ आहेच!

झुकेगा नही…’ असं म्हणणार्‍या भल्याभल्यांना झुकवणारा कुणी ना कुणी असतोच. ‘मोडेन पण वाकणार नाही,’ असा बाणा असलेल्यांचा कणा कुणासमोर तरी लवचिक होतोच. सध्या आपापली बाजू त्वेषानं लावून धरण्याचे, त्यासाठी प्रसंगी एकमेकांना बोचकारण्याचे आणि मुख्यत्वे, हार न मानण्याचे दिवस आहेत. त्यामुळं कुणी कुणासमोर सहजासहजी झुकत नाही.
‘तुझं थोडं, माझं थोडं’ असं म्हणून हातात हात घालून पुढं जाण्याचं शहाणपण आपल्यातून नामशेष होईल की काय, अशी भीती वाटते. समोर कुणीही असो, त्याच्यापुढे झुकायचंच नाही असा दृढनिश्चय असलेले आपण सर्वजण एका निर्जीव ‘धन्या’समोर मात्र रोज न चुकता झुकतो, तेही अनेक तास. कारण ‘झुकानेवाला’ असेल तर दुनिया झुकते. या झुकण्यामुळं आपल्यासमोर अनेक संकटं एका पाठोपाठ एक उभी राहिली आहेत; पण आपलं त्याकडे लक्षही नाही. त्यातलंच एक संकट आहे ‘टेस्ट-नेक सिंड्रोम.’
खरं तर ‘टेस्ट’ आणि ‘नेक’ यांचा अर्थाअर्थी संबंध येण्याची शयता नसते. मजकुराचा संबंध आलाच तर डोळ्यांशी येईल. अधिक मजकूर डोळ्यांखालून गेला, तर डोळ्यांना त्रास होईल. मानेचा काय संबंध? या संकटाचं दुसरं नाव ऐकलं, की या प्रश्नाचं उत्तर मिळतं. हे नाव आहे ‘टेक नेक सिंड्रोम’ किंवा ‘स्मार्टफोन सिंड्रोम.’ या नावांवरून ‘झुकानेवाला’ कोण, हे समजलं असेलच. परंतु मानेचा संबंध काय, हा प्रश्न आहेच!
स्मार्टफोन कानाशी असतो तोपर्यंत आपली मान ताठ असते; पण जसा आपण त्यातला मजकूर वाचू लागतो, चित्रं आणि व्हिडिओ पाहू लागतो, त्या वेळी फोन आपल्या डोळ्यांच्या पातळीवर नसतो. तसा तो ठेवला तर हाताला रग लागते. हात ‘रिलॅस’ राहावेत म्हणून आपण फोन छातीच्याही खाली धरतो. परिणामी, आपल्याला मान झुकवावी लागते. यातूनच मानेला आणि पाठीच्या वरच्या भागाला जो त्रास होतो, त्याचं नाव ‘टेस्ट-नेक सिंड्रोम.’ दिवसातला जितका वेळ फोनचा स्क्रीन पाहण्यासाठी मान झुकलेली राहील, तितका त्रास जास्त! मान दुखणं, आखडणं आणि इतर अनेक त्रास यामुळं आपल्या मागे लागतात. मान आणि पाठीव्यतिरिक्त काहीजणांचे खांदेही दुखू लागतात. हळूहळू वेदना डोयात पोहोचते आणि डोकेदुखी सुरू होते. वरवरच्या उपायांनी ही डोकेदुखी थांबत नाही आणि खरं कारण लवकर निष्पन्न होत नाही. एखाद्या दिवशी मान अचानक आखडते. कारण समजत नाही; पण टेन्शन येतं. खांदे भरून येतात. कधीकधी तर हातातून मुंग्या आल्यासारखं किंवा बधिरता आल्यासारखंही होतं. भीती वाटू लागते; पण फोन हातात तसाच राहतो.
ही समस्या जशी अचानक उद्भवते, तितकी अचानक ती नाहिशी मात्र करता येत नाही. त्यासाठी अनेक पथ्यं पाळावी लागतात. उदाहरणार्थ, स्मार्टफोन पाहताना किंवा लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करताना डोळ्यांच्या सरळ रेषेत स्क्रीन येईल आणि मान ताठ राहील अशा स्थितीत बसावं लागतं. त्याही स्थितीत सलग बराच वेळ राहून चालत नाही. अधूनमधून ‘ब्रेक’ घ्यावा लागतो. डॉटरांना खरी परिस्थिती सांगून औषधोपचार घ्यावे लागतात. गंभीर परिस्थिती असेल तर इंजेशन घ्यावं लागतं. त्यापेक्षा कुणापुढे न झुकण्याचा ताठरपणा स्मार्टफोनला दाखवणं कधीही चांगलं!

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …