लेख-समिक्षण

हिंसक चित्रपटांचा घातक प्रवाह

सध्याचे हिंसाचाराने माखलेले चित्रपट नव्या पिढीला धोकादायक वळणावर नेऊन ठेवत आहेत. बासु चॅटर्जी, गुुरू दत्त, राज कपूर, हृषिकेश मुखर्जी, यश चोप्रा यांसारख्या अभिजात दिग्दर्शकांची पिढी भूतलावर अवतरली तर बॉलिवुडपटांचा झालेला विचका पाहून ‌‘नको तो चित्रपट‌’ असे म्हणतील अशी आजची स्थिती आहे. टिव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसाचारांची दृश्य अल्पवयीन मुलांवर नकारात्मक परिणाम करत आहेत. या लोकप्रिय होत चाललेल्या धोकादायक ट्रेंडला आताच पायबंद घातला नाही तर एकेकाळी समाजप्रबोधनाचे माध्यम असणारा चित्रपट हा समाजविघातकाच्या पंक्तीत बसण्यास वेळ लागणार नाही.- सोनम परब, सिनेअभ्यासक

कधी काळी राष्ट्रभक्ती, कौटुंबिक नातेसंबंध, त्रिकोणी प्रेमकथा, नवतारुण्यातील प्रेमसंबंध यांवर आधारीत चित्रपटांच्या लाटा पाहणाऱ्या हिंदी सिनेसृष्टीत सध्या हिंसक चित्रपटांची लाटच आली आहे. किल, मार्को, पुष्पा, ॲनिमल आणि आता धुरंधरसारख्या चित्रपटात हिंसेचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. पडद्यावरचे हिंसक दृश्य अतिशय विदारक पद्दतीने सादर केले जात आहे. मुंडके धडावेगळे करणे, रक्ताने माखलेले शरीर, छिन्नविच्छिन्न शरीर, अत्याचार, जीवघेणा हल्ला, असभ्य भाषाशैली, हावभाव, विचारांची पायमल्ली यासारख्या गोष्टी सर्रासपणे पडद्यावर दिसत आहेत. अर्थात काहीजण याकडे मसालापट म्हणत दुर्लक्ष करतात. परंतु काहीवेळा समाजाला गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. पडद्यावर हिंसाचाराची दृश्य सादर करत गल्ला भरला जात असला काही चित्रपट समाजाचे नैतिक अध:पतन होण्यास कारणीभूतही ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात अभिनेत्री राधिका आपटे म्हणाली, ‌‘ज्या पद्धतीने सध्याच्या हिंसाचाराला मनोरंजनाप्रमाणे सादर केले जात असल्याचे पाहून अस्वस्थ आहे. समाजाावर हिंसेचा व्यापक परिणाम होतो आणि त्याला मिळणारी लोकप्रियता ही क्लेषदायक आहे, ” राधिका आपटेचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिला ट्रोल केले जावू लागले. वास्तविक गेल्या दोन तीन आठवड्यापासून बॉक्स ऑफिस धुरंधरमय झाले आहे. यात हिंसाचाराचा कळस आहे. काही जण हिंसाचाराचे समर्थन करत आहे. परंतु ज्या पद्धतीने हिंंसेचे सादरीकरण पाहता चित्रपटात एवढी हिंसा दाखविणे संयुक्तिक आहे का? यावर चर्चा सुरू झाली आहे.
मारझोडपटातील सर्वच दृश्य हिंसेच्या श्रेणीत मोडत नाहीत. अनेकदा पडद्यावरची हाणामारी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी असते. अर्थात ॲक्शन, मारधाड किंवा हिंसा कशा रितीने सादर केले जाते आणि ते दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा उद्देश काय? यावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम अवलंबून असतात. यानुसार दिग्दर्शकाचा उद्देश कळतो. पूर्वीच्या चित्रपटातील नायक दहा वीस गुंडांना मारहाण करायचा. तेव्हा प्रेक्षकांची देखील छाती फुगायची. त्याचवेळी अलिकडच्या काळात ॲक्शनपटात तंत्रज्ञानाने घुसखोरी केल्याने नायकाने केवळ बोट जरी लावले तरी गुंड मंडळी आकाशात उडताना दिसतात. सनी देवल, अजय देवगन यांच्यावर चितारलेले दृश्य प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे असायचे. आताचे काटकुळे नायक बलदंड गुंडांना देखील जमीनीवर पाडताना दाखवतात. अर्थात मारधाडीच्या तुलनेत रक्ताने माखलेले दृश्य हे प्रेक्षकांच्या मनावर गंभीर परिणाम करणारे असतात. डोके धडावेगळे करताना दाखवणारे जाणारे दृश्य पाहून प्रेक्षकांचे काळीजही हेलावते. अशावेळी कमकुवत हृदयाच्या व्यक्तीला धक्का बसू शकतो. ॲनिमल, पुष्पा, धुरंधर सारख्या चित्रपटांत अशा प्रकारचे दृश्य असताना अनेक प्रेक्षक डोळे बंद करतात किंवा इकडे तिकडे पाहतात. ‌‘गँग ऑफ वासेपूर‌’सारखे चित्रपट हिंसेचे उदात्तीकरण करतात.
