नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ अवकाशात अडकून पडल्यानंतर अखेर भारतीय वंशांच्या अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची भारतीय प्रमाणवेळेनुसार 19 मार्च 2025 रोजी यशस्वीरित्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन कुपीतून घरवापसी झाली. त्यांच्यासमवेत नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियाचे अंतराळवीर अॅलेक्झांडर गोर्व्हुनोव्ह देखील भूतलावर परतले. हे चौघेही अवकाश स्थानकावर (आयएसएस) क्रु-9 चे सदस्य होते. त्यांची जागा घेण्यासाठी चार अन्य अंतराळवीर नासाचे अॅनी मॅक्लेन आणि निकोल एयर्स, जपानचे ताकुया ओनिशी आणि रशियाचे किरिल पेस्कोव्ह हे 16 मार्च रोजी सकाळीच आयएसएसवर दाखल झाले आहेत. हे चारही अंतराळवीर क्रु-10 चे सदस्य असून ते पुढे सहा महिने अवकाश स्थानकात काम करणार आहेत.
गेल्या वर्षी पाच जून रोजी बोइंग स्टारलायनर नावाच्या अवकाश यानातून प्रवास सुरू करत सुनीता आणि विल्मोर हे सहा जून रोजी ‘आयएसएस’वर उतरले होते. या दोन्ही प्रवाशांची घरवापसी आठवडाभरातच 13 जून 2024 रोजी होणार होती. मात्र बोइंग स्टारलायनरमध्ये हीलियम गळती झाल्याने आणि त्याच्या थ्रस्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने स्टारलायनर हे या दोघांना न घेता पृथ्वीवर 7 सप्टेंबर 2024 रोजी परतले. यानंतर त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे येत होते. अमेरिका, भारत आणि संपूर्ण जगभरातून या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. परंतु, या विलंबामुळेच सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात सर्वाधिक काळ राहणार्या महिलेचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी एकूण 286 दिवस अंतराळात घालवले, यामध्ये 900 तासांचे संशोधनकार्य तसेच 150 वैज्ञानिक प्रयोग पूर्ण केले. नासाने या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा भविष्यातील मंगळ मोहिमेच्या तयारीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक
आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक ही एक अद्भूत अशी प्रयोगशाळा आहे. भविष्यातील मंगळ आणि चंद्र मोहिमांसाठी अन्ननिर्मिती कशी करावी, यासाठी येथे वनस्पती संशोधन केले जाते. अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षणामुळे जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती, आणि भौतिकशास्त्रातील प्रयोगही तेथे केले जातात. जवळपास 5 बेडरुमच्या फ्लॅट इतका आकार असणारे आणि पृथ्वीपासून 403 किलोमीटर अंतरावर असणारे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक ही स्थिर संरचना नाहीये. ते अंतराळात सतत फिरत राहणारे महाकाय अंतराळ यान असून ते 28000 किलोमीटर प्र्रति तास या वेगाने पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहे. या अंतराळस्थानकात दिवसातील 24 तासांत 16 वेळा सूर्योदय होतो आणि 16 वेळा सूर्यास्त होतो.
प्रचंड जोखीम
अर्थात, अंतराळात विशिष्ट ठिकाणी पोहोचणे आणि तेथून परतणे या दोन्ही गोष्टी जितक्या रोमांचकारी असतात तितक्याच प्रचंड जोखमीच्याही. त्यामुळे सुनीता आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष पृथ्वीवर उतरेपर्यंत जगाने श्वास रोखून धरला होता. याचे कारण भारतीय वंशांच्या अंतराळीवर कल्पना चावला यांचा दुर्देवी शेवट अजूनही आपण विसरलेलो नाहीत. अंतराळ प्रवासादरम्यान अनेक समस्यांसमवेत शारीरिक त्रास देखील सहन करावा लागतो आणि एवढेच नाही तर घरी परतल्यानंतर देखील त्यांना शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागते. पण या दीर्घ मुक्कामात सुनीता यांनी कधीही धैर्य सोडले नाही. त्या सदैव सकारात्मक राहिल्या आणि आपल्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी एकदा सांगितले होते की, कोणालाही काळजी करण्याची गरज नाही, कारण अंतराळवीर हे अशा सर्व परिस्थितींना सामोरे जाण्यास तयार असतात.
