लेख-समिक्षण

हिप हिप हुर्ये…

कबड्डी आणि खोखोसारखे क्रीडाप्रकार हे वर्षानुवर्षे गावाखेड्यातील शाळांमधील मुले-मुली खेळत आले आहेत. या मैदानी खेळातून शारीरिक विकासाबरोबरच सांघिकतेचे गुण विकसित होत जातात. परंतु तरीही या क्रीडाप्रकारांची क्रिकेटच्या तुलनेत उपेक्षाच झाली होती. मध्यंतरी कबड्डी प्रो लिगमुळे या खेळाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनद्वारे खो-खो विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करुन आणखी एक मोठे पाऊल टाकण्यात आले. या स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी जगज्जेतेपद मिळवून इतिहास रचला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिल्याने हा विजय ऐतिहासिक आहे.
केट एक्के क्रिकेट आणि क्रिकेट दुणे क्रिकेट’ असलेल्या भारतामध्ये गेल्या दोन-अडीच दशकांमध्ये टप्प्याटप्प्याने आपल्या मातीतील म्हणून ओळखले जाणारे पारंपरिक क्रीडाप्रकार पिछाडीवर पडत गेले. वास्तविक, ग्रामीण भागामध्ये या क्रीडाप्रकारांमध्ये नैपुण्य असणारे असंख्य खेळाडू आहेत. कबड्डी आणि खोखोसारखे क्रीडाप्रकार हे वर्षानुवर्षे गावाखेड्यातील शाळांमधील मुले-मुली खेळत आले आहेत. या मैदानी खेळातून शारीरिक विकासाबरोबरच सांघिकतेचे गुण विकसित होत जातात. किशोरवयीन अवस्थेमध्ये शरीराच्या स्नायूंची वाढ होत असताना खेळल्या जाणार्‍या या खेळांमुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. परंतु तरीही या क्रीडाप्रकारांची क्रिकेटच्या तुलनेत उपेक्षाच झाली होती. खो-खो खेळात जिंकण्यासाठी केवळ रणनीतीच आवश्यक नसते तर चपळता, गतिशीलता आणि तग धरण्याची क्षमता या आदर्श मानवी गुणवैशिष्ट्यांचीही आवश्यकता असते. पायात कोणत्याही प्रकारचे बूट न घालता खेळला जाणारा गतिमान खेळ म्हणून खो-खो पूर्ण भारतात परिचित आहे
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनद्वारे खो-खो विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करुन या खेळाला सन्मान, प्रतिष्ठा आणि लोकप्रियता प्राप्त करुन देण्यासाठी एक मोठे पाऊल टाकण्यात आले. 15 जानेवारी ते 19 जानेवारी या काळात नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धा भारताच्या क्रीडाइतिहासातील सुवर्णपान ठरल्या. याचे कारण या स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी जगज्जेतेपद मिळवून इतिहास रचला. या स्पर्धेमध्ये जगातील दोन डझन देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिल्याने हा विजयही ऐतिहासिक आहे. भारतीय क्रीडा इतिहासात एकाच दिवशी, एकाच स्पर्धेत पुरुष आणि महिला दोन्ही संघ विश्वविजेते ठरण्याची कामगिरी क्वचितच नोंदवली गेली आहे. त्यामुळेच या अभूतपूर्व यशाचे मोल अनन्यसाधारण आहे.
भारतीय महिला आणि पुरुष संघाने नेपाळचा पराभव करून जगज्जेतेपद पटकावले. पुरुष व महिला संघांनी अंतिम सामन्यात नेपाळच्या संघांवर अनुक्रमे 54-36 व 78-40 असा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या विजयाने सुरू झालेल्या महिला संघाच्या विजयी मोहिमेचा शेवट नेपाळविरुद्धच्या शानदार विजयाने झाला. अशाप्रकारे भारत आता महिला आणि पुरुष गटात पहिला विश्वविजेता संघ बनला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा अशा तीन राज्यांनी मिळून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आर्थिक हातभार लावला. सरकारकडून या खेळाला प्रोत्साहन दिले जात आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. येणार्‍या काळात खोखोच्या आशियाई क्रीडा स्पर्धा भरवण्याचा तसेच 2036 उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याचा सध्याचा सरकारचा मानस आहे. तसे झाल्यास 100 वर्षांनी खो-खोला पुन्हा सन्मान मिळेल. कारण 1936च्या बर्लिंन ऑलिम्पिक स्पर्धेत खो-खोचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश केला गेला होता. पण, त्यानंतर हा खेळ आशियाई स्पर्धेतही दिसला नाही. सद्यस्थितीत 55 देशांमध्ये खो-खो खेळ खेळला जातो. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये 23 देशांतील 39 संघांनी सहभाग घेतला होता. या सर्व संघांमध्ये भारतीय खो-खो पटू सर्वश्रेष्ठ ठरले.
एकीकडे हा विजय अद्वितीय असला तरी या जगज्जेत्या संघाला बक्षिस म्हणून रोख रक्कम देण्यात आली नाही, ही बाब चटका लावणारी ठरली. नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकात पुरुष आणि महिला या दोन्ही गटात विश्वविजेते ठरलेल्या खेळाडूंना फक्त ट्रॉफी आणि पदकेच देण्यात आली. भारतीय खो-खो फेडरेशनने असा युक्तिवाद केला की कर कायद्यातील गुंतागुंतीमुळे रोख बक्षिसे दिली जात नाहीत. त्यामुळे परदेशी खेळाडूंना अडचणी येऊ शकतात, असे सांगण्यात आले. मात्र, या पहिल्या खो-खो विश्वचषकाला पुरेसे प्रायोजकही मिळाले होते. अशा परिस्थितीत प्रथमच विश्वविजेते ठरणार्‍या खेळाडूंना रोख पारितोषिके देण्याचा विचार व्हायला हवा. आज क्रिकेटसारख्या खेळामध्ये पैशांचा महापूर आलेला दिसतो. बक्षिसे, प्रमोशन, जाहिराती, ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आदी असंख्य माध्यमातून क्रिकेटपटू भरभक्कम कमाई करुन कोट्याधीश बनलेले दिसतात. अशा स्थितीत अस्सल देशी खेळांमध्ये नैपुण्य मिळवणार्‍या खेळाडूंना जगज्जेते बनूनही केवळ पदकांवर आणि ट्रॉफीवर समाधान मानावे लागत असेल तर तो अन्याय ठरेल. त्यामुळे या देशी खेळाच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी समाजातील धनिकांनी, सरकारांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
येणार्‍या काळात खोखो खेळ लोकप्रिय करण्यासाठी निश्चितच विशेष प्रयत्न व्हायला हवेत. अलिकडच्या काही वर्षांत भारतीय खो खो फेडरेशनने यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. हा भारतीय खेळ जगातील अनेक देशांमध्ये खेळला जात नाही. तो लोकप्रिय करण्यासाठी इतर देशांना प्रेरणा देण्याबरोबरच भारतातून प्रशिक्षकही तेथे हा खेळ शिकवण्यासाठी पाठवण्यात आले. या देशांमध्ये खो-खो फेडरेशन स्थापन करण्यासाठी सहकार्य करण्यात आले. त्यामुळे जगातील विविध देशांमध्ये या खेळाची आवड निर्माण झाली. खो-खो लीगच्या प्रयत्नांमुळेही या खेळाला चालना मिळाली, ही बाब सर्वच क्रीडा प्रकाराच्या संघटनांसाठी अनुकरणीय आहे. हा खेळ लोकप्रिय करण्यासाठी सलमान खानला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले होते. विश्वचषकाच्या आयोजनाने या खेळाची जागतिक लोकप्रियता वाढण्यास मदत होणार आहे.या मोहिमेत सलमानसोबत नीरज चोप्राचाही पाठिंबा मिळाला आहे. येत्या काही वर्षांत भारतीय भूमीवर आधारित हा खेळ जागतिक स्तरावर लोकप्रिय होईल, अशी अपेक्षा आहे.
कबड्डी असेल किंवा खोखो या खेळांचे प्रशिक्षण शास्त्रोक्त पद्धतीने देण्याची गरज आहे. खेळाडूंचे शारीरिक व मानसिक बळ वाढविण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत। तरच भारतीय खेळाडू विश्वचषक, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती करू शकतील. यासाठी भारतीय मातीशी संबंधित या खेळासाठी देशातील आदिवासी, दुर्गम भाग आणि डोंगराळ भागात खेळाडूंचा शोध घेतला गेला पाहिजे.
कोणताही क्रीडाप्रकार लोकप्रिय होण्यासाठी त्याला असणारा जनाधार म्हणजेच प्रेक्षकांची संख्या वाढणे आवश्यक असते. सामान्यतः क्रीडाजगताकडे वळणार्‍या प्रेक्षकांचा ओढा वाढण्यासाठी स्पर्धा रोमांचकारी आणि उत्कंठावर्धक होणे गरजेचे असते. जितकी चुरस जास्त तितका प्रेक्षकवर्ग खुश, असे गणित सर्वच क्रीडाप्रकारांबाबत दिसते. आपण क्रिकेट आणि खो-खोची तुलना केल्यास आजच्या टी-20 क्रिकेटमध्ये जितकी उत्कंठा असते त्याहून कंकणभर अधिक उत्सुकता, उत्कंठा खो-खोमध्ये आहे. बहुतांश वेळा यातील सामने हे अटीतटीचे होतात आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चुरस निर्माण झालेली असते. असे असूनही खो-खोला क्रिकेटइतकी लोकप्रियता का लाभली नाही? याचे कारण बदलत्या काळाची पावले ओळखून या खेळातील स्पर्धांचे भव्य-दिव्य आयोजन, सादरीकरण, ब्रँडिंग करण्यात आले नाही. यामध्ये दृक्-श्राव्य माध्यमांची भूमिकाही मोठी आहे. वृत्तवाहिन्यांवर भारतीय क्रिकेट सामन्यांना जितकी प्रसिद्धी दिली जाते तितकी प्रसिद्धी ना या खेळांना दिली जाते, ना खेळाडूंना. त्यामुळे आता विश्वचषक जिंकल्यानंतर तरी या अतिशय मनोरंजक खेळाला मुख्य प्रवाहातील क्रीडाप्रकार बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. – नितीन कुलकणी, क्रीडा अभ्यासक

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …