हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘हेरा फेरी’ या चित्रपट मालिकेच्या तिसऱ्या भागावरून सध्या मोठा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. चित्रपट निर्माते विजय कुमार यांनी या मालिकेच्या बौद्धिक संपदा अधिकारांवर आपला पूर्णतः हक्क असल्याचे सांगत निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
या प्रकरणाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘हेरा फेरी’ या फ्रँचायझीचे सर्व अधिकार त्यांच्याकडेच आहेत. या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच ‘फिर हेराफेरी’ हा त्यांच्या परवानगीशिवाय बनवण्यात आला होता. मूळ करारांतर्गत केवळ पहिल्या भागासाठी रिमेकचे अधिकार देण्यात आले होते, मात्र त्यानंतरच्या घडामोडी त्यांच्या संमतीशिवाय झाल्या.
विजय कुमार यांनी सांगितले की, जेव्हा ‘हेरा फेरी 3’ च्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या, तेव्हा त्यांनी नाडियाडवाला यांना नोटीस बजावून त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नसल्याचे स्पष्ट केले होते. नाडियाडवाला यांनी हे प्रकल्प दुसऱ्या कोणाला तरी विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केल्याने हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. या कायदेशीर लढाईमुळे ‘हेरा फेरी 3’ चे भविष्य टांगणीला लागले असून प्रेक्षकांना या लोकप्रिय त्रयीला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.- जगदीश काळे
Check Also
‘लाहोर 1947’चे नाव बदलणार?
बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या निर्मिती संस्थेद्वारे साकारण्यात येत असलेल्या आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या मार्गदर्शनाखाली …
पांचजन्य वृत्तपत्र