लेख-समिक्षण

चीनचे ‘मनाचे’ उद्योग

माहिती-तंत्रज्ञानाने जग जवळ आणले हे वास्तव असले तरी या प्रक्रियेने काही धोकेही जवळ आले आहेत. आज इंटरनेटच्या विश्वातील गुन्हेगारांची संख्या ही प्रत्यक्ष जमिनीवरील चोर-लुटेरे, डाकू यांपेक्षा मोठी बनत चालली आहे. तशाच प्रकारे शत्रू राष्ट्राला हादरे देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रे मोठ्या प्रमाणावर करत चालली असून त्यामाध्यमातून प्रत्यक्ष युद्धातील हानीप्रमाणे वित्तीय नुकसान होताना दिसत आहे. विघातक कृत्यासाठी तंत्रज्ञानाच्या पोटातून काही आविष्कार जाणीवपूर्वक जन्माला घातले जात आहेत. चीनच्या स्टार्टअप कंपनीने विकसित केलेले ‘बीसीआय’ हे मानवाच्या मेंदूतील विचार रिअल टाईममध्ये वाचून डीकोड करणारे उपकरण याच श्रेणीतील आहे.
धुनिक काळात तंत्रज्ञानाच्या क्षेत्राचा विकास जसजसा गतीमान होत चालला आहे, तसतसे त्याच्या गैरवापराचे धोकही समोर येत चालले आहेत. जगभरामध्ये पूर्वीच्या काळी रशिया, अमेरिका यांसह अनेक देशांकडून मोठ्या प्रमाणावर हेरगिरी केली जात होती. परंतु आधुनिक काळामध्ये या देशांना चीनने मागे टाकले आहे. चीनच्या मातीतून बाहेर पडणार्‍या कोणत्या वस्तू हेरगिरी करणार्‍या नसतील हे सांगता येणे कठीण असते.
तंत्रज्ञानाच्या जगात चीन खूप पुढे आहे आणि अमेरिका आणि जपानसारख्या देशांशी स्पर्धा करत आहे. अलीकडेच चीनने विकसित केलेल्या एका आधुनिक मशिनमुळे जगाला आश्चर्याचा धक्काही बसला आहे आणि काळजीही वाढली आहे. या मशिनचे नाव आहे ‘माइंड रीडिंग मशीन.’ यापूर्वीही माईंड रीडिंग मशीनवर काम करण्यात आले होते. परंतु आताचे मशिन हे अचूक डीकोडिंगमुळे पूर्वीच्या मशिन्सपेक्षा अधिक प्रभावी मानले जात आहे. माइंड रीडिंग मशीन हे एक अत्यंत प्रभावी तंत्रज्ञान असले आणि त्याचे फायदे अनेक असले तरी तोटे किंवा धोकेही आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो यावर त्याचे भविष्य अवलंबून आहे. ‘माइंड रीडिंग मशीन’ हे एक तंत्रज्ञान आहे, जे मानवी विचार आणि मेंदूतील क्रियाकलाप वाचण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान मेंदूच्या लहरी आणि न्यूरल ऑक्टिव्हिटीचे विश्लेषण करून ते शब्दरुपात दाखवू शकते. एका चिनी स्टार्टअप कंपनीने विकसित केलेल्या ‘ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस’ उपकरणाने मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णांचे विचार रिअल-टाइममध्ये डीकोड केले . हे उपकरण रुग्णाच्या मेंदूच्या मोटर क्षेत्रामध्ये जागा व्यापणार्‍या जखमांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. पूर्वी विकसित केलेल्या माइंड रीडिंग मशीनमध्ये अचूकता आणि रिअल-टाइम डीकोडिंगची कमतरता होती. नवीन मशीन उच्च अचूकता आणि त्वरित विचार डीकोड करण्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे उपकरण रुग्णाच्या मेंदूतील सूक्ष्म बदलांनाही ओळखण्यास सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. चिनी स्टार्टअप कंपनीने या उपकरणाच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचे म्हटले आहे.
या उपकरणाने मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णाचे विचार डीकोड करतानाच एका वेगळ्या चाचणीमध्ये तेे रिअल-टाइममध्ये चिनी भाषाही डीकोड केली. बीसीआय तंत्रज्ञानामुळे रुग्णांना त्यांच्या मनाने सॉफ्टवेअर नियंत्रित करणे, वस्तू हाताळणे, एआय मॉडेल्सशी संवाद साधणे आणि भाषणाचा वापर करून डिजिटल अवतार नियंत्रित करणे शक्य झाले आहे. ऑगस्ट 2024 मध्ये न्यूरोसर्जन्सनी बीसीआय उपकरण 21 वर्षीय एपिलेप्सी असलेल्या महिला रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले. न्यूरोअ‍ॅक्सेस या स्टार्टअप टीमने रुग्णाच्या मेंदूच्या सिग्नलच्या उच्च-गामा बँडमधून इलेक्ट्रोकॉर्टिकोग्राम काढला. त्यानंतर त्यांनी रिअल टाइममध्ये डीकोड करण्यासाठी न्यूरल नेटवर्प मॉडेलला तयार केले. या प्रक्रियेने शस्त्रक्रियेच्या काही मिनिटांत मेंदूच्या कार्यक्षेत्रांचे अचूक मॅपिंगही केले.मेंदूच्या सिग्नलवरून भाषा समजून घेणे ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) तंत्रज्ञानाचा झालेला विकास दाखवते.