सुनीतांच्या अंतराळमोहिमा
डिस्कव्हर शटलच्या माध्यमातून 9 डिसेंबर 2006 रोजी सुनीता यांचा पहिला अवकाश प्रवास झाला. त्या ‘आयएसएस’ 14 आणि 15 मोहिमेत सामील झाल्या. या अभियानात 195 दिवस व्यतित करत त्या 22 जून 2007 मध्ये पृथ्वीवर परतल्या. या मोहिमेत सुनीता यांनी चार वेळेस एकूण 29 तास 17 मिनिटे स्पेसवॉक केला. सुनीता यांची दुसरी अंतराळ मोहीम सोयूज रशियन यानातून 15 जुलै 2012 रोजी झाली. या अभियानात त्यांना आयएसएस एक्सपीडिशन 33 चे कमांडर म्हणून नेमले हेते. सुमारे चार महिने अवकाशात राहिल्यानंतर 19 नोव्हेंबर 2012 रोजी त्या कझाकिस्तानच्या जमीनीवर उतरल्या. दुसर्या अभियानात सुनीता यांनी 127 दिवस अवकाशात मुक्काम केला. या दरम्यान त्यांनी एकूण 21 तास 23 मिनिटांपर्यंत स्पेसवॉक केला. एकूण नऊ वेळेस स्पेसवॉक करण्याचा विक्रम सुनीता यांच्या नावावर आहे. त्यांनी या तिन्ही मोहिमांत एकूण विक्रमी 62 तास 6 मिनिटे स्पेसवॉक केला आहे. दहा वेळेस स्पेसवॉक करणार्या पेगी व्हिटसन तासांच्या बाबतीत दुसर्या स्थानावर आहेत.
नऊ महिन्यातील कार्य
अवकाश स्थानकात नऊ महिन्यांच्या काळात सुनीता आणि विल्मोर यांनी तेथील जुन्या उपकरणांची दुरुस्ती केली. तसेच तेथील हार्डवेअर बदलण्याचे कामही केले. त्यांनी ‘आयएसएस’ बाहेर खराब झालेले संचार हार्डवेअर देखील काढून टाकले आणि या सर्व प्रक्रियेतून निर्माण झालेला कचरा पृथ्वीवर पाठवला. शिवाय सुनीता आणि विल्मोर यांनी अवकाशात फिरणारे काही नमुने गोळा केले आहेत. या माध्यमातून त्यांनी पृथ्वीच्या कक्षेबाहेर फिरणार्या ‘आयएसएस’ च्या बाह्य भागात सुक्ष्म जीव आहेत की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शास्त्रीय चाचणी म्हणून सुनीता यांनी अवकाशात सॅलेड म्हणून खाण्यात येणार्या लाल लॅट्यूसची प्रजातीची लागवड करून त्याचे संगोपन करण्याचेही काम केले.
याखेरीज दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने हाडे, स्नायू, आणि मेंदू यावर काय परिणाम होतो यावर संशोधन केले. रेडिएशनचा शरीरावर होणारा परिणाम अभ्यासला. रक्ताभिसरण आणि हृदयावर होणारे प्रभाव तपासले. अंतराळात वनस्पती कशा वाढतात याचा अभ्यास केला. भविष्यातील मंगळ आणि चंद्र मोहिमांसाठी अंतराळात अन्न उत्पादन शक्य आहे का, यावर संशोधन केले आहे. याशिवाय, अंतराळातील जिवाणू आणि बुरशींचा अभ्यास केला आहे. नवीन प्रकारची औषधे आणि उपचार पद्धती विकसित करण्यासाठी प्रयोग केले आहेत. पृथ्वीवर सुखरूप परतलेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर किमान दिड महिन्यांपर्यंत आरोग्याची देखभाल करावी लागणार आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे सध्याचे अंतराळ मिशन हे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून नव्हे, तर भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या मिशनमुळे अंतराळ संशोधनाच्या अनेक नव्या शक्यता उघडल्या आहेत. आता येणार्या काळात मंगळ आणि चंद्रावर मानवी वस्ती करण्याचे प्रयोग वेग धरू लागतील.- श्रीनिवास औंधकर, खगोलशास्र अभ्यासक
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र