यासंदर्भात मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात, पडद्यावर जेव्हा सतत रक्त दिसत असेल तर प्रेक्षकांची संवेदनशीलता कमी होते आणि संधी मिळताच ते प्रत्यक्षातही रक्त पाहणे किंवा रक्त काढण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. सेन्सॉर बोर्डाच्या माजी सीईओ, लेखिका पंकजा ठाकूर यांनी बदलत्या समाजाला स्थितीशी चित्रपटाला जोडले आहे. त्या म्हणतात, समाजात हिंसाचार वाढत आहे. सभोवताली अणि जगाच्या कानाकोपऱ्यात हैिंसाचार घडत असल्याचे आपण पाहतो आणि ऐकतो. अशावेळी सिनेमा समाजापासून प्रेरित होत आहे की समाज सिनेमापासून हे नेमके कळत नाही. दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांनी चित्रपट हा समाजाचा आरसा असल्याचे म्हटले होते. परंतु सध्याच्या चित्रपटांनी या व्याख्येलाही मागे टाकले आहे. हॉलिवुडपटात अशा प्रकारच्या दृश्यांना अनेक वर्षांपासून दाखविले गेले. आपल्याकडे देखील प्रेक्षक अशा दृश्यांप्रती सुज्ञ होत आहेत. संपूर्ण जगभरातील चित्रपटांचा आशय पाहिला तर नव्या पिढीतील दिग्दर्शंक हे एखाद्या थर्ड डिग्रीचे दृश्य अतिरंजीत करायचे असेल तर ते बिनधास्तपणे त्याचा वापर करताना दिसतात
गेल्या काही वर्षांपासून अतिरंजीत चित्रपटांची मालिकाच पाहवयास मिळते. यापैकी काहीचे कौतुक झाले तर काहींना टिकेचे धनी व्हावे लागले. ‌‘ॲनिमल‌’बाबत म्हटले, हिंसाचार पाहायचा असेल तर ‌‘ॲनिमल‌’ पाहवा. परंतु आपल्या मनातील प्राणी जेव्हा हिंसक होतो तेव्हा तुम्ही त्यास कसे रोखणार? असा प्रश्न लेखात उपस्थित केला. त्याचवेळी ‌‘किल‌’ चित्रपटाचे समीक्षण करणाऱ्यांनी म्हटले, की हा चित्रपट ‌‘ॲनिमल‌’च्या निरर्थक हिंसेच्या तुलनेत अगदी वेगळा असून त्यातील हिंसेचा उद्देश वेगळा आहे आणि तो योग्य वाटतो. एखादा व्यक्ती समाजात दहशत निर्माण करत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी देखील तितकेच सक्षम असायला हवे. वास्तविक चित्रपटातील हिंसेचा उद्देश योग्य असेल आणि चित्रीकरण प्रभावी असेल तर प्रेक्षक देखील त्यास दाद देतात. ‌‘धुरंधर‌’चा विचार केला तर एका पार्टीत गोळीबार होतो, लोकांची पळापळ होते, मात्र या दृष्याच्या पार्श्वभूमीवर रम्ंबा हो हो… गाणे वाजत असते.हे दृश्य म्हणजे हिंसाचार दाखविण्याचा नवा फंडा आहे. ‌‘ॲनिमल‌’मध्ये देखील रणबीर कपूर हा बॉबी देवोलला मारतो तेव्हाही गाणेच ऐकायला मिळते.
भारतीय सिनेमेटोग्राफ ॲक्टनुसार अशा प्रकारच्या हिंसक दृश्यांना कात्री लावण्याचे बंधन घातले आहे. समाजाला धक्का लावणारे दृश्य दाखविले जावू नये, असे स्पष्टपणे बजावले आहे. पण हा नियम कोठेच दिसत नाही. प्रारंभीपासूनच आपला समाज, बौद्धिक वर्ग आणि सेन्सॉर बोर्ड चित्रपटातील अश्लिलता, धार्मिक, राजकारण यासंदर्भातील वादग्रस्त मुद्यावरून सजग राहिलेला असताना हिंसाचाराबाबत तितका जागरूक राहताना दिसत नाही. अतिरंजीत हिंसा असल्यास ‌‘अ‌’ प्रमाणपत्र दिले जाते. हा चित्रपट 18 पेक्षा कमी वयोगटातील व्यक्ती पाहू शकत नाही. परंतु आजकाल टिव्हीवरही ‌‘अ‌’ श्रेणीतील चित्रपटांचे अहोरात्र प्रसारण सुरू असताना लहानपणासूनच हिंंसाचार डोळ्यासमोर राहताना दिसून येतो. कोणत्याच वयोगटातील व्यक्ती या दृश्यापासून लांब राहू शकत नाही. यासंदर्भात पंकजा ठाकूर म्हणतात, लहान शहरांत काही चित्रपटगृहचालक पैसे कमाविण्यासाठी ‌‘अ‌’ प्रमाणपत्र चित्रपटासाठी अल्पवयीन मुलांना प्रवेश देतात. अनेक चित्रपटांच्या पायरेटेड कॉपी सहजपणे उपलब्ध होतात. काही काळानंतर ओटीटीवरही त्याचा प्रीमियर होतो. अशावेळी ‌‘अ‌’ प्रमाणपत्राच्या निर्बंधांना काहीच अर्थ राहत नाही.
