केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. लाखो तरुण या परीक्षेसाठी वर्षानुवर्षेकठोर परिश्र्म करतात, तरीही यशाची खात्री नसते. मात्र, काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या जिद्दीपुढे नियतीलाही झुकावे लागते. 32 वर्षीय तरुणी पांडे यांची यशोगाथा अशाच अदम्य साहसाचे प्रतीक आहे. आयुष्याच्या अशा वळणावर जिथे वयोमर्यादेमुळे त्यांच्याकडे शेवटची संधी उरली होती, तिथे त्यांनी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय किंवा कोचिंगशिवाय अवघ्या 120 दिवसांच्या अभ्यासाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात ‘आयएएस’ होण्याचा मान मिळवला. यूपीएससी 2021 च्या परीक्षेत त्यांनी देशात 14 वी रँक पटकावून एक नवा इतिहास रचला.तरुणी पांडे यांचा जन्म पश्चिम बंगालमधील चित्तरंजन येथे झाला. लहानपणापासूनच त्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते आणि त्यानुसार त्यांनी सिक्कीममधील एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेशही मिळवला. दुर्दैवाने, दुसऱ्या वर्षात असताना प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावरच सोडून घरी परतावे लागले. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले मोठे संकट होते.
वैद्यकीय शिक्षण सुटल्यानंतर तरुणी खचून न जाता ’इग्नू’ (मुक्त विद्यापीठ) मधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पण खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना 2016 मध्ये घडली. त्यांचे मेहुणे, जे सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट होते, त्यांना श्र्ीनगरमध्ये वीरमरण आले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण कुटुंब हादरले. आपल्या बहिणीच्या हक्कासाठी आणि नोकरीसाठी जेव्हा तरुणी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटू लागल्या, तेव्हा त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारांची आणि त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात आली. समाजासाठी काहीतरी ठोस करण्याची जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी नागरी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. तरुणी यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते वेळेचे. वयोमर्यादेच्या शेवटच्या टप्प्यावर असल्यामुळे त्यांच्याकडे हा पहिला आणि अखेरचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे, त्यांनी या परीक्षेसाठी कोणत्याही मोठ्या शहरात जाऊन महागडे कोचिंग लावले नाही. केवळ युट्यूबवरील व्हिडिओ, स्वतः काढलेल्या नोट्स आणि संदर्भ पुस्तकांच्या मदतीने त्यांनी अवघ्या चार महिन्यांत म्हणजे 120 दिवसांत संपूर्ण तयारी केली. आज तरुणी पांडे या दूरसंचार विभागात अ श्र्ेणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, जर संकल्प दृढ असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर यशाचे शिखर गाठणे अशक्य नाही ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही का?
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र