डिसेंबर 2024 मध्ये चिनी भाषणाचे संश्लेषण करण्यासाठी बीसीआयची देशातील पहिली क्लिनिकल चाचणी घेतली. संशोधकांनी 256-चॅनेल ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) एपिलेप्सीने ग्रस्त असलेल्या महिला रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले, तिला भाषेचे सिग्नल देणा़र्‍या मेंदूच्या भागात ट्युमरदेखील होता. महिला रुग्ण बरी झाली आणि उपकरणाने पाच दिवसांत 71 टक्के स्पीच डीकोडिंगची अचूकता गाठली. 142 सामान्य चिनी अक्षरांचा संच वापरून ही अचूकता प्राप्त केली गेली.
2023 मध्ये कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांचा माइंड रीडिंग मशीन विषयक एक अभ्यास प्रकाशित झाला होता. कॅलिफोर्नियातील संशोधक 79 टक्के अचूकतेसह सहभागींचे विचार शब्दांमध्ये डीकोड करण्यास सक्षम होते. हे उपकरण पॅलटेकच्या टी अ‍ॅण्ड सी चेन ब्रेन-मशीन इंटरफेस सेंटरने विकसित केले आणि याचा भाषणात अडथळा असणार्‍या लोकांना व त्यासंबंधित विकार असणार्‍या रुग्णांना मदत होईल, असा दावा करण्यात आला होता. हे ‘स्पीच डीकोडर’ मेंदू-मशीन इंटरफेस म्हणून काम करतात आणि भाषणादरम्यान मेंदूची क्रिया कॅप्चर करतात व त्याला भाषेत अनुवादित करतात.‘माइंड रीडिंग मशीन’ रिमोट प्रकारेसुद्धा वापरले जाऊ शकते.
या उपकरणाची कार्यपद्धती आणि त्याची क्षमता पाहता त्याच्या वापरामुळे उद्भवू शकणार्‍या धोक्यांची सहज कल्पना येते. विशेषतः व्यक्तीच्या विचारांची माहिती या यंत्राद्वारे मिळवून ती सार्वजनिक करता येण्याची किंवा तिचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, मानवी विचारांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्रज्ञान नैतिकदृष्ट़या किती योग्य आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
कोणतेही तंत्रज्ञान हे दुधारी तलवारीसारखे असते. या परिप्रेक्ष्यातून बीसीआयचा विचार केल्यास पोलीस आणि लष्करी कारणांसाठीदेखील याचा वापर निश्चितच सकारात्मकरित्या ठरेल; परंतु त्याच वेळी हे तंत्रज्ञान गुन्हेगारी किंवा हेरगिरीसाठी वापरले जाऊ शकते. माइंड रीडिंग तंत्रज्ञानाचा वापर एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या मनावर प्रचार किंवा मानसिक युद्ध करून त्याचे त्याच्या संमतीशिवाय मतपरिवर्तन करण्याकरिताही केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे अहवाल आहेत की, सोव्हिएत रशियाचे माजी अध्यक्ष गोर्बाचेव्ह हे ‘माईंड वॉर’चे लक्ष्य होते. त्यांच्या ग्लासनोस्त (मोकळेपणा) आणि पेरिस्त्राीईका (पुनर्रचना) या धोरणांमुळे सोव्हिएत युनियनचे विभाजन झाले. यासाठी त्यांच्या मनावर आघात करून ग्लासनोस्ट आणि पेरेस्ट्रोइका या धोरणांशिवाय पर्याय नाही असे बिंबवण्यात आले. युरोप आणि अमेरिकेच्या चीनमधील वकिलातीच्या काही कर्मचार्‍यांनी तक्रार केली आहे की, त्यांच्या मनावर काही विशिष्ट पद्धतींनी परिणाम केला गेल्यामुळे त्यांना तीव्र डोकेदुखीचा सामना करावा लागला. मात्र चीनच्या बाहेर आल्यानंतर त्यांना होणारा त्रास थांबला.
चीन एक अत्यंत विश्वासघातकी देश आहे आणि सायकॉलॉजिकल वॉरफेअर, माईंट वॉर यांसाठी तो कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे माइंड रीडिंग मशीनचा गैरवापर चीन एक शस्त्र म्हणून नक्कीच करू शकतो. त्यामुळे भारताने चीनच्या या आणि अशा नव्या उपकरणांबाबत सावध राहणे गरजेचे आहे. विशेषतः उच्च पदस्थ व्यक्तींनी अधिक दक्षता घ्यायला हवी. तसेच अशाच प्रकारचे तंत्रज्ञान भारतानेसुद्धा विकसित करणे ही काळाची गरज आहे. यामुळे गरज पडल्यास चीनला आपण जशास तसे असे उत्तर देऊ शकतो. – ब्रिगेडियर हेमंत महाजन

Check Also

तृणमूल बंडखोरांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी थांबण्याचे …