प्रत्यक्षात तरुणाई हा तिकीटबारीवरचा सर्वात महत्त्वाचा ग्राहक. नायक आणि खलनायकाचे क्रौर्य, रुबाब, आलिशान जीवनशैली, मौजमस्ती, थाटबाट याचे तरुणांना आकर्षण वाटते. सोशल मीडियावर काही दृश्याचे रील प्रसारित होतात किंवा ते स्वत:ही त्याची नक्कल करतात. अशावेळी हिंसाचाराची कॉपी देखील होऊ शकते. मानसशास्त्रांच्या मते, सतत हिंसा पाहिल्याने त्याप्रती असणारी संवेदनशीलता देखील कमी होते. अल्पवयीन मुलांना हिंसा ही सामान्य वाटू लागते. निर्माते त्यास मनोरंजनाचे नाव देतात आणि हेच मनोरंजन समाजाला आक्रमक रुप देतात. अशावेळी चित्रपटांत दाखविला जाणारा हिंसाचार हा केवळ पडद्यापुरतीच मर्यादित राहत नाही. तो सतत डोळ्यासमोर येत असल्याने प्रेक्षकांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो आणि त्यांचे वर्तन बदलू लागते. प्रत्यक्षात अनुभव येतो तेव्हा हैिंसा हाच त्याला प्रभावी मार्ग वाटू लागतो. परिणामी मानवता क्षीण होते.
हिंसाचार कसा वाढत गेला
फुलन देवी यांच्या आयुष्यावरचा बॅडिंट क्वीन (1994) हा हिंसा आणि अश्लिल सामग्रीमुळे वादग्रस्त ठरणारा पहिला चित्रपट म्हणावा लागेल. तरीही या चित्रपटाने तत्कालिन काळात वीस कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याचवेळी हा चित्रपट केवळ तीन कोटी रुपयांत तयार झाला होता. यानंतर जिंदा, सत्या, रक्तचरित यासारख्या चित्रपटांची लाट आली. त्यांनी हिंसाचाराला नवे रुप दिले. 2000 च्या दशकांत आणि अलीकडच्या काळात तर बॉलिवुडपट हिंसेने बरबटलेले दिसून आले. केजीएफ, किल, मार्को, पुष्पा सारख्या चित्रपटांनी हिंसेला केवळ कथानकाचा भाग म्हणून नाही तर स्टाईल म्हणून समोर आणले. मोठमोठे शस्त्र, संवाद, क्रुर नायक यामुळे तरुणांत अशा दृश्यांची क्रेझ आली. ॲनिमल, जवानसारखे चित्रपटातून हिंसेला भावनांचा आधार घेतला गेला. यानुसार प्रेक्षकांना हिंसा केवळ लढाईचे माध्यम नाही तर तो कथानकाचा क्लायमॅक्स वाटू लागला. कांतारा, विक्रमसारख्या दक्षिणेतील चित्रपटांनी हिंसेला लोककथा, संस्कृती आणि सत्याशी जोडले. मिर्झापूर, असूर, सेक्रेड गेम्ससारख्या वेब सीरिजनी हिसेला घराघरात पोचवले.
अशा स्थितीत निर्माते मात्र प्रेक्षकांच्या आवडीनुसार चित्रपटांची निर्मिती केली जाते, असा तर्क मांडतात. पण अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रेक्षकांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. सोशल मीडियाच्या काळात प्रेक्षकांना स्वत:ची भूमिका निर्मात्यांपर्यंत पोचवणे अवघड नाही. काही काम समीक्षकही करू शकतात. यासंदर्भात पंकजा ठाकूर यांनी एक तोडगा सांगितला आहे. सिगारेट किंवा मद्यपानाचे दृश्य दाखविताना इशाराही दिला जातो. त्याचवेळी हिंसक दृश्यातही इशाऱ्याची पट्टी दाखविणे अनिवार्य करायला हवे, असे त्या म्हणतात. शिवाय निर्मात्यांनी देखील आत्मपरीक्षण करायला हवे. प्रेक्षकांना दाखविले जाणारे दृश्य उपकारक आहे की अपायकारक याचा सारासार विचार करायला हवा. चित्रपट माध्यमांना अप्रिय दृश्यांपासून दूर ठेवायला हवे. अन्यथा सध्याचा समाज हा आणखीच डळमळीत झाल्याशिवाय राहणार नाही.

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …